14th April, stay home and celebrate Ambedkar Jayanti ! Appeal of Ramdas athawale | Sarkarnama

14 एप्रिलरोजी घरी थांबूनच आंबेडकर जयंती साजरी करू या ! रामदास आठवलेंचे आवाहन 

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 27 मार्च 2020

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी हातावर पोट असणाऱ्या कामगारांसाठी 1 हजार 70 लाख कोटींचे पॅकेज जाहीर करून गरिबांना नवी संजीवनी दिली आहे असे सांगत भारत सरकारच्या या निर्णयाचे रामदास आठवले यांनी स्वागत केले आहे. 

मुंबई : कोरोनाविरुद्धचा मुकाबला जिंकल्यानंतर 14 एप्रिलनंतर आपण भीम जयंती साजरी करूया; त्या आधी कोरोना विरुद्ध चे युद्ध जिंकण्याचा संकल्प करा; संयम ठेऊन घरीच थांबा असे आवाहन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले आहे. 

कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी येत्या 14 एप्रिल पर्यंत जनता कर्फ्यु लावला आहे. कोरोना हा साथीचा रोग गर्दीतून अधिक पसरतो. त्यामुळे आता सार्वजनिक उत्सव साजरे करण्याची ही वेळ नाही.

कोरोना या महामारी विरुद्ध लढण्याची ही वेळ आहे. त्यामुळे या वर्षी 14 एप्रिल रोजी येणारी भीम जयंती घरी थांबूनच साजरी करू या असेही ते म्हणाले. 

दरवर्षी महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती धुमधडाक्‍यात साजरी होते. यावर्षी मात्र सार्वजनिक कार्यक्रम साजरा करण्याची वेळ नाही. यंदा गुढी पडव्याच्याही शोभायात्रा रद्द झाल्या आहेत.

सर्व सार्वजनीक कार्यक्रम रद्द करावेत आणि घरीच जनतेने राहून येत्या 14 एप्रिल पर्यंत 21 दिवसांचा जनता कर्फ्यु यशस्वी करावा असे सांगत आपणच आहोत "आपले रक्षक नका होऊ स्वतःचे भक्षक' असे काव्यात्मक आवाहन आठवले यांनी केले आहे. 

कोरोना महामारी मुळे हातावर पोट असणारे असंघटित कामगार ;गोर गरीब झोपडीवासीयांचे रोजंदारी मजुरांची आर्थिक स्थिती बिकट आहे.ज्यांनी कर्ज घेतले आहे

अशा लोकांचे मासिक हफ्ते भरण्यास बॅंकांनी मार्च आणि एप्रिल महिन्याची सूट द्यावी. दोन महिन्यांचे रेशन अन्नधान्य गरिबांना मोफत द्यावे. त्यासाठी केंद्र सरकार ने मदत जाहीर केली आहे आता खाजगी उद्योगपती ;उद्योजकांनी सीएसआर फंडातून गरिबांना मदत करावी असे असेही आठवले यांनी म्हटले आहे. 
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store


संबंधित लेख