आत्मविश्‍वास हीच यशाची गुरुकिल्ली -विजय शिवतारे

"क्रांती नेहमी वेड्यांनीच केली आहे, त्यांनाच ध्येयवेडे म्हटले जाते. ध्येय ठेवा, ते पूर्ण करायला चिकाटीही ठेवा...' असे विचार उपस्थितांच्या डोक्‍यात पेरत शिवतारे यांनी तरुणांना प्रेरित केले.
आत्मविश्‍वास हीच यशाची गुरुकिल्ली -विजय शिवतारे

पुणे : ""मला अमुक एक गोष्ट शक्‍य नाही, असे कधीही म्हणू नका. अनेकांनी शून्यातून आपले यश उभे केले आहे, हे लक्षात ठेवा ! आत्मविश्‍वास ही तुमच्या भावी यशाची गुरुकिल्ली आहे. आपल्याला एखाद्या गोष्टीचा गर्व नको; पण स्वाभिमान नक्कीच हवा. "हे करू शकतो', एवढेच चार शब्द खूप काही बदल घडवू शकतात,'' अशा प्रेरणादायी शब्दांत राज्याचे जलसंपदामंत्री विजय शिवतारे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. 

"सकाळ'च्या "डिलिव्हरिंग चेंज फाउंडेशन'च्या "यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्क' (यिन) व्यासपीठाने आयोजिलेल्या "यिन समर यूथ समिट'च्या दुसऱ्या दिवशीच्या सत्रात सोमवारी शिवतारे बोलत होते. "क्रांती नेहमी वेड्यांनीच केली आहे, त्यांनाच ध्येयवेडे म्हटले जाते. ध्येय ठेवा, ते पूर्ण करायला चिकाटीही ठेवा...' असे विचार उपस्थितांच्या डोक्‍यात पेरत शिवतारे यांनी तरुणांना प्रेरित केले.

त्यांनी आपला "गरीब विद्यार्थी ते इंजिनिअर ते दूध विक्रीतील एक मोठे नाव ते बांधकाम विकासक ते राजकारणी' असा चित्तवेधक प्रवास उलगडून दाखवला. ते म्हणाले, "आईने मला कानमंत्र दिला होता. ती म्हणाली होती- स्वतःसाठी खूप केलं, आता इतरांसाठी कर. त्यानंतर मी समाजसेवेच्या उद्दिष्टाने राजकारणाकडे वळलो.' दुर्दम्य इच्छाशक्ती आणि जिद्द असेल तर, यशाच्या पायऱ्या आपोआप सुचत जातात. त्यासाठी कुठेही जायची गरज नाही. नियोजन करा; पण स्वार्थासाठी करू नका, अन्यथा यश मिळणार नाही, असेही त्यांनी सांगितले. 

या वेळी माजी कसोटीपटू चंदू बोर्डे, निवेदक सुधीर गाडगीळ, ज्येष्ठ व्यंग्यचित्रकार मंगेश तेंडुलकर, शिल्पकार विवेक खटावकर, व्यंग्यचित्रकार चारुहास पंडित, नृत्यांगना सुचेता भिडे-चापेकर, सदाशिव पंडित, विदुला घोडके, भारती बराटे, डॉ. अशोक नगरकर, चकोर गांधी, शैलेश वाडेकर यांनीही या वेळी आपल्या आयुष्यातील अनुभव विद्यार्थ्यांपुढे मांडत त्यांना मार्गदर्शन केले. तसेच, इशा केसकर (अभिनय), निर्मय छाजेड (स्टार्ट-अप), आकांक्षा हगवणे (खेळ), सिद्धांत भाटिया (उद्योग), यशोधन मोरये (शिक्षण) यांना या वेळी युवा पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले. 

विद्यार्थ्यांनी कलागुणांचा उपयोग करावा 
""केवळ अभ्यासात अव्वल येऊन करिअर घडू शकत नाही. उज्ज्वल करिअर घडवायचे असेल तर, विद्यार्थ्यांनी स्वतःमधील कलागुणांचा उपयोग करून घ्यायला हवा. आपल्या क्षमता कशा ओळखाव्यात, याबद्दल युवकांना जाणीव करून देणारा यिनचा कार्यक्रम आहे,'' असे गौरवोद्‌गार स्पेक्‍ट्रम अकॅडमीचे संचालक सुनील पाटील यांनी काढले. यिनच्या समर यूथ समीटमध्ये रविवारी बोलताना पाटील यांनी विद्यार्थ्यांना त्यांच्या करिअरच्यादृष्टीने अनेक मोलाच्या टीप्सही दिल्या. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com