आमदार बच्चू कडू लवकरच स्वतःच्या घरात जाणार !

आमदार बच्चू कडू लवकरच स्वतःच्या घरात जाणार !

अकोला : सलग तिसऱ्यांदा आमदारकी...मतदार संघाला कोट्यवधीचा विकास निधी...तरीही चौदा वर्षांपासून भाड्याच्या खोलीत आमदार असलेली व्यक्ती राहत असेल, यावर कोणाचा विश्वास बसणार नाही. मात्र, आपल्या अफलातून आंदोलनांनी केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण देशाचे लक्ष वेधणाऱ्या प्रहार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आमदार बच्चू कडू यांच्या जीवनातील हे वास्तव आहे.

आयुष्यभर अपंग, निराधारांना आधार देणाऱ्या बच्चू कडू यांचे हक्काच्या घराचे स्वप्न आता लवकरच पूर्ण होणार आहे. अमरावती जिल्ह्यातील कुरळ पुर्णा येथे त्यांच्या स्वतःच्या घराचे बांधकाम सुरू करण्यापूर्वी आज भूमीपूजन करण्यात आले. 

महाराष्ट्रातील राजकीय पलटावर बच्चू कडू म्हणजे एक वेगळेच रसायन म्हणून ओळखले जाते. शेतकरी, मजूर, कामगार, कर्मचारी आणि सर्वसामान्य जनतेच्या न्याय हक्कासाठी अनेक नावीन्यपूर्ण आंदोलने करून अन्यायग्रस्तांना न्याय मिळवून देण्यासाठी त्यांची नेहमीच धडपड सुरू असते.

प्रहार संघटनेच्या माध्यमातून होणारी आंदोलने लक्षवेधी ठरतात, हा संपूर्ण महाराष्ट्राचा अनुभव आहे. त्यामुळेच वंचितांना न्याय मिळवून देणाऱ्या बच्चू कडू यांच्या अशा कार्यशैलीमुळेच मतदारांनी त्यांना सलग तिसऱ्यांदा विधानसभेत पाठविले.

आमदार झाल्यावर अनेक राजकीय पुढारी गडगंज संपत्तीचे मालक बनतात, हे अनेक पुढाऱ्यांच्या राजकीय जीवनावरून पहावयास मिळते. मात्र, सलग तिसऱ्यांदा आमदारकी भुषविणारे आमदार बच्चू कडू गेल्या चौदा वर्षांपासून भाड्याच्या खोलीतच राहत आहेत.

कोट्यवधीचा विकास निधी मिळत असूनही त्यातून स्वतःसाठी दमडीही न घेणाऱ्या बच्चू कडू यांचे स्वतःच्या घराचे स्वप्न आता लवकरच पूर्ण होणार आहे. कुरळ पूर्णा येथे त्यांच्या नवीन घराच्या बांधकामापूर्वी आज विधिवत भूमीपूजन करण्यात आले. या घरात अपंग, अनाथ व वृद्धांची व्यवस्था करण्यात येणार असल्याने अनेक निराधारांना आधार मिळणार आहे. 


माझं घर अपंग, अनाथ व वृद्धांचा आधार 
स्वतःचे घर असावं हे प्रत्येक सामान्य माणसाचे स्वप्न असते. तुकोबारायांनी म्हटल्या प्रमाणे "हे विश्वची माझे घर' या ओळीस साजेसे घर मला हवे होते. याकरिता पुर्णामाय, अपंग, अनाथ व वृद्ध पुनर्वसन केंद्रात (कुरळ पुर्णा) येथे स्वतःच्या घराचे भूमीपूजन करण्यात आले. आतापर्यंत भाड्याच्या घरात राहत आलो. परंतु उर्वरित आयुष्य अपंग, अनाथ व वृद्धांचा आधार व कुटुंबातील हिस्सा म्हणून हक्काने जगणार असल्याची भावना आमदार बच्चू कडू यांनी व्यक्त केली. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com