| Sarkarnama

अमित शहा घेणार राज ठाकरे यांची भेट ?

सरकारनामा ब्युरो
शनिवार, 17 जून 2017

आता याच पार्श्वभूमीवर येणाऱ्या निवडणुकांसाठी मनसे आपली पक्ष बांधणी मजबूत करताना दिसत आहे. परंतु देश व राज्यात असलेली ही मोदी लाट सहजासहजी जाणार नाही याची कल्पनाही राज ठाकरे यांना आहे. रविवारी अमित शहा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहेत.

मुंबई : अमित शहांच्या तीन दिवसीय मुंबई दौऱ्याचे वेळापत्रक सगळ्यांकडे फिरत आहे. असे असले तरीही मनसे पक्षप्रमुख राज ठाकरे यांच्याशी होणाऱ्या भेटीबाबत कुठेही उल्लेख आढळत नाही. त्यामुळे शहा यांची राज यांच्याबरोबर आज गुप्त भेट होणार आहे. असे विश्वसनीय सूत्रांकडून सांगण्यात आले. मात्र भाजपच्या गोटात यासंबंधी चौकशी केली असता अध्यक्षांची आणि राज ठाकरे यांची भेट ठरली नसल्याचे सांगण्यात आले. राज यांच्याबरोबरच्या या भेटीला पक्षपातळीवरून दुजोरा मिळाला नाही.  

सध्या राज ठाकरे यांच्या स्थानिक पातळीवर मनसे पदाधिकाऱ्यांबरोबर बैठका आहेत. साधारण 13 जून ते 4 जुलै पर्यंत मुंबईतील सगळ्याच भागात नगरसेवक, शाखाप्रमुखांबरोबर राज यांच्या नियोजित बैठका आहेत. या बैठकांदरम्यानच राज ठाकरे यांची अमित शहा यांच्यासोबत भेट होणार असल्याची शक्‍यता सूत्रांकडून वर्तविण्यात आली आहे. 

मोदींना देशाचे पंतप्रधान करा, असे राज ठाकरे यांनी 2014 मध्ये उघडपणे सांगून भाजपला पाठिंबा दिला होता. राज ठाकरेंच्या या घोषणेचे भाजपने जोरदार स्वागत केले. त्यावेळी मनसेने लोकसभेत आपले उमेदवार उभे करू नयेत व भाजपला पाठिंबा द्यावा. असे भाजप नेते नितीन गडकरी यांनी ठाकरे यांना आवाहन केले होते. विरोधी पक्ष म्हणून राज ठाकरे यांनी सरकारला कितीही कानपिचक्‍या दिल्या असल्या तरीही राज यांचे भाजप प्रेम कधीही लपून राहिले नाही. 

आता याच पार्श्वभूमीवर येणाऱ्या निवडणुकांसाठी मनसे आपली पक्ष बांधणी मजबूत करताना दिसत आहे. परंतु देश व राज्यात असलेली ही मोदी लाट सहजासहजी जाणार नाही याची कल्पनाही राज ठाकरे यांना आहे. रविवारी अमित शहा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहेत. विधानसभेत मनसेचा एक आमदार असल्यामुळे राष्ट्रपती निवडणुकीसाठी त्या एका मताला किंमत आहे. तसेच भाजपला मनसेशी मैत्रीपुर्ण संबंध टिकून ठेवणे गरजेचे असल्यामुळे शहा राज यांची भेट घेणार असल्याचे समजते. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख