youth congress election complaint to rahul gadhi | Sarkarnama

युवक कॉंग्रेसमधील "भाईभतिजावादा'ची राहुल गांधींकडे तक्रार 

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 28 ऑगस्ट 2018

नागपूर : राज्यातील युवक कॉंग्रेसमध्ये नेत्यांच्या मुला-मुलींनाच प्राधान्य दिले जात आहे. सामान्य कार्यकर्त्यांना स्थान दिले जात नसल्यामुळे नाराज झालेल्या नागपूर जिल्ह्यातील कामठी येथील युवक नेत्याने कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधींकडे या "भाईभतिजावादा'ची तक्रार केली आहे. 

नागपूर : राज्यातील युवक कॉंग्रेसमध्ये नेत्यांच्या मुला-मुलींनाच प्राधान्य दिले जात आहे. सामान्य कार्यकर्त्यांना स्थान दिले जात नसल्यामुळे नाराज झालेल्या नागपूर जिल्ह्यातील कामठी येथील युवक नेत्याने कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधींकडे या "भाईभतिजावादा'ची तक्रार केली आहे. 

सध्या राज्यात युवक कॉंग्रेसची संघटनात्मक निवडणुकीची प्रक्रिया सुरू आहे. यासाठी महाराष्ट्र प्रदेश युवक कॉंग्रेसच्या अध्यक्षपदासाठी कामठी येथील युवक नेते नीरज लोणारे यांनी उमेदवारी अर्ज भरला होता. नीरज यांचा उमेदवारी अर्ज मात्र नाकारण्यात आला. त्यांच्याऐवजी नेत्यांच्या मुलांचे उमेदवारी अर्ज वैध ठरविण्यात आली. 

लोणारे यांची मुलाखतही झाली होती. ते कामठी नगरपरिषदेत कॉंग्रेसचे नगरसेवक आहेत. तसेच प्रदेश युवक कॉंग्रेसमध्ये ते सचिव आहेत. त्यांनी एनएसयूआयमध्ये काम केले आहे.

युवक कॉंग्रेसच्या अध्यक्षपदासाठी माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांचे नातेवाईक सत्यजित तांबे, माजी मंत्री नितीन राऊत यांचे सुपुत्र कुणाल राऊत, माजी मंत्री विजय वडेट्टीवार यांची कन्या शिवानी वडेट्टीवार यांना संधी मिळाली, परंतु कोणताही राजकीय वारसा नसताना कॉंग्रेसचा झेंडा उंच धरणाऱ्या लोणारे यांचा उमेदवारी अर्ज अवैध ठरविला आहे. 

या अन्यायाच्या विरोधात लोणारे यांनी थेट कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्याकडे तक्रार केली आहे. युवक कॉंग्रेसच्या राज्य प्रभारी प्रतिभा रघुवंशी यांच्याकडे तक्रार केली आहे. 

या संदर्भात "सरकारनामा'शी बोलताना नीरज लोणारे म्हणाले,"" राहुल गांधी यांनी सर्वसामान्यांपर्यंत कॉंग्रेस पोहोचली पाहिजे, असा विचार मांडला आहे. आम्ही कॉंग्रेस विविचाराचे आहोत. वयाच्या 18 व्या वर्षांपासून एनएसयूआयमध्ये काम करीत आहे. कामठी नगरपरिषदेत निवडून आल्यानंतरही अध्यक्षपदासाठी उमेदवारी नाकारल्याने मी नाराज झालो आहे. कॉंग्रेस पक्ष हा काही कुणा नेत्याचा नाही. हा पक्ष सर्वसामान्यांनी वाढविला आहे. यात सर्व जाती-धर्माचे लोक आहेत. त्यामुळेच मी या पक्षात आहे.'' 

संबंधित लेख