YB Chavan trust creates world record by providing 6 thousand hearing aid to needy people | Sarkarnama

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानाचा आठ तासांत सर्वाधिक श्रवणयंत्रे बसविण्याचा जागतिक विक्रम 

सरकारनामा
शुक्रवार, 26 ऑक्टोबर 2018

एकाच छताखाली इतक्या मोठ्या संख्येने श्रवणयंत्रे वाटपाचा कार्यक्रम पार पडला.जागतिक दर्जाचा उपक्रम पार पडला याचा आनंद वाटतो.

- शरद पवार  

 

कर्णबधीरांना आयुष्यात प्रथमच ध्वनी ऐकायला मिळतो तेंव्हा त्यांना मिळणारा आनंद हीच आमच्यासाठी समाधानाची बाब आहे.

-सुप्रिया सुळे

पुणे : म्हाळुंगे-बालेवाडी येथील श्रीशिवछत्रपती क्रीडासंकुलात शुक्रवारी  राज्यभरातील सुमारे सहा हजार कर्णबधीर विद्यार्थी आणि ज्येष्ठ नागरिकांना  श्रवणयंत्रे बसविण्यात आली .  खासदार सुप्रिया सुळे यांच्यापुढाकाराने  स्टार्की हिअरींग फाऊंडेशन, यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान व टाटा ट्रस्ट यांच्या वतीने हे मोफत श्रवणयंत्र जोडणी शिबीर घेण्यात आले . 

 या शिबिरात आठ तासांमध्ये ४८४६ जोडण्या करण्यात आल्या असून ही संख्या जागतिक विक्रम प्रस्थापित करणारी ठरली आहे. याची नोंद ‘गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’ने घेतली आहे. 

या शिबिरात एकूण जोडण्या सहा हजार एवढ्या झाल्या असल्या तरी शिबिराच्या काळातील आठ तासांमध्ये ४८४६ एवढी श्रवणयंत्रे जोडण्याचा विक्रम प्रस्थापित झाला आहे. यापुर्वी आठ तासांच्याच कालावधीत एनआरएचएम आणि मणिपूर सरकारच्या वतीने घेण्यात आलेल्या ३९११ जोडण्यांचा विक्रम करण्यात आला होता. तो आता मागे पडला आहे. 

यावेळी खासदार शरद पवार, आमदार अजित पवार, खा. सुप्रिया सुळे, स्टार्की हिअरिंग फाउंडेशनचे अध्यक्ष विल्यम ऑस्टिन, सहसंस्थापक टीम ऑस्टिन, स्टार्की इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक रोहित मिश्रा, स्टार्की हिअरिंग फाउंडेशनचे आंतरराष्ट्रीय विकास अधिकारी सुरेश पिल्लई, टाटा ट्रस्टचे मॅनेजिंग ट्रस्टी आर. वेंकटरमण,

मांडके हिअरिंग सर्विसेसच्या कल्याणी मांडके, पुणे जिल्हा अपंग केंद्राचे प्रकल्प संचालक नंदकुमार फुले,ठाकरसी ग्रुपचे महेश जोशी, पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष रमेश थोरात, उद्योजक विठ्ठल कामत,

माजी सनदी अधिकारी प्रभाकर देशमुख,  माजी कसोटी क्रिकेटपटू रवी शास्त्री, यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान-अपंग हक्क विकास मंचचे संयोजक विजय कान्हेकर, दत्ता बाळसराफ, विश्वास ठाकूर, निलेश राऊत आदी उपस्थित होते. 

खासदार सुप्रिया सुळे यांच्या पुढाकाराने या उपक्रमाची आखणी करण्यात आली असून हा विक्रम प्रत्यक्षात प्रस्थापित करण्यापुर्वी राज्यभरातील १८ जिल्ह्यात २५ ठिकाणी पूर्वतपासणी शिबिरे आयोजित करण्यात आली होती. या शिबिरांतून श्रवणयंत्र बसविल्यानंतर श्रवणक्षम होऊ शकणारे कर्णबधीर विद्यार्थी आणि ज्येष्ठ नागरिकांची निवड करण्यात आली. त्यांना शुक्रवारी झालेल्या कार्यक्रमात श्रवणयंत्रे बसविण्यात आली.

 

संबंधित लेख