YIN Summer Youth Summit 2017 | Sarkarnama

भीतीचे साहसात रूपांतर करा; यश तुमचंच आहे : नांगरे पाटील 

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 6 जून 2017

पुणे : ''शिकणं हे तुमच्या रोजच्या जीवनाचा अविभाज्य घटक समजा! शिक्षण कधीही थांबवू नका. ते तुम्हाला नेहमीच मार्ग दाखवेल. आपली पॅशन आणि आपलं काम एकच असेल, तर आयुष्य आनंदी होणं कठीण नाही. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे, भीतीचे साहसात रूपांतर करा. खंबीर राहा. यश तुमचंच आहे,'' अशा प्रेरणादायी शब्दांत कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

पुणे : ''शिकणं हे तुमच्या रोजच्या जीवनाचा अविभाज्य घटक समजा! शिक्षण कधीही थांबवू नका. ते तुम्हाला नेहमीच मार्ग दाखवेल. आपली पॅशन आणि आपलं काम एकच असेल, तर आयुष्य आनंदी होणं कठीण नाही. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे, भीतीचे साहसात रूपांतर करा. खंबीर राहा. यश तुमचंच आहे,'' अशा प्रेरणादायी शब्दांत कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

'सकाळ'च्या डिलिव्हरिंग चेंज फाउंडेशनच्या यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्क (यिन) व्यासपीठाने आयोजित केलेल्या 'यिन समर यूथ समिट २०१७'च्या उद्‌घाटनप्रसंगी ते बोलत होते. बावधन येथील सूर्यदत्ता इन्स्टिट्यूटच्या प्रांगणात रविवारी सकाळी 'समिट'चे उद्‌घाटन झाले. या वेळी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर, 'सकाळ'चे कार्यकारी संपादक नंदकुमार सुतार, स्पेक्‍ट्रम अकॅडमीचे संचालक सुनील पाटील, 'यिन'चे प्रमुख तेजस गुजराथी आदी उपस्थित होते.
नांगरे पाटील म्हणाले, ''स्वामी विवेकानंद म्हणतात तसे, एक कल्पना उचलून तुम्ही त्यावर स्वतःला झोकून द्या. चिकाटी आणि साधनेतून यश मिळणे निश्‍चित आहे. महत्त्वाचे म्हणजे वाचनाची सोबत कधीही सोडू नका. प्रेरणा मिळविण्यासाठी पुस्तकासारखा मित्र नाही.''

दरम्यान, आपल्या प्रेरणास्थान असलेल्या वक्‍त्यांकडून थेट त्यांच्या आयुष्यातील अनुभव ऐकण्यासाठीचा विद्यार्थ्यांमधील वाढता उत्साह, मान्यवरांचे अतिव मोलाचे मार्गदर्शन अन्‌ त्यांच्या व्याख्यानातून मिळणारी न संपणारी ऊर्जा अशा उत्साही वातावरणात दीपप्रज्वलनानंतर समिट सुरू झाली. सुतार यांनी प्रास्ताविक केले.

'यिन'च्या स्वयंसेवकांना विशेष प्रशिक्षण
'यिन'च्या स्वयंसेवकांना पुणे ग्रामीण पोलिसांतर्फे मर्यादित कालावधीचे विशेष प्रशिक्षण देऊन या तरुणांना अधिक कौशल्य प्राप्त करून देण्याची घोषणा या वेळी विश्वास नांगरे पाटील यांनी केली. तसेच स्वयंसेवकांना 'विशेष पोलिस ऑफिसर' म्हणून प्रमाणपत्रही दिले जातील, असे पाटील यांनी सांगितले.

शॉर्टकटच्या मागे धावू नका : कुलगुरू
'आपल्यातील बलस्थाने ओळखा. आपल्याला पुढे काय करायचे आहे, हे ठरवा आणि एक निश्‍चित ध्येय घेऊन पुढे जात राहा; पण लक्षात ठेवा, कधीही शॉर्टकट पकडू नका. खऱ्या यशासाठी शॉर्टकट्‌स कधीही उपयोगी ठरत नाहीत,'' अशा शब्दांत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

'सकाळ'च्या 'यिन समर यूथ समिट २०१७'च्या उद्‌घाटनप्रसंगी ते बोलत होते. या वेळी 'सूर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट'चे डॉ. संजय चोरडिया, 'निलया ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट'चे निलय मेहता, 'जेएसपीएम'चे विजय सावंत आदी उपस्थित होते.
करमळकर म्हणाले, ''आपली वाट योग्य दिशेने पुढे चालण्यासाठी युवावस्थेत योग्य गुरूची आवश्‍यकता असते. गुरूच आपल्याला योग्य दिशा दाखवतो. आपल्यातील चांगले काय, हे उलगडून सांगतो तो गुरू.'' चांगले चारित्र्य ही खरी संपत्ती असते.  आज शाळा-महाविद्यालयांतूनदेखील 'कॅरेक्‍टर एज्युकेशन' देण्याची गरज आहे. त्यातूनच पुढची पिढी घडणार आहे आणि नव्या भारताला घडविणार आहे, असेही त्यांनी सांगितले.

'स्मार्ट सिटी'द्वारे जीवनमान सुधारणार : कुणाल कुमार
कमी स्रोतांचा वापर करून जास्तीत जास्त चांगले काम करणे व भविष्यात उद्भवणाऱ्या समस्यांबाबत आधीपासूनच सावधगिरी बाळगत त्यानुसार विकासकामांची आखणी करणे म्हणजे 'स्मार्ट' कार्यपद्धती होय. शहरात स्मार्ट सिटी प्रकल्पातून नेमकी हीच गोष्ट साध्य केली जाणार आहे. या प्रकल्पाद्वारे आगामी काळात विकासकामे करून नागरिकांचे जीवनमान सुधारणार आहे, असे प्रतिपादन महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांनी केले.       

'सकाळ'च्या 'डिलिव्हरिंग चेंज फाउंडेशन'च्या यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्कतर्फे(यिन) आयोजित 'यिन यूथ समर समिट २०१७'चे रविवारी उद्‌घाटन झाले. या वेळी कुणाल कुमार यांनी समिटमध्ये सहभागी युवकांशी संवाद साधत स्मार्ट सिटी प्रकल्पाबाबत विविध गोष्टींची महिती दिली.
  
कुणाल कुमार म्हणाले, ''स्मार्ट सिटी प्रकल्प हा महापालिकेचा एक महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. या माध्यमातून शहरातील नागरिकांच्या जीवनमानाचा दर्जा उंचावणे, आर्थिक विकास आणि शाश्वत विकास करणे ही प्रमुख उद्दिष्टे असतील.''  
सुशासन, प्रशासनातील राजकीय हस्तक्षेप, करिअरच्या नव्या संधी अशा विविध विषयांवरील तरुणाईच्या प्रश्‍नांना कुणाल कुमार यांनी उत्तरे दिली.
 
प्रशासनातील निष्क्रियेतेविषयी विचारलेल्या प्रश्‍नाचे उत्तर देताना कुमार म्हणाले, ''प्रशासनामध्ये अधिक चांगले काम केले, म्हणून कुणाला 'इन्सेंटिव्ह' दिले जात नाहीत. एखाद्या अधिकाऱ्याने चांगले काम केले, नाही केले किंवा चुकीचे काम केले, तरी त्याला एकसारखेच मानधन मिळते. याउलट चांगले काम करताना त्या अधिकाऱ्याकडून छोटीसी जरी चूक झाली, तर तिच्याबाबत जास्त बोलले जाते. पण अनेक अधिकारी प्रामाणिकपणे काम करतात. त्यामुळे प्रशासनाला सरसकट निष्क्रिय म्हणणे योग्य नाही.''

स्वतःच्या फिटनेसचे रहस्य सांगताना कुणाल कुमार म्हणाले, ''व्यायामामुळे तणाव दूर करण्यास मदत होते. मात्र, तरीही दिसणाऱ्या शरीरापेक्षा अंतःर्मन अधिक मजबूत करणे म्हणजे खरा फिटनेस आहे. त्यासाठीच मी शरीर आणि मनाचीही साधना करतो.''

'चांगल्या कामासाठीचा हस्तक्षेप स्वीकारा' 
राजकारणात प्रशासनाचा हस्तक्षेप होतो का, याबाबत कुणाल कुमार म्हणाले, की आपल्याला निवडून दिलेल्या नागरिकांचे प्रश्‍न सोडविणे लोकप्रतिनिधींचे कर्तव्यच असते. त्यासाठी ते प्रशासनाकडे पाठपुरावा करतात; परंतु काही बाबतीत त्यांनी दिलेल्या सूचनांचे पालन करणे शक्‍य होत नाही. अशा वेळी प्रशासकीय अडथळे सांगितल्यास ते समजून घेतात. काही वेळा त्यांच्याकडून हस्तक्षेप होतो; परंतु हस्तक्षेप चांगल्या गोष्टींसाठी होत असेल, तर प्रशासनानेदेखील तो आनंदाने स्वीकारावा.

फोटो फीचर

संबंधित लेख