मुंबईचे महापौर महाडेश्वरांसह अकरा नगरसेवक आमदारकीच्या शर्यतीत  - 11 BMC corporators are contesting assembly election | Politics Marathi News - Sarkarnama

मुंबईचे महापौर महाडेश्वरांसह अकरा नगरसेवक आमदारकीच्या शर्यतीत 

सरकारनामा
गुरुवार, 10 ऑक्टोबर 2019

2014 च्या विधानसभेसाठी जवळपास सत्तावीस नगरसेवकांनी निवडणूक लढविली होती मात्र त्यापैकी पाचच नगरसेवकांचे आमदारकीचे स्वप्न पूर्ण होऊ शकले होते .

गोरेगाव  : मुंबई महानगर पालिकेच्या नगरसेवक पदावरून आमदारकीचे स्वप्न उराशी बाळगून , आपल्या पक्ष नेतृत्वाकडून विधानसभेचे तिकीट पदरात पडून घेऊन आज पर्यंत अनेक नगरसेवक आमदार झाले आहेत .

याच महिन्यात पार पडत असलेल्या विधानसभेच्या निवडणुकीतही जवळपास अकरा नगरसेवक आपले आमदारकीचे स्वप्न पूर्ण करण्याच्या तयारीत असून निवडणुकीला सामोरे जात आहेत .

सर्वात वर नाव महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांचे असून वांद्रे पूर्व विधानसभेतून सध्याच्या आमदार असलेल्या तुप्ती सावंत यांना बाजूला करीत महाडेश्वर यांनी आमदारकीचे तिकीट आपल्या पदरात पडून घेतले आहे .

भांडूपचे आमदार अशोक पाटील यांच्या जागी पालिकेच्या स्थायी समितीचे माजी अध्यक्ष रमेश कोरगावकर यांना तिकीट देण्यात आले आहे .

मनसेतून शिवसेनेत आलेल्या दिलीप लांडे मामांना सुधार समिती नंतर चांदिवली विधानसभेचे तिकीट मिळाले आहे .

वर्सोव्यातून चर्चेत असणाऱ्या सेनेच्या नगरसेविका राजुल पटेल यांनी वर्सोव्याच्या भाजपा आमदार डॉ . भारती लव्हेकरांना आव्हान दिले आहे .

काही दिवसांपूर्वी भाजपाच्या अनुशासनतेच्या गुणाला हरताळ फासणाऱ्या घटनेद्वारे संपूर्ण राज्याचे लक्ष वेधणाऱ्या भाजपाचे नगरसेवक पराग शहा यांनी तर भाजपाचे मातब्बर माजी मंत्री व हेविवेट नेते प्रकाश मेहता यांचे तिकीट कापीत स्वताच्या पदरात विधानसभेचे तिकीट पडून घेत मोठी खळबळ माजवून दिली . 

 तर भाजपाचे  हेविवेट असलेल्या आशिष शेलार यांच्या विरुद्ध कॉंग्रेसने आसिफ झकारिया यांना मैदानात उतरविले आहे . 

अंधेरीतून ( पूर्व ) जगदीश अमीन कुट्टी , मानखुर्द शिवाजी नगर मधून सुफियान नियाज वणू तर समाजवादी परतीच्या रइस शेख यांनी भायखळा विधानसभा क्षेत्रासाठी अगोदर पासून तयारी चालविली होती असे बोलले जात होते , मात्र अचानक ते भिवंडीकडे गेले .

दगडी चाळीच्या आखिल भारतीय सेना नगरसेविका गीता गवळी यांनीही भायखळ्या मधून आपले नशीब आजमाविण्याचे ठरविले आहे . मनसेचे एकमात्र नगरसेवक यांनी सेनेच्या आमदार संजय पोतनीस यांच्या पुढे कालिना विधानसभेतून आव्हान उभे केले आहे .

तज्ञांच्या मते 2014 च्या विधानसभेसाठी जवळपास सत्तावीस नगरसेवक नगरसेविकांनी निवडणूक लढविली होती मात्र त्यापैकी पाचच नगरसेवकांना आमदारकी चे स्वप्न पूर्ण होऊ शकले होते . महाआघाडी विरुद्ध युती असेच आताही नगरसेवकांच्या निवडणूक संग्रामाचे स्वरूप आहे .
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख