Women fighting against Malnutrition | Sarkarnama

महिलांनी उगारली कुपोषणावर बंदूक

संजय तुमराम
शनिवार, 6 मे 2017

सरकारी शाळांमध्ये पोषण आहार योजनेचा बोजवारा उडाल्याचे आपण अनेकदा वाचतो, ऐकतो आणि पाहतो. पण चंद्रपूरचे उदाहरण हे आदर्श आहे. महाराष्ट्रात विशेषतः आदिवासी भागात कुपोषणाची समस्या आहे. चंद्रपूरच्या चिनोरा गावातल्या महिलांचा आदर्श घेऊन जर राज्यात असे प्रयोग झाले तर राज्य कुपोषणमुक्त व्हायला वेळ लागणार नाही.

चंद्रपूर - कुपोषणावर मात करण्यासाठी केवळ सरकारनेच सगळे केले पाहिजे, असे नाही. उलट समाजाने पुढाकार घेतला तर अशा सामाजिक समस्या लवकर दूर होऊ शकतात, याचा आदर्श घालून दिला आहे चंद्रपूर जिल्ह्यातील काही महिलांनी. या महिलांनी चक्क आपल्या भागातली सहा कुपोषित मुलेच दत्तक घेतली आहेत.

चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा तालुक्यातल्या चिनोरा गावातली ही कथा आहे. डाॅ. किशोर भट्टाचार्य हे वरोरा तालुक्याचे वैद्यकीय अधिकारी म्हणून रुजू झाले. या परिसरात कुपोषणाची समस्या असल्याचे त्यांना जाणवल्यावर त्यांनी कंबर कसली आणि कुपोषणाशी लढा देण्याचा निर्णय घेतला. शासनाच्या एकात्मिक बालकल्याण सेवा योजनेअंतर्गत त्यांनी गावपातळीवर माता व बालकुपोषण निर्मूलन समित्या स्थापन करुन जनजागृतीला सुरुवात केली.

त्यांच्या या मोहिमेला हळूहळू यश येऊ लागले. लोकही प्रतिसाद देऊ लागले. आणि त्यातून 88 पैकी 82 बालके कुपोषणमुक्त झाली. उर्वरित सहा मुलांचे करायचे काय असा प्रश्न होता. तो इथल्या चिनोरा दुडकी गावातल्या महिलांनी सोडवला. त्यांनी चक्क ही सहा बालके दत्तक घेतली.

या महिलांनी डाॅ. भट्टाचार्य यांच्याकडून आहाराची पौष्टिक आहाराची माहिती घेतली आणि आता रोज सकाळी एक महिला यापैकी एक पदार्थ आपल्या घरून बनवून आणते. या सहा मुलांच्या माता सकाळी दहा वाजता या मुलांना घेऊन येतात आणि त्यांना पोषण आहार दिला जातो. लवकरच ही मुलेही कुपोषणातून मुक्त होतील.

संबंधित लेख