काटोलात आमदार नसतानाही तुमानेंना दमदार मताधिक्‍य

काटोलात आमदार नसतानाही तुमानेंना दमदार मताधिक्‍य

नागपूर : रामटेक लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेचे कृपाल तुमाने यांनी निर्णायक आघाडी मिळविली आहे. काटोल व उमरेड विधानसभा मतदारसंघातील मतदारांनी तुमाने यांना भरभरून मते दिली. त्यामुळे त्यांचा विजय सुकर झाला.

काटोलमध्ये युतीचा आमदार नसतानाही तुमाने यांना दमदार मताधिक्‍य मिळाले, हे विशेष. राष्ट्रवादी कॉंग्रेसचा गड मानल्या जाणाऱ्या काटोल विधानसभा मतदारसंघात प्रथमच भाजपचे उमेदवार डॉ. आशीष देशमुख यांनी खिंडार पाडले. यामुळे भाजपने काटोलमध्ये पाय रोवले.

राज्य सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणावर टीका करीत काटोलचे आमदार डॉ. आशीष देशमुख यांनी भाजपचा राजीनामा दिल्याने काटोल नेतृत्वहीन झाल्याची चर्चा होती.

लोकसभा निवडणुकीपूर्वी काटोल नगर परिषदेचे सत्तापक्षनेते चरणसिंग ठाकूर, काटोल पंचायत समितीचे सभापती संदीप सरोदे व नरखेड पंचायत समितीचे सभापती राजेंद्र हरणे व जिल्हा परिषदेचे शिक्षण सभापती उकेश चौहान यांनी काटोलमध्ये भाजप-शिवसेना युतीचे उमेदवार कृपाल तुमाने यांच्या प्रचाराची जबाबदारी घेतली. काटोलमधून मताधिक्‍य मिळाल्याने भाजप व शिवसेनेचे सर्वच कार्यकर्ते उत्साहात आहेत

येत्या विधानसभा निवडणुकीत उमेदवारी मिळण्याची शक्‍यता असल्यानेच येथील भाजप व शिवसेना पदाधिकाऱ्यांनी जोमाने प्रचार केला. चरणसिंग ठाकूर यांनी जातीने लक्ष घालून मोवाड, काटोल, नरखेड या नगरपालिका क्षेत्रांसह कोंढाळी, जलालखेडा, बेलोना या मोठ्या गावांत आघाडी कशी मिळेल यासाठी प्रयत्न केले. तर ग्रामीण भागात संदीप सरोदे, राजेंद्र हरणे व उकेश चौहान यांनी गावागावांत प्रचार केला.

लोकसभा निवडणुकीत विजय मिळविल्याबद्दल सेना-भाजपचे अभिनंदन. कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचा पराभव आम्ही मोठ्या मनाने स्वीकार करतो. या पराभवाचे आत्मचिंतन करून चुका दुरुस्त केल्या जातील. कार्यकर्त्यांनी खचून जाऊ नये. येणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी सर्वांना सोबत घेऊन पुन्हा
जोमाने कामाला लागू, अशी प्रतिक्रीया राष्ट्रवादीचे माजी मंत्री अनिल देशमुख यांनी या निकालावर दिली. येत्या विधानसभा निवडणुकीत काटोलमधून भाजपचा उमेदवार निवडून येणार असल्याचे पंजायत समिती सभापती संदीप सरोदे म्हणाले.

भाजपच्या नेत्यांनी आमदार नसल्याने विशेष लक्ष घालून समस्या सोडविल्या. कोणत्याही गोष्टीची कमी पडू दिली नाही. दुष्काळावर मात करण्यासाठी इतर आमदारांचा निधी काटोलकडे वळविण्यात आला. यामुळे जनतेचा विश्‍वास वाढल्याचे काटोल नगर परीषदेचे सत्तापक्षनेते चरणसिंग ठाकूर म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com