आमदारांच्या सोसायटीतील सदनिकेसाठी व्यावसायिक महिलेला 50 लाखांचा गंडा

महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाने (म्हाडा) विधानसभा आणि विधान परिषद सदस्यांसाठीही घरांची सोडत काढली होती. या सदनिकांवर आता दलालांची नजर पडली आहे. अशा एका सदनिकेसाठी दलालाने 50 लाखांचा गंडा घातल्याची तक्रार म्हाडा प्राधिकरणाकडे आली आहे.
आमदारांच्या सोसायटीतील सदनिकेसाठी व्यावसायिक महिलेला 50 लाखांचा गंडा

मुंबई : महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाने (म्हाडा) विधानसभा आणि विधान परिषद सदस्यांसाठीही घरांची सोडत काढली होती. या सदनिकांवर आता दलालांची नजर पडली आहे. अशा एका सदनिकेसाठी दलालाने 50 लाखांचा गंडा घातल्याची तक्रार म्हाडा प्राधिकरणाकडे आली आहे.

मुंबईतील वर्सोवा परिसरात राजयोग सहकारी गृहनिर्माण संस्थेत विधानसभा आणि विधान परिषद सदस्यांच्या सदनिका आहेत. या सोसायटीत कमी दरात सदनिका मिळेल, या आशेने दलाल पौर्णिमा किशोर पेंडके यांना 50 लाख रुपये दिल्याचा आरोप मूळ राजस्थानमधील जैसलमेर येथील रहिवासी असलेल्या रूपल संजय जैन यांनी केला आहे. तीन वर्षांपूर्वी हा व्यवहार झाला; मात्र अद्याप घराचा ताबा मिळाला नसल्याची तक्रार त्यांनी म्हाडाकडे केली. तीन वर्षांपूर्वी सांताक्रूझ येथील घरी पौर्णिमा पेंडके यांना 30 लाख रुपये दिले आणि कागदपत्रांची पूर्तता झाल्यानंतर उरलेली रक्कम देण्याचे ठरले. पेंडके यांच्यावर विश्‍वास ठेवून सदनिकेची कागदपत्रे मिळालेली नसतानाही 20 लाख रुपये दिले, असे रूपल जैन यांनी वांद्रे पोलिस ठाण्यात दाखल केलेल्या तक्रारीत म्हटले आहे. 

जुहू येथे रूपल जैन यांचे स्पा आणि सलून आहे. त्या ठिकाणी त्यांची पौर्णिमा पेंडके यांच्याशी ओळख झाली होती. श्री रेणुका देवी लिआसनिंग वर्क कंपनीमार्फत म्हाडाच्या घरांची खरेदी-विक्री केली जात असल्याचे पेंडके यांनी रूपल जैन यांना सांगितले होते. वर्सोव्यातील राजयोग सोसायटीत 15 व्या मजल्यावरील दोन कोटींची सदनिका केवळ 60 लाखांना देण्याचे आश्‍वासन त्यांनी रूपल यांना दिले होते. त्यावर विश्‍वास ठेवून 50 लाख रुपये दिल्याचे रूपल जैन यांनी तक्रारीत म्हटले आहे. या व्यवहारात फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर आपण पैसे परत देण्याची मागणी केली. त्यानुसार पेंडके यांनी मार्च 2019 मध्ये दिलेले तीन धनादेश वटलेच नाहीत, अशी तक्रार रूपल जैन यांनी पोलिसांत केली. त्यानंतर पेंडके यांच्याकडून धमक्‍या दिल्या जात आहेत, अशी तक्रार त्यांनी मुंबई म्हाडा सभापतींकडे केली आहे.

म्हाडा मुख्यालयात बोलावणे
वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची या सोसायटीतील सदनिकाही पौर्णिमा पेंडके यांनी आपल्याला दाखवल्याचे रूपल जैन यांनी तक्रारीत म्हटले आहे. त्यांना बुधवारी (ता. 26) म्हाडा मुख्यालयात बोलावण्यात आले आहे. त्यांच्याकडून या प्रकरणाची माहिती घेऊन तक्रारीसोबत जोडलेल्या कागदपत्रांची छाननी केली जाईल, असे म्हाडाच्या मुंबई मंडळाचे सभापती मधू चव्हाण यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com