Youth Congress yoga protest turns into laughter show | Sarkarnama


ब्रेकिंग न्यूज

विनोद तावडे कृष्णकुंजवर . राज ठाकरे आणि विनोद तावडे यांच्यात चर्चा .

औरंगाबादेत युवक कॉंग्रेसने केले  'निषेधासन' पण झाले 'हास्यासन' 

जगदीश पानसरे 
बुधवार, 31 ऑक्टोबर 2018

राफेलासन करतांना तोंडातून विमानाचा आवाज, गाजरासन करतांना घेतलेली मुद्रा हे पाहून आसन करण्यासाठी आलेल्या युवक कॉंग्रेस कार्यकर्त्यांनाच हासू आवरले नाही.

औरंगाबादः युवक कॉंग्रेसचे नुतन प्रदेशाध्यक्ष सत्यजीत तांबे यांच्या उपस्थितीत सकाळी शहरातील गांधी पुतळ्याजवर केंद्र व राज्यातील भाजप सरकार विरोधात 'निषेधासन' कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. वेगळ काही तरी करण्याच्या नादात मात्र निषेधानसनाचे 'हास्यासन' झाल्याचे पहायला मिळाले.

निरनिराळी आसन करतांना युवक कार्यकर्त्यांचे हावभाव आणि विचित्र अंगविक्षेप पाहून अखेर पदाधिकाऱ्यांनी 'रुद्रावतारासन' धारण करत काही कार्यकर्त्यांना हाकूलन दिल्याचा प्रकार देखील घडला. 

युवक कॉग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती झाल्यापासून सत्यजीत तांबे यांनी सरकारच्या विरोधात जोरदार आंदोलन राज्यभरात सुरू केले आहे. पेट्रोल-डिझेल दरवाढीच्या विरोधात पंट्रोल पंपपावर लावण्यात आलेल्या पंतप्रधान मोंदीच्या पोस्टरला काळे फासण्याचे त्यांचे आंदोलन चांगलेच गाजले होते. 

या आंदोलनाची चर्चा आणि त्याला मिळालेली प्रसिध्दी पाहता राज्यातील भाजप-सेना युती सरकारला चार वर्षपुर्ण झाल्याच्या पार्श्‍वभूमीवर पुन्हा 'निषेधासन' हे अभिनव आंदोलन करण्याचा निर्णय तांबे यांनी घेतला होता. संपुर्ण राज्यात एकाच वेळी सकाळी हे आंदोलन करण्याचे नियोजन करण्यात आले होते. 

स्वतः  सत्यजीत तांबे निषेधासनासाठी औरंगाबादेत आले होते. सकाळी साडेआठ वाजता शहागंज भागातील गांधी भवनासमोर टाकण्यात आलेल्या मंडपात पन्नास-शंभर युवक कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत निषेधासनाला सुरूवात झाली.

त्यासाठी गाद्या टाकण्यात आल्या होत्या. योगासने करण्यासाठी आधी किमान सरावाची आवश्यकता असते . ज्यांनी कधी योगासने केली नाहीत त्यांनी वेगळी  आसने  करत लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला . पण युवक कॉंग्रेसचा हा प्रयत्न  अंगलट आला. 

राफेलासन करतांना तोंडातून विमानाचा आवाज, गाजरासन करतांना घेतलेली मुद्रा हे पाहून आसन करण्यासाठी आलेल्या युवक कॉंग्रेस कार्यकर्त्यांनाच हासू आवरले नाही.

काहींनी तर वेडेवाकडे हातवारे आणि अंगविक्षेप करत आपल्याच आंदोलनाची खिल्ली उडवल्याचा प्रकार देखील यावेळी घडला. पदाधिकाऱ्यांच्या ही गोष्ट ध्यानात आल्यानंतर खिल्ली उडवणाऱ्या युवक कार्यकर्त्यांना त्यांनी हुसकावून लावले. त्यामुळे कॉंग्रेसच्या निषेधासनाचे शहरात हास्यासन झाल्याची चर्चा सुरू होती. 
 

संबंधित लेख