मोदींच्या नऊ मिनिटे दिवे बंद करण्याच्या घोषणेने देश अंधारात जाण्याचा धोका : वीज अभियंत्यांना फुटलाय घाम

देशवासियांनी आता नऊ मिनिटांसाठी विजेवरील दिवे बंद करण्याचे आवाहन मोदींनी केल्यानंतर त्याबाबत काही तांत्रिक आव्हानेही उभी राहिली आहेत.
modi yoga
modi yoga

पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी येत्या पाच तारखेला (रविवार) रात्री नऊ वाजता नऊ मिनिटांसाठी सर्व दिवे बंद करण्याचे आवाहन जनतेला केले आहे. राजकीय विरोधकांनी त्यावर त्यांच्या पद्धतीने टीका सुरू केली असली तरी काही वीज क्षेत्रातील अभ्यासकांनी यावर ग्रीड फेल्युअरचा धोका दर्शविला आहे. यातूव पुरता देशच पुन्हा काही तासांसाठी अंधारात जाण्याची भीती असल्याने वीज अभियंते आतापासूनच कामाला लागले आहेत.

कोरोनाला हरविण्यासाठीच्या मोहिमेचा भाग म्हणून घरातील विजेवर चालणारे दिवे बंद करून मेणबत्त्या किंवा मोबाईलचे फ्लॅश लावा, असा सल्ला मोदींनी दिला आहे. त्यावरून देशात घरबसल्या सर्वत्र चर्चा सुरू आहे. 

नरेंद्र मोदी यांच्या या घोषणेनंतर राज्यासाठीचे स्टेट लोड डिसपॅच सेंटर असलेल्या कळवा येथील केंद्रातील अधिकारीही चिंतेत पडले. ग्रीडमध्ये अचानक विजेची मागणी वाढणे किंवा घटणे हे दोन्ही ग्रीडसाठी धोकादायक असतात. विजेचे जेवढे उत्पादन तेवढीच मागणी राहील, असे नियोजन त्यासाठी असते. मागणी व पुरवठा जेव्हा समप्रमाणात असतात तेव्हा ही फ्रिक्वेन्सी आदर्श म्हणजे 50 हर्टझ असते. वन नेशन, वन ग्रीड अॅंड वन फ्रिक्वेन्सी, असे धोरण देशात 31 डिसेंबर 2013 पासून अमलात आले. म्हणजे अरुणाचल प्रदेशात जी फ्रिक्वेन्सी असते तीच कोकणात देखील असते.

वीज मागणी घटली

देशात आतापर्यंत ग्रीड फेल्युअर झाले ते केवळ अतिरिक्त विजेच्या मागणीमुळे झाल्याचा अनुभव आहे. उत्तरेतील राज्ये अनेकदा जादा वीज खेचून घेत असल्याने मागणी व पुरवठा यातील फ्रिक्वेन्सी बदलते. ती एका विशिष्ट मर्यादेच्या पलीकडे गेली की वीजनिर्मिती केंद्रातील सेट आपोआप बंद होतात. ते पुन्हा सुरू करणे पुन्हा जिकिरीचे होऊन बसते.

मागणी अचानक वाढली तर सिस्टिम ओव्हरलोड होऊन फ्रिक्वेन्सी 50 च्या खाली येते. मागणी अचानाक कमी झाली तर ओव्हर व्होल्टेज होऊन ती 50 च्या पुढे जाते. या दोन्ही स्थितीत फार कमी किंवा वाढ  झाली तर  सिस्टिम ट्रीप होऊन 440 KV क्षमतेची केंद्रे बंद पडतात. त्यामुळे वीजनिर्मिती संचही बंद पडतात. औष्णिक वीज केंद्रातील बंद पडलेले संच पुन्हा पूर्ण क्षमतेने उत्पादन करण्यासाठी दहा ते बारा तासांहून अधिक वेळ लागतो. जलविद्युत केंद्रातील निर्मिती बंद पडल्यानंतर ती काही क्षणात सुरू होते. हे संच सुरू झाल्यानंतर मग इतर केंद्रे सुरू केली जातात. त्यामुळे ग्रीड फेल होणार नाही यासाठी लोड डिस्पॅच सेंटर डोळ्यात तेल टातून काम करत असतात. 

कोरोना विरोधातील देशभर सुरू असलेल्या लाॅक डाऊनमुळे विजेची मागणी 30 ते 40 टक्के घटली. कारखाने, कंपन्या आणि व्यापारी संकुले बंद असल्याने महाराष्ट्रात आणि देशातही केवळ घरगुती आणि शेतीसाठीचा वीजवापर सुरू आहे. देशाची एकूण स्थापित वीजनिर्मीती क्षमता तीन लाख 60 हजार मेगावाॅट असली तरी आता प्रत्यक्ष मागणी ही 1 लाख 40 हजार मेगावाॅटपर्यंत खाली आहे. महाराष्ट्रातील कमाल मागणी ही 24 हजार मेगावाॅटवरून 17 हजारवर आली आहे. सध्याच्या परिस्थितीत तीन हजार मेगावाॅटच्या फरकाने फ्रिक्वेन्सी बदलते. शुक्रवारी रात्री नऊनंतर नऊ मिनिटांसाठी अचानक मागणी घटून फ्रिक्वेन्सी वाढली तर काय, अशी शंका अभियंत्यांना आहे. त्यासाठी त्यांना आधीपासून संच बंद ठेवून काही भागात अघोषित भारनियमन करावे लागण्याची शक्यता नाकारता येत नाही.  त्यामुळे मोदींसाठी दिवे बंद करण्याची योजना नऊ मिनिटांसाठी असली तरी त्यासाठी कितीतरी पूर्वतयारी आता या लोड डिस्पॅट सेंटरने सुरू केली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com