yashwantrao mohite cm election story | Sarkarnama

यशवंतराव मोहिते मुख्यमंत्रीपदाची निवडणूक लढले होते; त्यांना राजारामबापूंचा पाठिंबा होता! 

संपत मोरे 
बुधवार, 22 ऑगस्ट 2018

'महाराष्ट्राचा कार्ल मार्क्‍स' अशी ओळख असणारे, माजी मंत्री यशवंतराव मोहिते यांचा आज स्मृतीदिन. 

आणीबाणीनंतरचा काळ होता. शंकरराव चव्हाण यांच्यानंतर वसंतरावदादा पाटील यांचे नाव मुख्यमंत्रीपदासाठी आले, त्यावेळी मुख्यमंत्रीपदासाठी कॉंग्रेस अंतर्गत निवडणूक झाली होती. या निवडणुकीत राजारामबापू पाटील यांच्या मदतीवर रेठऱ्याचे यशवंतराव मोहिते यांनी वसंतदादा पाटील यांच्या विरोधात निवडणूक लढवली होती. या निवडणुकीत खूप चुरस निर्माण झाली होती. सगळीकडे या निवडणुकीची चर्चा होती. या निवडणुकीसाठीचे मतदान करून राजाराम बापू पाटील बाहेर आले. बाहेर आल्यावर पत्रकारांनी त्यांना विचारले, या निवडणुकीत कोणाचा विजय होईल असे तुम्हास वाटते? 

त्यावर राजारामबापूंनी पत्रकारांना एक अनपेक्षित बातमी दिली. ती बातमी म्हणजे "मी कॉंग्रेस पक्षाचा राजीनामा देतोय' हा पत्रकारांना धक्का होता. या निवडणुकीत वसंतदादा पाटील विजयी झाले. यशवंतराव मोहितेंचा पराभव झाला. 

यशवंतराव मोहिते यांचे गाव कराड तालुक्‍यातील रेठरे बुद्रुक. तरुणपणात ते कार्ल मार्क्‍स यांच्या विचाराने भारावून शेतकरी कामगार पक्षात गेले. 1952 साली ते शेतकरी कामगार पक्षाच्या तिकिटावर आमदार झाले होते. त्यानंतर यशवंतराव चव्हाण यांनी त्यांना कॉंग्रेस पक्षात घेतले. नंतरच्या काळात सहकार, परिवहन सारख्या खात्याचे मंत्री म्हणून त्यांनी काम केले. गावोगावी एसटी जावी, हा संकल्प त्यांनी परिवहनमंत्री असताना केला आणि तो राबवला. एसटीचे जाळे खेडोपाडी जाण्याचे श्रेय त्यांना जाते. मोहिते यांना "भाऊ' या नावाने लोक ओळखत होते. ते शेतकरी कामगार पक्षातून कॉंग्रेस पक्षात गेले तर त्यांचा विचार नेहमीच डावा राहिला. महाराष्ट्रात एक जेष्ठ विचारवंत म्हणून त्यांची ओळख होती. राजकीय कार्यकर्त्यांनी कसे वागले पाहिजे याचे मार्गदर्शन करणारे त्यांचे "पन्हाळा शिबिरातील भाषण' नावाने एक पुस्तक प्रकाशित आहे. 

यशवंतराव मोहिते यांनी कधीकाळी मुख्यमंत्रीपदासाठी निवडणूक लढवली होती, त्याच्या आठवणी जुन्या कार्यकर्त्यांच्या पुढे आजही ताज्या आहेत. 

संबंधित लेख