रामटेक : कशी ही बनवाबनवी ? डीव्हीआर चोरी प्रकरणातील चोरट्यांचा लागेना सुगावा

रामटेक : कशी ही बनवाबनवी ? डीव्हीआर चोरी प्रकरणातील चोरट्यांचा लागेना सुगावा

नागपूर : रामटेक लोकसभा मतदारसंघातील उमरेडच्या स्ट्रॉंग रूममधून डीव्हीआर चोरीला गेला. एकाची नोंद असताना, चोरट्यांनी दोन डीव्हीआर परत आणून दिले. नंतर दोन डीव्हीआर चोरीला गेल्याचे असल्याचे सांगण्यात आले. तत्पूर्वी अधिकारी सर्वत्र एकच डीव्हीआर चोरीला गेल्याचे सांगतात. निवडणूक प्रशासनाकडून पोलिसांकडे बोट दाखविण्यात येते. तर पोलिस प्रशासन निवडणूक विभाग आणि वरिष्ठांकडे बोट दाखवित आहे. त्यामुळे हा सर्व प्रकार बनावाबवनीचा तर नाही ना, अशी शंका सहजच येते.

विशेष म्हणजे मोठ्यामोठ्या प्रकरणात चोरट्यांना चुटकीसरशी पकडणाऱ्यांना पोलिसांना डीव्हीआर चोरट्यांचा सुगावा लागत नाही, हेही आश्‍चर्यच. की पोलिसांनाच प्रकरण सोडवायचे नाही, अशी चर्चा आता सामान्य नागरिक करू लागले आहेत. फार वर्षांपूर्वी "अशी ही बनावाबनवी' नावाचा प्रचंड गाजलेला एक मराठी चित्रपट आला होता. मात्र या प्रकरणात "कशी ही बनवाबनवी ?' हा प्रश्‍न सोडविण्याची वेळ संबंधितांवर आली आहे.

उमरेड येथील स्ट्रॉंग रूममधून डीव्हीआर व एलसीडी स्क्रीन चोरीला गेले. घटनेच्या 12 दिवसानंतर पोलिसांनी तक्रार दाखल केली. सरकारी परिसर असताना चोरीची फिर्याद दाखल करण्यासाठी खाजगी व्यक्ती म्हणजे चौकीदाराचा वापर करण्यात आला. ज्या चौकीदाराला फिर्यादी करण्यात आले, तो त्या दिवशी
कामावरच नव्हता. हे विशेष ऊल्लेखनीय. प्रशासन गांभीर्याने दखल घेत नसल्याने कॉंग्रेस उमेदवाराने मुख्य निवडणूक आयुक्तांकडे तक्रार केली. त्यानंतर यंत्रणमध्ये थोडीशी हालचाल सुरू झाली.

केंद्राचे चौकशी पथक येण्यापूर्वीच डीव्हीआर चोरट्यांनी परत केले. चोरट्यांनी दोन डीव्हीआर दिले. त्यानंतर प्रशासनाच्या लक्षात आले की एक नव्हे दोन डीव्हीआर चोरीला गेले होते. पथक एक डीव्हीआर सांगणाऱ्या प्रशासनाकडून आता दोन डीव्हीआर चोरीला गेल्याचे सांगण्यात येत आहे. चोरट्यांनी एलसीडी स्क्रीन मात्र परत केली नाही. या प्रकरणात काय आणि किती चोरीला गेले, हेच कळायला मार्ग नाही. कंत्राटदाराकडून कोणते साहित्य लावण्यात आले होते, त्यातील काय आहे आणि काय गेले, याकडेही कुणी नीट लक्ष दिले नाही. डीव्हीआर मिळाल्याचे समाधान व्यक्त करण्यात येत आहे.

एलसीडी स्क्रीन वाऱ्यावर सोडल्याचे दिसते. शासकीय कार्यालय परिसरातून साहित्य चोरीला गेल्याची एवढी मोठी आणि गंभीर घटना पोलिस आणि प्रशासन हलक्‍यात घेत आहे. यामुळे इतर लोकांचे काय होत असेल, अशी चर्चा जिल्हाधिकारी कार्यालयातच आता रंगली आहे. या प्रकरणात आतापर्यंत कुणालाही जबाबदार धरण्यात आले नसल्यानेही आश्‍चर्य व्यक्त करण्यात येत आहे. एकूण या प्रकरणात निवडणूक आणि पोलिस या दोन्ही विभाग संशयाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. हे मात्र नक्की.
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com