युतीच्या मांजाने आमदार इम्तियाज जलील यांचा पतंग कटणार का ? 

वंचित बहुजन आघाडीची साथ मिळाल्यामुळे मध्य मधून दुसऱ्यांदा विजयी होण्यासाठी एमआयएमने देखील कंबर कसली आहे. तेव्हा मध्य विधानसभेवर युतीचा झेंडा फडकणार की एमआयएमचा पंतग पुन्हा आकाशात भरारी घेणार?
Aurangabad-central
Aurangabad-central

औरंगाबादः शिवसेना-भाजप युतीच्या निर्णयाने जिल्ह्यातील अनेक विधानसभा मतदारसंघातील राजकीय समीकरणे बिघडणार आहेत.

गेल्यावेळी औरंगाबाद मध्य विधानसभा मतदारसंघात शिवसेना आणि भाजप युती नसल्याने मतविभाजन झाले होते .गेल्या निवडणुकीत युती तुटली आणि हिंदु मतांच्या विभाजनाचा फायदा  एमआयएमचे आमदार  इम्तियाज जलील यांना  झाला होता . 

पहिलीच निवडूक लढणाऱ्या एमआयएमचा पतंग असा काही उडाला की फक्त पंधरा दिवसांच्या प्रचारातच आमदार इम्तियाज जलील आमदार झाले. पण मागच्यावेळी झालेली चूक सुधारत शिवसेना-भाजपने एकत्रित निवडणूक लढण्याचा निर्णय घेतल्यामुळे 2019 मध्ये आमदार इम्तियाज जलील यांचा पंतग उडणार की कटणार? याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. 

पश्‍चिम मतदारसंघातून 2009 मध्ये मध्य या स्वतंत्र विधानसभा मतदारसंघाची निर्मिती झाली. युतीमध्ये हा मतदारसंघ शिवसेनेच्या वाट्याला आला. नव्या मतदारसंघात विजय मिळवण्याची शिवसेनेला संधी असतांना ऐनवेळी उमेदवारीत केलेला बदल नडला आणि शिवसेनेतून बोहर पडून अपक्ष निवडणूक लढवलेल्या प्रदीप जैस्वाल यांनी मध्य मध्ये बाजी मारली. अर्थात वर्षभराने प्रदीप जैस्वाल स्वगृही परतले ते 2014 च्या निवडणुकीत उमेदवारी देण्याचा शब्द घेऊन. 

दरम्यान, लोकसभेला युती करणाऱ्या भाजपने विधानसभा निवडणुकीत शिवसेने सोबतची युती तोडली आणि मध्य विधानसभा मतदारसंघातून शिवसेना-भाजप आणि पहिल्यादाच निवडणूक लढवत असलेल्या एमआयएममध्ये तिरंगी लढत झाली.

हिंदु बहुसंख्य असलेल्या या मतदारसंघात एकगठ्ठा मतांच्या जोरावर शिवसेनेचा आमदार निवडणू येऊ शकला असता. पण प्रदीप जैस्वाल आणि ऐन निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेतून भाजपमध्ये दाखल झालेले किशनचंद तनवाणी यांच्या उमेदवारीने हिंदु मतांचे विभाजन झाले. याचा थेट फायदा एमआयएमला झाला आणि वीस हजाराहून अधिक मतांनी इम्तियाज जलील विजयी झाले. 

पुनरावृत्ती टळली, पराभव टळणार? 

गेल्या निवडणुकीत शिवसेना-भाजप युती तुटली होती, 2019 मध्ये याची पुनरावृत्ती टाळण्यात दोन्ही पक्षांना यश आले आहे. आता मध्य विधानसभा निवडणुकीत युतीचा झालेला पराभव टळणार का याकडेही सगळ्यांचे लक्ष लागले आहे. स्वबळाच्या भाषेमुळे किशनचंद तनवाणी आणि प्रदीप जैस्वाल या जुन्याच प्रतिस्पर्ध्यामध्ये पुन्हा लढत होण्याची शक्‍यता निर्माण झाली होती.

तशी तयारी देखील दोघांनी केली होती. 2014 मध्ये प्रदीप जैस्वाल 41861 मते मिळवून दुसऱ्या तर भाजपचे तनवाणी 40770 मते घेऊन तिसऱ्या क्रमांकावर होते. या दोघांच्या मतांची बेरीज केल्यास ती विजयी इम्तियाज जलील यांच्या मतांपेक्षा 19982 मतांनी अधिक होते. 

मतांची ही तुट भरून काढत युतीच्या उमेदवाराला मध्य मधून विजय मिळवणे शक्‍य होऊ शकते असे चित्र सध्या तरी आहे. दुसरीकडे विद्यमान एमआयएम आमदार इम्तियाज जलील यांची चार वर्षातील कारकीर्द देखील लक्षवेधी ठरलेली आहे. नशाबंदी, वीज, पाणी, रस्ते या प्रश्‍नांवर प्रभावी आंदोलने करत असतांनाच महाराष्ट्रातील एमआयएमचे प्रमुख नेते म्हणून त्यांनी आपली छाप पाडली आहे. 

महापालिका आणि जिल्ह्याच्या राजकारणात सत्ताधाऱ्यांना कडाडून विरोध आणि आक्रमक भूमिका घेतल्यामुळे ते आजही मुस्लिम तरुणांमध्ये प्रचंड लोकप्रिय आहेत. वंचित बहुजन आघाडीची साथ मिळाल्यामुळे मध्य मधून दुसऱ्यांदा विजयी होण्यासाठी एमआयएमने देखील कंबर कसली आहे. तेव्हा मध्य विधानसभेवर युतीचा झेंडा फडकणार की एमआयएमचा पंतग पुन्हा आकाशात भरारी घेणार? हे लवकरच स्पष्ट होईल.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com