zilla Parishad Nashik NCP lady member fell unconscious after goon Attacked Her | Sarkarnama

राष्ट्रवादी जिल्हा परिषद सदस्या गुंडाने पोलिस ठाण्यातच गळा दाबल्याने बेशुद्ध

सरकारनामा ब्युरो
शनिवार, 4 ऑगस्ट 2018

देवळा येथील राष्ट्रवादीच्या एका जिल्हा परिषद महिला सदस्याचा सोशल मिडीयावर अवमानकारक संदेश टाकुन विनयभंग करण्यात आला. यावेळी पोलिस ठाण्यात तक्रार देण्यास गेलेल्या महिलेस संबंधीत संशयीत आरोपीने पोलिसांसमोरच शिवीगाळ करीत गळा दाबला. त्यात त्या बेशुध्द झाल्या. एव्हढेच नव्हे तर संशयिताला स्थानिक समर्थक सर्वांसमक्ष घेऊन गेले.​

नाशिक : देवळा येथील राष्ट्रवादीच्या एका जिल्हा परिषद महिला सदस्याचा सोशल मिडीयावर अवमानकारक संदेश टाकुन विनयभंग करण्यात आला. यावेळी पोलिस ठाण्यात तक्रार देण्यास गेलेल्या महिलेस संबंधीत संशयीत आरोपीने पोलिसांसमोरच शिवीगाळ करीत गळा दाबला. त्यात त्या बेशुध्द झाल्या. एव्हढेच नव्हे तर संशयिताला स्थानिक समर्थक सर्वांसमक्ष घेऊन गेले. याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला आघाडीने आक्रमक होत पोलिस महासंचालकांकडे कारवाई करण्याची मागणी केली आहे. 

यासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीच्या जिल्हा अध्यक्षांनी विशेष पोलिस महानिरीक्षकांना निवेदन दिले आहे. पक्षाच्या जिल्हा परिषद महिला सदस्याचा अशोक आहेर यांनी सोशल मिडीयावर संदेश पाठवुन विनयभंग केला. त्याबाबत त्या कुटुबियांसमवेत पोलिस ठाण्यात गेल्या. मात्र चार ते पाच तास ताटकळत ठेवत त्यांची तक्रार नोंदविण्यास टाळाटाळ झाली. नागरिकांचा दबाव वाढल्यावर पोलिसांनी संबंधीत संशयित आहेर यांना पोलिस ठाण्यात आणले. मात्र, तेथेही त्याने महिलेस मारहाण करीत गळा दाबला. त्यात त्या जिल्हा परिषद सदस्या बेशुध्द झाल्या. त्यावरुन महिलांनी पोलिस अधिकाऱ्यांना दूषणे देत गोंधळ केला. याचवेळी संशयिताच्या समर्थक स्थानिक नेत्याने पोलिस उपअधिक्षकाशी चर्चा केली आणि त्याला ते घेऊन गेले. 

याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला आघाडीच्या जिल्हा अध्यक्षा अॅड. प्रेरणा बलकवडे यांनी विशेष पोलिस महानिरीक्षकांची भेट घेऊन निवेदन दिले. यावेळी पुरषोत्तम कडलग, नंदन भास्करे, सायरा शेख, मंगल भालेराव आदी पदाधिकारी उपस्थित होते. या प्रकरणाने देवळा परिसरात खळबळ उडाली आहे. संशयीत आहेर याच्या विरोधात पोलिसांत विविध गुन्हे दाखल असल्याचे संबंधितांनी सांगीतले. 

जिल्हा परिषद सदस्यावर असा अन्याय होत असेल तर सामान्यांची स्थिती काय होईल. याबाबत पोलिसांनी स्थानिक आमदाराच्या दबावामुळे गुन्हेगारांना पाठीशी घातले. हे अत्यंत निषेधार्ह आहे. वरिष्ठांकडे तक्रार केल्यावर गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. मात्र, संबंधीतांवर कडक कारवाई व्हावी.- अॅड. प्रेरणा बलकवडे, जिल्हाध्यक्षा, राष्ट्रवादी कॉंग्रेस महिला आघाडी. 
 

संबंधित लेख