कॉंग्रेसच्या आढावा बैठकीकडे सत्तारांची पाठ, औरंगाबादेतून झांबड यांच्या नावाला पसंती

 कॉंग्रेसच्या आढावा बैठकीकडे सत्तारांची पाठ, औरंगाबादेतून झांबड यांच्या नावाला पसंती

औरंगाबाद : मुंबईच्या टिळक भवन या कॉंग्रेस पक्ष कार्यालयात राज्यातील 48 लोकसभा मतदारसंघाचा आढावा प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण, महाराष्ट्राचे प्रभारी मलिक्कार्जुन खारगे यांच्या उपस्थितीत घेण्यात येत आहे. आज मराठवाड्यातील आठ लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेण्यात आला. औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातून विधान परिषदेचे आमदार सुभाष झांबड यांच्या नावाला जिल्ह्यातील कॉंग्रेस पदाधिकाऱ्यांनी पसंती दिल्याचे समजते. जिल्हाध्यक्ष आमदार अब्दुल सत्तार यांनी आढावा बैठकीकडे पाठ फिरवली आहे, यामागे झांबड आणि सत्तार यांच्यातील वाद हे कारण असल्याचे बोलले जाते. 

औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातून कॉंग्रेसची उमेदवारी कुणाला द्यावी यावरून सध्या कॉंग्रेसमध्ये वाद सुरू आहेत. औरंगाबाद-जालना स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाचे विद्यमान आमदार सुभाष झांबड लोकसभा लढवण्यास इच्छूक आहे. जिल्ह्यातून देखील झांबड यांनाच उमेदवारी द्यावी अशी मागणी त्यांच्या समर्थकांकडून करण्यात आली आहे. कॉंग्रेस जिल्हाध्यक्ष आमदार अब्दुल सत्तार हे देखील झांबड यांच्या नावाला अनुकूल होते. पक्षाकडे आपण झांबड यांच्या नावाची शिफारस केली असल्याचे त्यांनी जाहीरपणे सांगितले होते. परंतु जिल्ह्यातील एल्गार यात्रा आणि शहरातून कॉंग्रेस आपल्या दारी या मोहिमेदरम्यान, नियोजनावरून झांबड आणि सत्तार यांच्यात वादावादी झाली आणि तेव्हापासूनच सत्तार यांनी झांबड यांच्या नावाला विरोध केल्याचे बोलले जाते. 

पक्ष आणि स्थानिक पातळीवरील अहवालाचा दाखला देत सुभाष झांबड औरंगाबादेतून निवडून येऊ शकत नाहीत असा दावा देखील सत्तार यांनी प्रसारमाध्यमांशी बोलतांना केला होता. तेव्हा पासून झांबड यांनी कॉंग्रेसच्या व्यासापीठावर जाणे बंद केले होते. अगदी जनसंघर्ष यात्रेच्या समारोप सभेकडे देखील ते फिरकले नव्हते. परिणामी सभा प्लॉप झाली आणि त्याचे खापर सत्तार यांच्या माथी फुटले. तेव्हापासून जिल्हा कॉंग्रेसमधील अतंर्गत लाथाळ्यांची चर्चा मोठ्या प्रमाण सुरू आहे. 

औताडे, पवारांनी सुचवले झांबड यांचे नाव 
औरंगाबाद लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेण्यात आला तेव्हा प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी जिल्ह्यातून आलेल्या कॉंग्रेस पदाधिकाऱ्यांकडे उमेदवारी कुणाला द्यावी याबाबत विचारणा केली. तेव्हा माजी जिल्हाध्यक्ष केशवराव औताडे, विद्यमान शहराध्यक्ष नामदेव पवार यांनी सुभाष झांबड यांचे नाव सुचवल्याची माहिती आहे. सुभाष झांबड यांनी गेल्या वर्षभरापासून जिल्ह्यात काम सुरू केले आहे. लोकांशी संपर्क वाढवत थेट भेटीवर त्यांनी जोर दिल्याचे आणि तेच औरंगाबादमधून निवडून येण्यास सक्षम असल्याचे यावेळी पक्षश्रेष्ठींना पटवून देण्यात आल्याचे समजते. 

ग्रामीण भागात कॉंग्रेसचा प्रभाव बऱ्यापैकी आहे, पण शहरावर विशेष लक्ष द्यावे लागेल अशा सूचना अशोक चव्हाणांनी जिल्ह्यातील कॉंग्रेस पदाधिकाऱ्यांना केल्या. तेव्हा सगळ्यांनी एकत्रितपणे काम केले तर कॉंग्रेसचा उमेदवार विजयी होऊ शकतो असा विश्‍वास पदाधिकाऱ्यांनी पक्षश्रेष्ठींना दिला. माजी आमदार डॉ. कल्याण काळे, जगन्नाथ काळे, सुभाष झांबड, मिलिंद पाटील, किरण पाटील डोणगांवकर, जितेंद्र देहाडे आदींची यावेळी उपस्थिती होती. जिल्हाध्यक्ष आमदार अब्दुल सत्तार यांनी मात्र टिळक भवनातील महत्वाच्या आढावा बैठकीकडे पाठ फिरवल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. विशेष म्हणजे सत्तार मुंबईत असून देखील बैठकीला का गेले नाहीत ? या विषयी अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com