लोकसभेला वहिनी भारती पवार जिंकल्यास राष्ट्रवादीतील नितीन पवारांची अडचण 

नाशिकच्या राजकारणात सध्या (कै) ए. टी. पवार यांच्या कुटुंबातील राजकीय भाऊबंदकी एकदम चर्चेत आली आहे.लोकसभा निवडणुकीत ऐनवेळी दिंडोरीतुन भाजपच्या उमेदवार झालेल्या वहिनी डॉ. भारती पवार जिंकल्या तर सर्वाधिक अडचण राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये असलेले दीर नितीन पवार यांची होणार आहे.
लोकसभेला वहिनी भारती पवार जिंकल्यास राष्ट्रवादीतील नितीन पवारांची अडचण 

नाशिक : नाशिकच्या राजकारणात सध्या (कै) ए. टी. पवार यांच्या कुटुंबातील राजकीय भाऊबंदकी एकदम चर्चेत आली आहे. लोकसभा निवडणुकीत ऐनवेळी दिंडोरीतुन भाजपच्या उमेदवार झालेल्या वहिनी डॉ. भारती पवार जिंकल्या तर सर्वाधिक अडचण राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये असलेले दीर नितीन पवार यांची होणार आहे. नितीन पवार कळवण मतदारसंघातुन विधानसभेसाठी इच्छुक आहेत. त्यामुळे भारती पवार यांचा पराभव झाला तरच त्यांची निवडणूक सोपी ठरेल असे चित्र आहे. 

पवार कुटुंबीय राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात आहे. नितीन पवार, त्यांच्या पत्नी व जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा जयश्री पवार आणि डॉ. भारती पवार हे तिघेही जिल्हा परिषद सदस्य आहेत. मात्र, त्यांच्यातुन विस्तवही जात नाही एव्हढे तीव्र मतभेद आहेत. हे मतभेद त्यांच्या राजकीय करिअरलाही मारक ठरले आहेत. त्यामुळे अनेक ज्येष्ठ नेत्यांनी त्यांच्यात मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला मात्र काही उपयोग झाला नाही. त्याचा फटका बसून डॉ. भारती पवार यांना राष्ट्रवादी कॉंग्रेसची लोकसभेची उमेदवारी गमवावी लागली. ऐनवेळी भाजपने त्यांना उमेदवारी दिली. त्यानंतर नितीन पवार यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे धनराज महाले यांच्यासाठी प्रचंड मेहनत घेतली. विशेषतः कळवण आणि सुरगाणा या मतदारसंघात त्यांनी अक्षरशः तळ ठोकला होता. अशा स्थितीत त्यांच्या वहिनी व भाजपच्या उमेदवार भारती पवार खासदार झाल्यास विधानसभा निवडणुकीच्या उमेदवारीतही त्यांच्याकडून असाच अडथळा आनला जाऊ शकतो. मुख्य म्हणजे डॉ. पवार आपली खासदारकी दीर नितीन पवार यांच्या विधानसभा निवडणुकीतील पराभवासाठी पणाला लावण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे जर भाजपच्या डॉ. पवार लोकसभेची निवडणुक जिंकल्या तर राष्ट्रवादी कॉंग्रेसमधील दीर नितीन पवार यांची कोंडी होण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे सध्या जिल्हा परिषदेत या राजकीय भाऊबंदकीवर चर्चा रंगली आहे. 

लोकसभा निवडणुकीचे मतदान संपले. मतमोजणीची सगळ्यांना प्रतिक्षा आहे. निकालानंतर बरेच समीकरणे जुळतील काही बिघडतील. सध्या जिल्हा परिषदेतील विविध पक्षांतील अनेक सदस्य विधानसभेसाठी इच्छुक आहेत. त्यामुळे ते सगळे मोर्चेबांधणीत व्यस्त आहे. मिनी मंत्रालय असलेल्या जिल्हा परिषदेत कोणीही फिरकत नाही. यामध्ये प्रामुख्याने शिवसेनेचे ज्येष्ठ नेते भास्कर गावित, संभाजी पवार, भारतीय जनता पक्षाचे गटनेते डॉ. आत्माराम कुंभार्डे, सभापती मनिषा पवार आणि त्यांचे पती माजी सदस्य रत्नाकर पवार, सदस्या सिमंतिनी कोकाटे, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नितीन पवार, अपक्ष सदस्य यतिन कदम, कॉंग्रेसच्या अश्‍विनी आहेर यांची नावे आघाडीवर आहेत. याशिवाय विविध सदस्य उमेदवारीसाठी इच्छुक आहेत. त्यांची सगळ्यांची तयारी सुरु आहे. मात्र, चर्चा आहे ती पवार कुटुंबीयांतील भारती पवार व नितीन पवार यांच्यातील शह, काटशहाचीच!

राजकीय घडामोडींच्या बित्तंबातमीसाठी - www.sarkarnama.in
सरकारनामा ट्वीटर - https://twitter.com/MySarkarnama
सरकारनामा फेसबूक- https://www.facebook.com/MySarkarnama/ 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com