yevala water crisis | Sarkarnama

भुजबळांचा येवला पाण्यासाठी रस्त्यावर 

संपत देवगिरे 
रविवार, 7 मे 2017

जिल्हाधिकाऱ्यांनी परस्पर 16 तलावांचे आरक्षण रद्द केले. विनंती करूनही पालकमंत्री काहीच करीत नाहीत. या उपेक्षेने जनतेत रोष आहे. आम्ही आंदोलनाने सरकारला पाणी देण्यास भाग पाडू. 
- राधाकृष्ण सोनवणे, माजी अध्यक्ष, नाशिक जिल्हा परिषद. 

नाशिक : माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळांचा मतदारसंघ असलेल्या येवला तालुक्‍यातील नागरिकांना पाण्यासाठी पुन्हा इतिहासजमा झालेल्या दुष्काळ व टंचाईचे चटके बसू लागले आहे. पालखेड कालव्यातून पिण्यासाठी हक्काचे रोटेशन मिळावे यासाठी जागोजागी आंदोलने सुरू झाली आहेत. तालुक्‍यातील सर्वांत मोठे गाव असलेल्या अंदरसुलला दोन तास औरंगाबाद महामार्ग बंद करण्यात आला आहे. नेते निवेदने देण्यात अन्‌ जनता आंदोलनासाठी रस्त्यावर तरीही पाणी नसल्याने सगळ्यांच्याच घशाला कोरड पडली आहे. 

माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळांचा मतदारसंघ असलेल्या येवल्याच्या विकासाचा हेवा वाटा अशी स्थिती असताना गेल्या दोन वर्षात मात्र राज्यातील सत्तांतरामुळे राज्य शासनाची अनास्था, पालकमंत्र्यांची उपेक्षा आणि जिल्हा प्रशासनाची अडवणूक अशा तिहेरी फेऱ्यात नागरिकांना रोज नवे प्रश्न भेडसावू लागले आहेत. भुजबळ असताना गावातील कार्यकर्त्यांनी मागणी करावी आणि प्रशासनाने धावावे अशी स्थिती होती. टंचाईग्रस्त येवल्यासाठी पालखेड कालव्यातून खास आवर्तन मंजूर केले होते. मात्र सध्या तहसीलदारांनी प्रस्ताव पाठवल्यावरही त्याची उपेक्षा होऊ लागली आहे. त्यामुळे काल तालुक्‍यातील सर्वांत मोठे गाव असलेल्या अंदरसुलकरांना औरंगाबाद रस्त्यावर उतरून आंदोलन करावे लागले. त्यात दोन तास महामार्ग बंद झाला. जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राधाकृष्ण सोनवणे यांच्यासह एकवीस प्रमुख नेत्यांना पोलिसांनी अटक केली. शिवसेनेचे संभाजी पवार, मकरंद सोनवणे यांसह विविध नेते सातत्याने या विषयावर आंदोलन करीत आहेत. तरीही पाणी काही मिळत नाही. 

तालुक्‍याच्या प्रमुख गावांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणारे सत्तावीस तलाव आहेत. गतवर्षीच्या दुष्काळाचा अपवाद वगळता दरवर्षी ते पालखेडच्या आवर्तनातून भरून दिले जातात. यंदा मात्र आवर्तन सोडल्यावर केवळ अकरा बंधारे भरले. उर्वरित सोळा बंधाऱ्यांचे आवर्तन जिल्हाधिकाऱ्यांनी रद्द केले. त्यात अंदरसुल, कोळगंगा नदीवरील चार तलाव, देवळाने- गोगटे हे प्रमुख आहेत. आता मात्र नवा प्रश्न निर्माण झाला असून ही सर्व गावे तहानलेली आहेत. प्रश्न ेएवढा गंभीर झाला, की नागरिक संताप व्यक्त करीत आहे. छगन भुजबळ अडचणीत येताच त्यांच्या मतदारसंघावरही प्रशासन अन्याय करते अशी तक्रार होत आहे. त्याने सगळ्यांच्याच तोंडचे पाणी पळाले असून सगळ्यांना पाण्याची प्रतीक्षा आहे. 

 

संबंधित लेख