"वाडिया'वरून शिवसेना-मनसेत चुरस  | Sarkarnama

"वाडिया'वरून शिवसेना-मनसेत चुरस 

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 16 जानेवारी 2020

मुंबई : परळ येथील वाडिया रुग्णालय प्रकरणात शिवसेना आणि मनसे यांच्यात चुरस पाहायला मिळत आहे. मनसेकडून राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांनी आंदोलन केल्यानंतर बुधवारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली. शिवसेनेच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन 46 कोटी रुपये वाडिया ट्रस्टकडे वळते केले. 

मुंबई : परळ येथील वाडिया रुग्णालय प्रकरणात शिवसेना आणि मनसे यांच्यात चुरस पाहायला मिळत आहे. मनसेकडून राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांनी आंदोलन केल्यानंतर बुधवारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली. शिवसेनेच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन 46 कोटी रुपये वाडिया ट्रस्टकडे वळते केले. 

मुंबई महापालिका आणि राज्य सरकारकडून अनुदान येत नसल्याचे कारण देत वाडिया ट्रस्टने रुग्णसेवा खंडित करण्यास सुरुवात केली. त्यामुळे रुग्णांची होणारी फरफट लक्षात घेत सामाजिक संस्थांसह राजकीय पक्षांनी आंदोलन पुकारले. मनसेने शर्मिला ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली वाडिया रुग्णालयाबाहेर निदर्शने करून प्रशासनाशी चर्चा केली. त्यानंतर शर्मिला ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेऊन वाडिया ट्रस्टचे थकीत अनुदान देण्याची विनंती केली. 

शिवसेनेनेही महापौर किशोरी पेडणेकर यांच्या नेतृत्वाखाली बैठकांचा सपाटा सुरू केला. मनसेचे शिष्टमंडळ मंत्रालयात पोहोचण्याच्या आधीच त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी महापालिका प्रशासन व वाडिया ट्रस्ट यांच्यासोबत बैठक गेतली. ट्रस्टला महापालिकेकडून 22 कोटी आणि राज्य सरकारकडून 24 कोटी रुपये तात्काळ देण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर प्रसार माध्यमांशी बोलताना महापौर किशोरी पेडणेकर यांनी उर्वरित अनुदान आणि प्रलंबित प्रश्‍नांबाबत आठवडाभरात निर्णय घेणार असल्याचे स्पष्ट केले. 

चौकशी समिती नेमण्याची घोषणा 
वाडिया ट्रस्ट आणि महापालिका यांच्यातील कारारनाम्यामधील अटी-शर्तींचे उल्लंघन करण्यात आले आहे. वाडिया ट्रस्टमध्ये अनेक बाबतीत अनियमितता दिसून येत आहे. यासंदर्भात चौकशी करण्यासाठी आठवडाभरात समिती नेमण्यात येईल. त्यानंतर पुढील निर्णय घेण्यात येतील, अशी माहिती महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिली. चौकशीत दोषी आढळलेल्यांवर कारवाई करण्याचा इशाराही त्यांनी दिला. 

शर्मिला ठाकरे-अजित पवार भेटीवरून कुजबुज 
मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला यांनी बुधवारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी चर्चा केली. यावेळी मंत्रालयात उपस्थित असलेले मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महापालिका, वाडिया ट्रस्ट आणि कर्मचारी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांसोबत बैठक बोलावली होती. 

त्यामुळे शर्मिला ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांऐवजी उपमुख्यमंत्र्यांची भेट घेतल्याबाबत आश्‍चर्य व्यक्त करण्यात येत आहे. यामागे कौटुंबिक कलहाचे कारण असल्याची कुजबुज मंत्रालय परिसरात ऐकायला मिळाली. दरम्यान, "कौटुंबिक कलहाचा कोणताही विषय नाही', असे शर्मिला यांनी स्पष्ट केले. अजित पवार राज्याचे अर्थमंत्री असल्याने अनुदानाचा विषय त्यांच्या अखत्यारीत येतो. म्हणून त्यांची भेट घेतली, असे त्या म्हणाल्या.  

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख