झांबड - सत्तार यांचे झाले मनोमिलन, कार्यकर्त्यांमध्ये या दिलजमाईचीच चर्चा

झांबड - सत्तार यांचे झाले मनोमिलन, कार्यकर्त्यांमध्ये या दिलजमाईचीच चर्चा

औरंगाबाद : कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार अब्दुल सत्तार व औरंगाबाद-जालना स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाचे आमदार सुभाष झांबड यांच्यात सुरू असलेला संघर्ष संपल्याची चिन्हे आहेत. सप्टेंबर महिन्यात काढण्यात आलेल्या यल्गार यात्रेपासून या दोघांमधील संबंध बिघडले होते. अगदी प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांच्यासह राज्य व केंद्रातील नेत्यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या संघर्ष यात्रेकडेदेखील झांबड यांनी पाठ फिरवली होती. पण तब्बल चार महिन्यांनी औरंगाबाद पश्‍चिम विधानसभा मतदासंघातील एका कार्यकर्ता मेळाव्यात सत्तार-झांबड मांडीला मांडी लावून बसतांना दिसले. 

औरंगाबाद लोकसभा मतदारसंघाचे संभाव्य उमेदवार म्हणून आमदार सुभाष झांबड यांच्या नावाची जेव्हापासून चर्चा सुरू झाली तेव्हापासूनच सत्तार आणि झांबड यांच्यात खटके उडायला लागले होते. पण राज्यात कॉंग्रेसची संघर्ष यात्रा सुरू असतांनाच अब्दुल सत्तार यांनी जिल्ह्यात यल्गार यात्रा काढत त्याची सुरूवात आपल्या सिल्लोड-सोयगांव मतदारसंघापासून केली. सुभाष झांबड यांनी सत्तार यांना या यात्रेसाठी तन-मन-धनाने मदतही केली. पण शहरातील महापालिका प्रभागातून काढण्यात येणाऱ्या यात्रेच्या नियोजनावरून सत्तार आणि झांबड यांच्या बिनसले. सत्तार यांनी चारचौघांमध्ये झांबड यांना सुनावल्यामुळे कमालीचे नाराज झालेले झांबड पुन्हा यल्गार आणि संघर्ष यात्रेकडे फिरकले नाही. 

दरम्यान, कॉंग्रेसने केलेल्या अंतर्गत सर्व्हेनूसार औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातून सुभाष झांबड निवडून येऊ शकत नाही हे स्पष्ट झाल्यामुळे पक्ष त्यांना उमेदवारी देणार नाही असे अब्दुल सत्तार यांनी प्रसार माध्यमांसमोरच जाहीर केले. या प्रकाराने आगीत तेल ओतण्याचा प्रयत्न केला. सत्तार यांचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांचे घनिष्ठ संबंध असल्यामुळे आपल्या लोकसभा उमेदवारीत ते खोडा घालू शकतात हे ओळखूनच झाबंड यांनी माजी मुख्यमंत्री व दिल्ली दरबारी वजन असलेल्या पृथ्वीराज चव्हाण यांना साकडे घातले. 

परिणामी मुंबईत झालेल्या लोकसभा इच्छुकांच्या मुलाखतीला या असा थेट फोन अशोक चव्हाण यांनीच झांबड यांना केला. पृथ्वीराज चव्हाण यांनी केलेली शिष्टाई फळाला आली पण त्यामुळे सत्तार आणि झांबड यांच्याती संबंध अधिकच बिघडले. महाराष्ट्राचे प्रभारी संपत कुमार यांनी नुकताच औरंगाबाद लोकसभा व मराठवाड्यातील इतर मतदारसंघाचा आढावा घेतला. तेव्हा देखील पत्रकारांनी झांबड यांच्याविषयी प्रश्‍न विचारताच सत्तार याचा पारा चढला होता. या पार्श्‍वभूमीवर गेल्या चार महिन्यात झांबड हे सत्तार यांच्यापासून चार हात अंतर राखूनच होते. 

झांबड यांचे टाळ्यांनी स्वागत करा.. 
औरंगाबाद पश्‍चिम मतदारसंघातील साजापूर येथे सोमवारी रात्री कॉंग्रेस कार्यकारणी सदस्यांना नियुक्तीपत्र वाटप आणि कार्यकर्त्यांच्या मेळाव्याचे आयोजन तालुकाध्यक्ष सर्जेराव चव्हाण यांनी केले होते. जिल्हाध्यक्ष अब्दुल सत्तार, शहराध्यक्ष नामदेव पवार, कार्याध्यक्ष डॉ. कल्याण काळे यांची यावेळी उपस्थिती होती. कार्यकारणी पदाधिकाऱ्यांना प्रमाणपत्रांचे वाटप सुरू असतांनाच सुभाष झांबड यांचे कार्यक्रमस्थळी आगमन झाले. यावेळी अब्दुल सत्तार भाषण करत होते. भाषण थांबवून "आमदार सुभाष झांबड यांचे इथे आगमन झाले आहे, त्यांचे टाळ्यांच्या गजरात स्वागत करा' असे आवाहन त्यांनी उपस्थितांना केले आणि टाळ्याचा कडकडाट झाला. सत्तार यांचे समारोपीय भाषण सुरू असल्यामुळे काही प्रमाणपत्रांचे वाटप पुन्हा झांबड यांच्या हस्ते करण्यात आले. 

एवढ्यावर न थांबता सत्तार यांनी झांबड यांना भाषण करण्याचा आग्रह देखील केला. पण तुम्ही अध्यक्ष म्हणून भाषण केल्यामुळे पुन्हा मी बोलणे योग्य नाही असे म्हणत झांबड यांनी त्यास नम्रपणे नकार दिला. तेव्हा मी अध्यक्ष म्हणून तुम्हाला सांगतो असे सांगून त्यांनी झांबड यांना भाषण करायला लावले. अचानक झालेल्या या मनोमिलनाची उपस्थितांमध्ये देखील चांगलीच चर्चा रंगली होती. 


 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com