मुंबई बाजार समिती निवडणुकीसाठी 58 उमेदवार रिंगणात

mumbai bajar samiti
mumbai bajar samiti

वाशी ः आशिया खंडातील सर्वात मोठी बाजारपेठ म्हणून ओळख असणाऱ्या मुंबई कृषी उत्पन्न बाजार संचालक पदासाठी आणि महसूल विभागासाठी निवडणूक होत आहे. बाजार समितीच्या निवडणुकीत 18 जागांसाठी मतदान होत असून, निवडणुकीतील उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी 123 उमेदवारांनी अर्ज मागे घेतले. त्यामुळे आता 58 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असणार आहेत. 29 फेब्रुवारीला मतदान प्रक्रिया पार पडणार असून, 2 मार्च रोजी मतमोजणी होणार आहे.

बाजार समितीच्या अंतर्गत येणाऱ्या सहा महसूल विभागात आणि पाच बाजार समित्या आणि व्यापारी हमाल माथाडी प्रतिनिधी यांच्या प्रतिनिधींच्या एका जागेकारिता ही निवडणूक होत आहे. यात व्यापारी हमाल माथाडी या विभागातून शशिकांत शिंदे; तर फळ बाजारातून संजय पानसरे या दोघा उमेदवारांनीच अर्ज भरल्याने या दोन जागांवर त्यांची बिनविरोध निवडणूक झाली आहे. मात्र, सहा महसुली आणि पाच समिती संचालकांकरिता थेट लढत होणार आहे.

कांदा बटाटा बाजारात यावेळी अशोक वाळुंज, सुरेश शिंदे आणि राजेंद्र शेळके यांच्यात तिरंगी लढत होणार आहे; तर मसाला मार्केटमध्ये विजय धुता, अशोक राणावत आणि कीर्ती राणा यांच्यात तिरंगी लढत होत आहे. अन्नधान्य बाजारात नीलेश वीरा, पोपटलाल भंडारी आणि लक्ष्मीदास भानुशाली यांच्यातही तिरंगी लढत आहे. भाजीपाला बाजारात शंकर पिंगळे, के. डी. मोरे, प्रताप चव्हाण आणि आप्पासाहेब शिरकर यांच्यात लढत होणार आहे. याशिवाय इतर सहा महसुली विभागांतून अमरावती- 7, नागपूर- 7, नाशिक- 8, कोकण- 5, औरंगाबाद-11 आणि पुणे विभागातून 5 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असणार आहेत.

एपीएमसी निवडणुकीसाठीच्या एकूण 18 जागांसाठी 181 उमेदवारांचे अर्ज दाखल झाले होते. त्यापैकी प्रत्यक्षात केवळ 58 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत, अशी माहिती सहायक निवडणूक अधिकारी शामकांत साळुंखे यांनी दिली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com