yavatmal-madan-yeravar-nandini-paravekar | Sarkarnama

यवतमाळमध्ये मदन येरावारांना नंदिनीताई पारवेकर घेरणार? 

चेतन देशमुख
बुधवार, 26 सप्टेंबर 2018

यवतमाळ विधानसभा मतदारसंघात राज्य उत्पादन राज्यमंत्री मदन येरावार यांच्या विरोधात कॉंग्रेसच्या नंदिनी पारवेकर मैदानात उतरण्याची शक्‍यता आहे. नंदिनीताईच्या उमेदवारीने येरावार यांना हा मतदारसंघ सर करणे सोपा राहणार नाही. 

यवतमाळ : यवतमाळ विधानसभा मतदारसंघात राज्य उत्पादन राज्यमंत्री मदन येरावार यांच्या विरोधात कॉंग्रेसच्या नंदिनी पारवेकर मैदानात उतरण्याची शक्‍यता आहे. नंदिनीताईच्या उमेदवारीने येरावार यांना हा मतदारसंघ सर करणे सोपा राहणार नाही. 

या मतदारासंघातून राहुल ब्रिगेडचे निलेश पारवेकर 2009 मध्ये निवडून आले होते. त्यांच्या अपघाती निधनानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत त्यांच्या पत्नी नंदिनी पारवेकर यांनी निवडणूक जिंकली होती. 2014 च्या निवडणुकीत माणिकराव ठाकरे यांनी विद्यमान आमदार असलेल्या नंदिनी पारवेकर यांची उमेदवारी कापून मुलगा राहुल ठाकरेंना उमेदवारी दिली. राहुल ठाकरेंना मदन येरावार यांनी केवळ पराभूत केले नाही तर त्यांची अनामत रक्कम जप्त केली. 2014 च्या निवडणुकीत विदर्भातून अनामत रक्कम जप्त होणारा कॉंग्रेसचा एकमेव उमेदवार राहुल ठाकरे होते. आता राहुल ठाकरे यांना खासदार होण्याची स्वप्ने पडू लागले आहेत. 

यवतमाळमध्ये तोंड पोळल्यामुळे ठाकरे बाप-लेकांनी आपले बस्तान आता हलविले आहे. या स्थितीत कॉंग्रेसची उमेदवारी पुन्हा नंदिनी पारवेकर यांना मिळण्याची शक्‍यता आहे. निलेश पारवेकर यांच्या निधनानंतर राहुल गांधी सांत्वनासाठी यवतमाळला गेले होते. येत्या 2 ऑक्‍टोबरला नंदिनी पारवेकर कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांची वर्धा येथे भेट घेणार आहेत. 

राहुल गांधी यांनी नंदिनी पारवेकर यांची भेटीची वेळ निश्‍चित केल्याचे समजते. या संदर्भात "सरकारनामा'शी बोलताना नंदिनी पारवेकर यांनी राहुल गांधी यांची भेट घेणार असल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला. नंदिनी पारवेकर यांच्या उमेदवारीला कॉंग्रेसच्या कोणत्याच गटाचा विरोध नसल्याने येरावार यांना ही निवडणूक सोपी राहणार नाही. नंदिनी पारवेकर कॉंग्रेसचा उमेदवार राहिल्यास पुन्हा कॉंग्रेस गड सर करू होऊ शकते.
 

संबंधित लेख