शरद पवारांनी 42 वर्षांपूर्वी भाजपमधून फोडलेल्या आमदाराच्या पक्षांतराची आजही चर्चा!

शरद पवार यांनी तब्बल 42 वर्षांपूर्वी घडवून आणलेले एक पक्षांतर राजकारणात आजही चर्चेत आलेआहे. पुणे जिल्ह्यातील भाजपचे (तत्कालीन जनसंघ) मावळातीलआमदार कृष्णराव भेगडेयांनी काॅंग्रेसमध्ये प्रवेश केला. निष्ठावंत समजल्या जाणाऱ्या भेगडे यांच्या पक्षप्रवेशाची आठवण भाजपचे नेते रावसाहेब दानवे यांनी काढली आणि नवीन वाद पेटला.
शरद पवारांनी 42 वर्षांपूर्वी भाजपमधून फोडलेल्या आमदाराच्या पक्षांतराची आजही चर्चा!

पिंपरी : भाजप किंवा तत्कालीन जनसंघ हा निष्ठावंत कार्यकर्त्यांचा गड समजला जातो. 50 वर्षांपूर्वी पुणे जिल्ह्यातील मावळ या विधानसभा मतदारसंघाचे कृष्णराव भेगडे हे आमदार जनसंघातून काॅंग्रेसमध्ये (रेड्डी काॅंग्रेस) आले. हे पक्षांतर शरद पवार यांनी घडवून आणले होते.

भाजप सध्या ईडी किंवा सीबीआयची दहशत दाखवून पक्षांतर घडवून आणत असल्याचा आरोप शरद पवार यांनी केला होता. त्याला प्रत्युत्तर म्हणून भाजप नेत्यांनी भेगडे यांचे उदाहरण भर सभेत सांगितले.  

ईडीचा धाक दाखवून आम्ही कुणालाही पक्षात घेत नाही, उलट पवारांनीच कृष्णराव भेगडेंसारख्या आमदारांना सत्तर हजार रुपयाच्या घोटाळ्याची भीती दाखवून फोडले होते. त्यामुळे फोडाफोडी आम्ही नाही तर तुम्हीच केली होती. म्हणून फोडाफोडीच्या गोष्टींबद्दल विरोधकांनी बोलू  नये, असे दानवे रविवारी (ता.१३) बालेवाडी येथे कोथरूड विधानसभा मतदारसंघाचे भाजपचे उमेदवार चंद्रकांतदादा पाटील यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत म्हणाले होते.

दानवे यांच्या या आरोपामुळे भेगडे व्यतिथ झाले आहेत. जनसंघाचा आमदार असताना १९७७ मध्ये मी स्वच्छेने शरद पवारांसोबत कॉंग्रेसमध्ये गेलो होतो. त्यामुळे मी केलेल्या घोटाळ्याची भीती दाखवून पवारांनी मला फोडले होते, हा केंदीय मंत्री व भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे-पाटील यांचा दावा चुकीचा असल्याचे स्वत कृष्णराव भेगडे यांनीच आज 'सरकारनामा'ला सांगितले. आमदारकीच्या चार टर्मच नाही, तर उभ्या आयुष्यात मी एक पै चा सुद्धा घोटाळा केला नसल्याचे ८४ वर्षीय भेगडे म्हणाले. या चुकीच्या माहिती  व वक्तव्याबद्दल दानवेंना जाबही विचारणार असल्याचे त्यांनी सांगितले. हा दानवेंचा दाव पूर्ण चुकीचा असल्याचे यासंदर्भात भेगडे यांनी स्पष्ट केले. आताच्या पिढीला त्यावेळची माहिती नाही, वा आहे ती चुकीची आहे, असे ते म्हणाले.

भेगडे हे 1972 मध्ये मावळात जनसंघाचे आमदार होते. १९७७ ला त्यांनी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला होता.  नंतर ते १९७८ ला पुन्हा विधानसभेवर निवडून आले होते. १९९२ आणि १९९४ असे दोनदा ते विधान परिषदेवर निवडून गेले होते. शरद पवार हे संरक्षण मंत्रिपदाचा राजीनामा देऊन केंद्रातून पुन्हा राज्यात मुख्यमंत्री झाले. त्यांच्यासाठी भेगडे यांनी आपल्या विधान परिषदेच्या जागेचा राजीनामा दिला होता. नंतर पुन्हा त्यांना विधानपरिषदेवर १९९४ ला घेण्यात आले. ती टर्म संपली आणि त्यांनी राजकारणातून दोन हजार साली निवृत्ती घेतली. असे चार टर्म आमदार राहिलेले भेगडे निृवृत्त झाले.तरी, शरद पवारांच्या प्रेमापोटी काल (ता.१३)तळेगाव येथे झालेल्या पवारांच्या विधानसभा निवडणूक प्रचारसभेला उपस्थित होते. स्वत: यशवंतराव चव्हाण या माझ्या पक्षप्रवेश सोहळ्याला आले होते. पाच हजार लोकांची गर्दी तेव्हा झाली होती, असे त्यांनी आपल्या ४२ वर्षे जुन्या प्रवेशाच्या आठवणीला पुन्हा एकवार उजाळा देताना सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com