राज्यातील 70 टक्‍के कोरोनाचे रुग्ण महामुंबईत

महामुंबई परिसरातील कोरोना रुग्णांच्या संख्येत गेल्या आठवड्यात झालेली प्रचंड वाढ संपूर्ण देशाच्या चिंतेचा विषय ठरली आहे. महाराष्ट्रातील अर्ध्यापेक्षा जास्त, किंबहुना 70 टक्‍के रुग्ण मुंबईत सापडत आहेत. राज्यातील मृत्युदर 2 टक्‍क्‍यांपर्यंत राखण्यात यश मिळाले असताना मुंबईतील मृत्युदर 8 टक्‍क्‍यांवर पोहोचला आहे. त्यामुळे आता "मिशन मुंबई' हाती घेण्याशिवाय पर्याय नाही, असे केंद्र सरकारने कळवले आहे.
70 percent of corona patients are from mumbai
70 percent of corona patients are from mumbai

मुंबई ः महामुंबई परिसरातील कोरोना रुग्णांच्या संख्येत गेल्या आठवड्यात झालेली प्रचंड वाढ संपूर्ण देशाच्या चिंतेचा विषय ठरली आहे. महाराष्ट्रातील अर्ध्यापेक्षा जास्त, किंबहुना 70 टक्‍के रुग्ण मुंबईत सापडत आहेत. राज्यातील मृत्युदर 2 टक्‍क्‍यांपर्यंत राखण्यात यश मिळाले असताना मुंबईतील मृत्युदर 8 टक्‍क्‍यांवर पोहोचला आहे. त्यामुळे आता "मिशन मुंबई' हाती घेण्याशिवाय पर्याय नाही, असे केंद्र सरकारने कळवले आहे.

मार्चच्या पहिल्या आणि दुसऱ्या आठवड्यांत परदेशांतून तब्बल दीड लाख प्रवासी मुंबईत आले. त्यापैकी सुमारे 35 हजार व्यक्ती मुंबईतील वेगवेगळ्या भागांत वास्तव्याला आहेत. सरसकट विलगीकरण न करता घरातच वेगळे राहा, असा सल्ला त्यांना देण्यात आला होता. मध्यमवर्गीय वस्त्याही दाटीवाटीच्या असल्याने घरांत विलगीकरण शक्‍य नाही. त्यातून कोरोनाचा फैलाव झाल्याची भीती आरोग्यतज्ज्ञ व्यक्‍त करत आहेत. 

धारावीतील दीड लाखाची वस्ती असलेल्या चार गल्ल्यांमध्ये संसर्ग झाल्याची शक्‍यता वर्तवली जात आहे. आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या परिसरातील जोगेश्‍वरी, अंधेरी, विलेपार्ले आदी भागांत कोरोना पॉझिटिव्ह व्यक्ती आढळल्या आहेत. विमानतळ कर्मचारी असलेल्या विलेपार्ल्यातील एका महिलेला कामाच्या ठिकाणीच लागण झाली असल्याचा संशय आहे. परंतु, वरळी, प्रभादेवी अशा दूरवरील भागांत कोरोनाची लागण होण्याचे कारण काय, अशी विचारणा होत आहे. 

मुंबई महापालिकेच्या आरोग्य खात्याने "आहे रे' वर्गासाठी 10 दिवसांपासून खासगी रुग्णालयांत कोरोना चाचणीची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांची माहिती आरोग्य खात्याला कळवणे आवश्‍यक असते. परंतु, ही माहिती राज्य नियंत्रण कक्षाला उशिरा कळवण्यात आल्याची शंका व्यक्त केली जात आहे. महापालिका रुग्णालयांत हेल्पलाईन सुरू असली, तरी कोरोना रुग्णांच्या संख्येत मागील सात दिवसांत झालेली वाढ चिंताजनक असल्याचे केंद्रीय आरोग्य खात्याचे मत आहे. महापालिकेने मात्र वेगळी भूमिका घेतली आहे. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार मागील चार दिवसांतील एकत्रित माहिती खासगी प्रयोगशाळांनी कळवल्यामुळे कोरोनाच्या रुग्णांचा आकडा अचानक 57 ने वाढला. प्रत्यक्षात हे अहवाल चार दिवसांतील चाचण्यांचे आहेत.

"चाचण्या वाढल्याने संशयितांच्या संख्येत वाढ'
मुंबईत आतापर्यंत तब्बल 6200 नागरिकांच्या चाचण्या केल्यामुळे संख्येत वाढ झाली आहे, असा दावा महापालिका आयुक्‍त प्रवीणसिंह परदेशी यांनी "सकाळ'शी बोलताना केला. हरियाना आणि पंजाब या राज्यांत फक्‍त 600 ते 700 चाचण्या झाल्या. मुंबईत चाचण्यांची संख्या मोठी असल्याने संशयितांचा आकडा मोठा आहे. त्यामुळे उपचार करणे सोपे होते आहे, असेही ते म्हणाले. संशयितांनी आपल्या परिसरातून अन्यत्र जाऊ नये यासाठी सीसी टीव्ही कॅमेरे बसवले आहेत. आम्ही मुंबईकरांच्या आरोग्याची काळजी घेऊ. त्यासाठी युद्ध स्तरावर प्रयत्न सुरू आहेत, अशी ग्वाही त्यांनी दिली. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com