yin yash work | Sarkarnama

व्हिजनसोबत काम करण्याची ताकद असल्यास नक्कीच यश मिळेल !

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 6 जून 2017

""करिअरच्या वाटा निवडताना पॅशनची गरज असतेच. स्टार्टअपच्या दृष्टीने मोठ्या पर्यायांचा विचार करण्यापेक्षा लहान पर्यायांपासून सुरवात करावी. आपण आपल्या संकल्पनांच्या प्रेमात न पडता त्या लोकांपर्यंत कशा पोचवता येतील, याचा विचार केला पाहिजे. आपले प्रयत्न प्रामाणिक असतील, तर स्टार्टअपला यश मिळेलच.

पुणे : ""नवनिर्मिती आणि नव्या प्रवाहामुळे तंत्रज्ञानाने प्रगतीचे शिखर गाठले आहे. या क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या तरुणांनी आणि नवउद्योजकांनी सतत बदलत्या प्रवाहानुसार नवनिर्मितीचा विचार करावा. व्हिजन आणि काम करण्याची ताकद असेल, तर आपण नक्कीच यशस्वी होऊ शकतो. त्यासाठी एक प्रभावी मनुष्यबळ, नवसंकल्पना आणि नवऊर्जेची निर्मिती करून उद्योग क्षेत्रात उतरा,'' असे आवाहन "सिम्बा'चे मुख्य कार्यकारी अधिकारी विटो मार्गिटो आणि "हेड ऑफ ग्रोथ' अल्बर्टो आयोरे यांनी सोमवारी केले. 

"सकाळ'च्या डिलिव्हरिंग चेंज फाउंडेशनच्या "यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्क (यिन)' व्यासपीठाने आयोजिलेल्या "यिन समर यूथ समिट' मध्ये मार्गिटो आणि आयोरे बोलत होते. "स्टार्टअप्स- द नेक्‍स्ट बिग थिंग' या विषयावर दोघांनी तरुणाईशी संवाद साधला. "यिन'चे प्रमुख तेजस गुजराथी या वेळी उपस्थित होते. 

"गुगल'चे माजी कर्मचारी ते एका कंपनीच्या हेड ऑफ ग्रोथ पदापर्यंतचा प्रवास अल्बर्टो यांनी यावेळी उलगडला. अल्बर्टो म्हणाले, ""आपण काय निर्णय घेतो, यावर आपले आयुष्य अवलंबून असते. म्हणूनच आपली निर्णय क्षमता तेवढ्याच ताकदीची असायला हवी. आपल्यात काहीतरी वेगळे दडलेय, या विचारानेच मला तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात आणले. आपण भविष्याचा विचार करण्यापेक्षा आपण काय आहोत आणि काय करू शकतो, याचा विचार करावा. ज्याला नवनिर्मितीचा ध्यास असतो, त्याला यश मिळतेच असा आत्मविश्‍वास स्वतःमध्ये निर्माण करा. "गुगल'ने मला नावीन्याकडे कसे बघावे आणि तंत्रज्ञानातील नवीन बदल यांची ओळख करून दिली. त्यानंतर स्टार्टअपच्या दृष्टीने छोट्या उद्योजकांसाठी काहीतरी करावे, असा विचार मनात आला आणि "सिंबा'ची निर्मिती झाली.

व्यवसायासाठी काम न करता लोकांसाठी काम करण्यावर भर द्यावा. आपल्या उद्योगासाठी तेवढ्याच ताकदीचे कर्मचारी आपण शोधले पाहिजेत. लहान पर्यायांपासून स्टार्टअपची सुरवात करावी. ऑनलाइन प्रेझेंन्स, समर्पक संवाद कौशल्य, अंतर्गत व्यवस्थापन आणि मोबाईल की सर्व्हिसचा चांगला वापर केला तर यश मिळू शकते.'' 
विटो म्हणाले, ""करिअरच्या वाटा निवडताना पॅशनची गरज असतेच. स्टार्टअपच्या दृष्टीने मोठ्या पर्यायांचा विचार करण्यापेक्षा लहान पर्यायांपासून सुरवात करावी. आपण आपल्या संकल्पनांच्या प्रेमात न पडता त्या लोकांपर्यंत कशा पोचवता येतील, याचा विचार केला पाहिजे. आपले प्रयत्न प्रामाणिक असतील, तर स्टार्टअपला यश मिळेलच. आपल्यात पॅशन नसेल, तर आपल्या संकल्पनांना यश मिळू शकत नाही. आज ई-कॉमर्स कंपन्यांनीही स्वबळावर यश मिळवले आहे. त्यामुळे यशाचा विचार करताना कंपनीच्या नियोजनाकडे भर द्यावा. छोट्या-छोट्या गोष्टीतूनच यश मिळते.'' 

...तर भारत प्रत्येक देशाला मागे टाकेल 
""एक मोबाईल किती बदल घडवू शकतो, ही बाब लक्षात घेतली पाहिजे. कंपनीच्या प्रसिद्धीपासून ते छोट्या उद्योजकांना जोडण्याचे कामही मोबाईल उत्तम प्रकारे करू शकतो. त्यासाठी नवउद्योजकांना संधी मिळावी, यासाठी "ब्रिंग महाराष्ट्र ऑनलाइन' ही संकल्पना राबविली जात आहे. छोट्या व्यावसायिकांना एकमेकांशी आणि बाजारपेठांशी जोडण्याचा यातून प्रयत्न केला जाणार आहे. अशाच पद्धतीने डिजिटल माध्यमाचा भारतात वापर वाढला, तर तंत्रज्ञानाच्या दृष्टीने भारत हा प्रत्येक देशाला मागे टाकेल,'' असे अल्बर्टो आयोरे यांनी सांगितले. 

संबंधित लेख