youth congress election | Sarkarnama

युवक कॉंग्रेसमध्ये पुन्हा घराणेशाही की सामान्यांना संधी ? 

सरकारनामा ब्युरो
रविवार, 26 ऑगस्ट 2018

पुणे : कॉंग्रेस हा घराणेशाही असलेला पक्ष आहे अशी टीका गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत नेहमीच केली जाते. त्याला आता महाराष्ट्रातील युवक कॉंग्रेसही अपवाद राहिलेला नाही असे दिसते आहे. लवकरच म्हणजेच येत्या सप्टेबरमध्ये होणाऱ्या युवक कॉंग्रेसच्या निवडणुकीची तयारी जोरात सुरू आहे. बड्या नेत्यांच्या मुलांनीच सर्वत्र फिल्डिंग लावल्याची तक्रार युवक कॉंग्रेसचे कार्यकर्ते करीत आहेत. सामान्य कुटुंबातील कार्यकर्त्यांना संधी केव्हा मिळणार असा सवालही केला जात आहे. 

युवक कॉंग्रेसच्या निवडणुकीसाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया सध्या सुरु आहे. युवक कॉंग्रेसच्या वेबसाईटवर प्रदेश कॉंग्रेस कमिटीच्या नामांकनासाठी पात्र असलेल्या उमेदवारांची नावे प्रसिद्ध करण्यात येत आहेत. या यादीत आतापर्यंत समावेश करण्यात आलेली नावे पाहता कॉंग्रेस नेत्यांचे बगलबच्चेच दिसून येत आहेत. 

युवक कॉंग्रेसच्या iyc.in या वेबसाईटवर प्रदेश कॉंग्रेस कमिटीच्या नामांकनासाठी पात्र असलेल्यांची नावे प्रसिद्ध करण्यात आली आहेत. यामध्ये ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांचे भाचे आणि विधान परिषदेचे आमदार सुधीर तांबे यांचे पूत्र सत्यजित तांबे, माजी आमदार सुभाष झनक यांचे पूत्र अमित झनक, माजी मंत्री नितीन राऊत यांचे पूत्र कुणाल राऊत, माजी मंत्री अब्दूल सत्तार यांचे पूत्र समीर सत्तार, माजी मंत्री विजय वडेट्टीवार यांची कन्या शिवानी वडेट्टीवार यांच्यासह विक्रम ठाकरे, नेहा निकोशे, नागसेन भेजते, महसूर खान, भुषण पांचलवार, स्वप्नील पाटील यांचा समावेश आहे. या यादीतील अनेक जण यापूर्वीच्या कमिटीमध्ये देखील सदस्य होते. 

लोकशाही प्रक्रियेने होणाऱ्या या निवडणुकीमध्ये कॉंग्रेसच्या बड्या नेत्यांची पुढची पिढी पदाधिकारी होत असल्याने सामान्य कुटूंबातील तरुणांना या पासून बाजूला राहावे लागेल अशी नाराजी अनेक कार्यकर्त्यांनी व्यक्त केली. कॉंग्रेसच्या या बड्या नेत्यांकडे असलेली यंत्रणा मतदार नोंदणीपासून मतदानापर्यंत आपल्या मुलांसाठी वापरल्या जात असल्याचे या कार्यकर्त्यांनी नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले. 

नव्या कमिटीमध्ये सामान्य व गरीब घरातील चेहऱ्यांना संधी मिळणार की प्रस्थापित पुढाऱ्यांच्या वारसदारांना संधी मिळते याकडे राज्याचे लक्ष लागून राहिले आहे.  

संबंधित लेख