Youth congress starts fund raising drive | Sarkarnama


ब्रेकिंग न्यूज

नगरमध्ये डॉ. सुजय विखे जिंकले
रायगडात सुनील तटकरे जिंकले

युवक कॉंग्रेसचे कार्यकर्ते निवडणुकीसाठी पैसा जमवायला लागले  

जगदीश पानसरे 
बुधवार, 26 डिसेंबर 2018

.

औरंगाबादः युवक कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजीत तांबे यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या मराठवाडा विभागीय बैठकीत पक्षासाठी यथाशक्ती निधी देण्याचे आवाहन करण्यात आले. यावेळी औरंगाबाद युवक कॉंग्रेसचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष अब्दुल सत्तार यांनी पंचवीस हजारांचा धनादेश सत्यजीत तांबे यांच्याकडे देत या मोहिमेला सुरूवात केली. 

मोदी सरकारने केलेल्या नोटबंदीने अनेक राजकीय पक्षांचे कंबरडे मोडले आहे. आगामी निवडणुका लढवायच्या तर त्यासाठी पैसा आणायचा कुठून असा प्रश्‍न कॉंग्रेसह अनेक पक्षांना पडला आहे. 

या पार्श्‍वभूमीवर कॉंग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांकडून देशभरात कायदेशीररित्या पावती देऊन यथाशक्ती पक्षनिधी गोळा करण्याच्या सूचना पदाधिकारी कार्यकर्त्यांना देण्यात आल्या आहेत. त्यानूसार आजच्या बैठकीत सत्यजीत तांबे यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना यथाशक्ती पक्षनिधी देण्याचे आवाहन केले होते. 

आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुकीच्या तयारचा भाग म्हणून युवक कॉंग्रेसच्या वतीने औरंगाबादेतील मौलाना आझाद संशोधन केंद्रात मराठवाडा विभागाची बैठक आयोजित करण्यात आली होती.

युवक कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजीत तांबे, महाराष्ट्राच्या प्रभारी प्रतिभा रघुवंशी, सहप्रभारी मनिष चौधरी यांच्यासह मराठवाड्यातून मोठ्या संख्येने युवा कार्यकर्ते यावेळी हजर होते. 

चलो पंचायत अभियान, युवक कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष केशवचंद यादव यांच्या नेतृत्वाखाली निघणाऱ्या युवाक्रांती यात्रेच्या पुर्वतयारी संदर्भात उपस्थित कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यात आले. 

चलो पंचायत अभियान यशस्वी करण्यासाठी कार्यकर्त्यांनी तयारीला लागावे असे आवाहन करतांनाच तुम्ही पक्षासाठी काम करत आहात यासाठी तुम्हाला कुणाच्या प्रमाणपत्राची गरज नाही. 

पण जेव्हा आपण गावांत जाऊ तेव्हा युवक कॉंग्रेसचा कार्यकर्ता आमच्या मदतीला धावून येतो हे शब्द कानी आले पाहिजे तीच तुमच्यासाठी खरी पावती असेल ,असे सत्यजीत तांबे म्हणाले. राहूल गांधी यांचे हात बळकट करण्यासाठी पुढील 75 दिवस जोमाने कामाला लागा असे आवाहन देखील त्यांनी युवक कार्यकर्त्यांना केले.

संबंधित लेख