will srirang barane recognise parth pawar? | Sarkarnama

श्रीरंग बारणे हे पार्थ पवार यांना आता तरी ओळखतील का?

सरकारनामा ब्यूरो
सोमवार, 11 मार्च 2019

पवार कुटुंबातील सुप्रिया सुळे या बारामतीतून तर पार्थ पवार हे मावळ लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीचे उमेदवार असतील, असे आज स्पष्ट झाले. 

पुणे : राष्ट्रवादी काॅंग्रेसचे नेते अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ यांनी मावळ लोकसभा मतदारसंघातून उभे राहणार असल्याचे आज स्पष्ट झाले. त्यामुळे या ठिकाणी पार्थ विरुद्ध मावळचे विद्यमान खासदार श्रीरंग बारणे या दोघांत सामना होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

पार्थ यांचे नाव सुरवातीला चर्चेत आले होते तेव्हा आपण त्यांना ओळखत नसल्याची प्रतिक्रिया बारणे यांनी दिली होती. आता थेट त्यांच्याशीच सामना होणार असल्याने आता तरी ते पार्थ यांना ओळखतील का, असा प्रश्न साहजिकच उपस्थित झाला आहे.

मावळ लोकसभा मतदारसंघासाठी राष्ट्रवादी काॅंग्रेसचे उमेदवार कोण असणार, यावर बराच काळ चर्चा सुरू होती. राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या मावळमधील नेत्यांनी पार्थ यांचे नाव पहिल्यांदा मुंबईतील बैठकीत सुचविले होते. तेव्हा ते उभे राहणार नसल्याचे शरद पवार यांनीच स्पष्ट केले होते. मात्र शेतकरी कामगार पक्षाचे नेते जयंत पाटील यांनी आग्रह धरल्याने तो आग्रह शरद पवार यांनी मान्य केला आहे.

पार्थ उभे राहणार असल्याने स्वतः शरद पवार यांनी माढा लोकसभा मतदारसंघातून आपण उभे राहणार नसल्याची घोषणा केली. पवार कुटुंबातील किती जण उमेदवार द्यायचे, असा विचार या मागे केला गेल्याचे पवार यांनी स्पष्ट केले. 

बारणे यांनी आपल्याविरोधात कोणीही उमेदवार असला तरी शिवसेनेचा भगवा झेंडा फडकणार असल्याचा दावा केला आहे. मावळमध्ये राष्ट्रवादी काॅंग्रेसचा या आधीच्या दोन सलग निवडणुकांत पराभव झाला होता. दोन्ही वेळेस शिवसेनेच्या धनुष्याने बाजी मारली होती. आता थेट पवार कुटंबातील उमेदवार असल्याने यंदाची निवडणूक आणखी चुरशीची होणार आहे.

 

संबंधित लेख