समरजित...अंबरिष...विरेंद्र...कागलात युवा वारसदारांची हवा! 

या तिन्ही युवा नेत्यांची राजकीय चाल वेगवेगळी आहे.
समरजित...अंबरिष...विरेंद्र...कागलात युवा वारसदारांची हवा! 

कोल्हापूर :  कागल तालुक्‍यात सध्या युवा नेत्यांची चांगलीच हवा निर्माण झाली आहे. राजकारणाचा प्रबळ वारसा लाभलेले तीन युवा नेते सध्या तालुक्‍यासह जिल्ह्यात चर्चेचा विषय बनले आहेत. एकाच व्यासपीठावर येवून एकमेकांच्या खोडी काढणाऱ्या या युवा नेत्यांना एकत्र राहण्याचा सल्ला त्यांची मित्र मंडळी सोशल मिडीयातून देत आहेत. 

चर्चेत असलेल्या या युवा नेत्यात श्री शाहू सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन व पुणे म्हाडाचे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांचा समावेश आहे. कै. विक्रमसिंह घाटगे यांच्यापासून त्यांना राजकीय वारसा मिळाला आहे. एका टप्प्यावर सक्रीय राजकारणातून विक्रमसिंह घाटगे यांनी बाजुला राहण्याचा निर्णय घेतला होता. त्यांच्या पश्‍चात समरजितसिंह यांनी भाजपत प्रवेश केला. भाजपने त्यांना पुणे म्हाडाचे अध्यक्षही केले. घाटगे यांनी स्बळावर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढवून अनेकांची गोची केली. आता आगामी विधानसभेसाठी त्यांनी राष्ट्रवादीचे आमदार हसन मुश्रीफ यांच्या विरोधात दंड थोपटले आहेत. 

शिवसेनेचे माजी आमदार संजय घाटगे यांचे पुत्र, गोकुळचे संचालक आणि जिल्हा परिषदेच्या शिक्षण समितीचे सभापती अंबरिष घाटगे यांनीही राजकारणात आला दबदबा निर्माण केला आहे. ग्रामपंचायत, पंचायत समिती सभापती ते जिल्हा परिषद असा त्यांचा राजकारणाचा प्रवास आहे. युवा कार्यकर्त्यांची अत्यंत नेटकी फळी त्यांनी निर्माण केली आहे. याची झलक त्यांनी गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीत दाखवून दिली. कमी वयात राजकारणात त्यांनी चांगलीच मजल मारली आहे. आगामी विधानसभा निवडणुकीसाठी आबंरिष यांच्या नावाचाही चर्चा सुरु आहे. 

कागल तालुक्‍यातील तिसरे युवा नेतृत्व म्हणजे माजी खासदार सदाशिवराव मंडलिक यांचे नातू व शिवसेनेचे सहसंपर्कप्रमुख प्रा. संजय मंडलिक यांचे पुत्र विरेंद्र मंडलिक. मंडलिक प्रतिष्ठान, सदाशिवराव मंडलिक सहकारी साखर कारखान्याचे संचालक म्हणून काम ते करत आहेत. प्रा. मंडलिक लोकसभेची निवडणूक लढणार असून त्यांच्या निवडणुकीचे नियोजन विरेंद्र करत आहेत. यासाठी लोकसभा मतदा संघातील गावांना भेटी देवून, जुन्या कार्यकर्त्यांचे आशिर्वाद घेवून ते वडिलांचा प्रचार करत आहेत. जिल्हा परिषद निवडणुकीत पराभव होवून देखील, या पराभवाने खचून न जाता विरेंद्र यांनी आपली वाटचाल सुरुच ठेवली आहे. 

या तिन्ही युवा नेत्यांची राजकीय चाल वेगवेगळी आहे. तरीदेखील एकमेकाच्या कार्यक्रमांमध्ये ते सहभागी होतात. चेष्टा-मस्करी करतात. या तिन्ही नेत्यांच्या कार्यकर्त्यांना या सर्व गोष्टीचा अभिमान वाटतो. मात्र निवडणुका जाहीर झाल्या की हेच युवा नेते एकमेकाविरोधात तोफ डागण्यासही मागे पुढे पाहणार नाहीत. म्हणूनच कागलच्या आखाड्याचा अंदाज भल्याभल्याना येत नाही, असं म्हणतात ते उगाच नाही.
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com