45-advocates-mp-hina-gavit | Sarkarnama

खासदार हीना गावित यांची ४५ वकिलांची फौज; मराठा आंदोलकांच्या १५० वकिलांच्या फौजेला उत्तर

निखिल सूर्यवंशी
सोमवार, 13 ऑगस्ट 2018

धुळे : जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात काही मराठा आंदोलकांकडून भाजपच्या खासदार डॉ. हीना गावित यांच्यावर झालेल्या हल्ला प्रकरणी 22 जणांना अटक झाली आहे. मराठा आंदोलकांकडून जिल्हा न्यायालयात 150 वकिलांची फौज उभी राहिली. यापाठोपाठ खासदार गावित यांच्या बाजूने आज (सोमवार) कामकाजावेळी 45 वकिलांची फौज उभी राहिली आहे.

धुळे : जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात काही मराठा आंदोलकांकडून भाजपच्या खासदार डॉ. हीना गावित यांच्यावर झालेल्या हल्ला प्रकरणी 22 जणांना अटक झाली आहे. मराठा आंदोलकांकडून जिल्हा न्यायालयात 150 वकिलांची फौज उभी राहिली. यापाठोपाठ खासदार गावित यांच्या बाजूने आज (सोमवार) कामकाजावेळी 45 वकिलांची फौज उभी राहिली आहे.

आरक्षण प्रश्नी सकल मराठा समाज, जिल्हा मराठा क्रांती मोर्चातर्फे जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ 24 दिवसांपासून ठिय्या आंदोलन सुरू आहे. यात पाच ऑगस्टला रविवारी आंदोलनाच्या 16 व्या दिवशी शेकडो मराठा आंदोलक कुटुंबासह ठिय्या मांडून होते. याच दिवशी जिल्हा नियोजन मंडळाची बैठक होती. त्यामुळे पालकमंत्री तथा ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे, पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांच्यासह खासदार गावित, विविध मतदारसंघाचे आमदार, इतर राजकीय पदाधिकारी उपस्थित होते.

गावितांच्या कारवर हल्ला

खासदार गावित बैठकीचे कामकाज आटोपून कारने निघाल्या. त्यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशव्दारावर पोलिस आणि आंदोलकांच्या रेटारेटीत प्रवेशव्दार उघडले. तेथून जवळ असलेल्या खासदार गावित यांच्या कारवर काही मराठा आंदोलक चढले. इतर सर्वांना सोडून आंदोलकांनी महिला आदिवासी खासदाराला लक्ष केल्याचा, संशयित आंदोलकांना ताब्यात घेत सायंकाळी पोलिसांनी सोडून दिल्याचा आरोप डॉ. गावित यांनी केला.

वाढीव कलमान्वये गुन्हा

प्रथम त्यांनी शहर पोलिस ठाण्यात संशयित आंदोलकांविरूध्द जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याची फिर्याद दिली. त्यानुसार चौघांना अटक झाली. लोकसभेत खासदार गावित यांना हा प्रश्‍न मांडल्यावर आंदोलकांविरूध्द "ऍट्रॉसिटी'चे कलम वाढविण्यात आले. त्यामुळे 18 आंदोलकांनी स्वतःहून अटक करून घेतली. संशयित 22 आंदोलकांची न्यायालयाने न्यायालयीन कोठडीव्दारे जिल्हा कारागृहात रवानगी केली. त्यांनी जामिनासाठी अर्ज केला आहे.

वकिलांची फौज उभी

फिर्यादी गावित यांनी त्यांची बाजू मांडल्यावर न्यायालय संशयित आंदोलकांच्या जामिनाबाबत निर्णय घेणार आहे. खासदार गावित यांच्यातर्फे 45 वकिलांनी वकीलपत्र सादर केले. त्यात नंदुरबारमधील दहा आणि उर्वरित धुळ्यातील असून दलित, आदिवासी, मराठा आदी समाज घटकातील, तसेच अनेक महिला वकिलांचा समावेश आहे. तत्पूर्वी, मराठा आंदोलकांकडून मराठा, दलित यासह अन्य समाज घटकातील मिळून 150 वकिलांनी वकीलपत्र भरले आहे.

जामिनावर उद्या कामकाज

संशयित 22 आंदोलकांच्या जामीन प्रकरणी आज कामकाज झाले. तेव्हा खासदार गावित यांच्यातर्फे ऍड. मधुकर भिसे यांनी खासदार गावित यांना बाजू मांडण्यासाठी वेळ द्यावा, 16 ऑगस्टला पुढील कामकाज ठेवावे, अशी मागणी केली. त्यावर मराठा आंदोलकांतर्फे वकील संघाचे अध्यक्ष ऍड. दिलीप पाटील व सहकाऱ्यांनी हरकत घेतली. खासदार गावित यांना वेळीच नोटीशीव्दारे बाजू मांडण्यासाठी संधी दिली गेली, त्यांना संपूर्ण प्रकरण माहीत असून ते संवेदनशील आहे, त्यामुळे कालापव्यय होऊ नये, असा युक्तिवाद करत उद्या (मंगळवार) कामकाज ठेवावे, असा युक्तिवाद ऍड. पाटील यांनी केला. तो न्या. उगले यांनी ग्राह्य मानल्याने मंगळवारी होणाऱ्या कामकाजाकडे सर्वांचे लक्ष असेल. 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख