Will Sayyad Matin expelled from MIM ? | Sarkarnama

बेलगाम सय्यद मतीनची एमआयएममधून हकालपट्टी होणार ? 

जगदीश पानसरे
सोमवार, 20 ऑगस्ट 2018

मतीनचे समर्थन करावे तर धर्मनिरपेक्ष प्रतिमेला तडा जातो, बाजू न घ्यावी तर पक्षातील इतर नगरसेवक आणि कार्यकर्त्यांच्या नाराजीला तोंड द्यावे लागेल अशा चक्रव्युहात पक्षाचे स्थानिक नेते आमदार इम्तियाज जलील हे अडकले आहेत.

औरंगाबादः ' बाबरी की शहादत हम भुले नही, मेरा श्रध्दांजली प्रस्ताव को विरोध है, इसकी नोंद लियी जाए' असे म्हणत महापालिकेच्या सभागृहात खळबळ उडवून देणारा एमआयएमचा नगरसेवक सय्यद मतीन चांगलाच अडचणीत आला आहे.

पक्षाला न विचारता केलेले कृत्य कदापी खपवून घेतले जाणार नाही असे पक्षाचे सर्वेसर्वा असद्दोदीन ओवेसी यांनी स्पष्ट केल्यामुळे त्याची हाकालपट्टी करण्याच्या जोरदार हालचालींना वेग आला आहे. 

 एमआयएमचे प्रमुख असद्दोदीन ओवेसी यांनी मतीन समर्थकाला फोनवरून फटकारल्याची ऑडिओ टेप सोशल मिडियावर चांगलीच गाजली. या टेपमध्ये त्यांनी मतीनला अनेकवेळा समाजवून सांगितले पण तो ऐकत नसल्याचे स्पष्ट केले. यावरून आता मतीनची गय केली जाणार नाही असे दिसते. स्थानिक आमदार इम्तियाज जलील यांनी देखील मतीनच्या कारनाम्याची माहिती वेळोवळी दिली होती. या सगळ्याचा परिणाम मतीन याची पक्षातून हकालपट्टी करण्यात होणार असल्याचे बोलले जाते. 
 

माजी पंतप्रधान स्व. अटलबिहारी वाजपेयी यांच्या निधनामुळे महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत शोक आणि श्रध्दांजली वाहण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला होता. त्याला सभागृहात उपस्थित असलेल्या एमआयएमच्या सात ते आठ नगरसेवकांपैकी एकट्या सय्यद मतीन याने विरोध दर्शवला. त्यामुळे संतापलेल्या भाजप नगरसेवकांनी मतीनला सभागृहात बेदम मारहाण केली. 

या प्रकरानंतर एमआयएममध्येच दोन मतप्रवाह तयार झाले. यापैकी एक म्हणजे पक्षाचे नगरसेवक मतीनच्या मदतीला का धावले नाहीत? तर दुसरा मतीनने पक्षाला न विचारता श्रध्दांजली सभेला विरोध का केला? यावरून आता पक्षात कथ्याकूट सुरू झाला आहे. 

मतीनचे समर्थन करावे तर धर्मनिरपेक्ष प्रतिमेला तडा जातो, बाजू न घ्यावी तर पक्षातील इतर नगरसेवक आणि कार्यकर्त्यांच्या नाराजीला तोंड द्यावे लागेल अशा चक्रव्युहात पक्षाचे स्थानिक नेते आमदार इम्तियाज जलील हे अडकले आहेत. प्रसार माध्यमांशी बोलतांना त्यांनी मतीनच्या कृत्याचा विरोध तर केला, पण दुसरीकडे त्याला झालेली मारहाण चुकीची असल्याचे सांगत भाजप नगरसेवकांवर देखील कारवाई करण्याची मागणी केली. 

मतीन आणि वादाचे समीकरण 

सय्यद मतीन आणि वाद हे जणू समीकरणच बनले आहे हे त्याच्या आतापर्यंतच्या वाटचालीवरून सिध्द झाले आहे. दोनवेळा तुरुगंवारी, तीन गुन्हे, दोनवेळा निलंबनाचे प्रस्ताव आणि पक्षाकडून वारंवार तंबी आतापर्यंत त्याच्या वाट्याला आली आहे. या शिवाय वैयक्तिक आरोपांना देखील त्याला तोंड द्यावे लागले. 

सभागृहात नेहमीच आक्रमक भूमिका घेत चर्चेत राहण्याचा प्रयत्न मतीन याने अनेकदा केला. ऑक्‍टोबर 2017 मध्ये पाणी प्रश्‍नावरून सभागृहात एमआयएमच्या नगरसेवकांनी गोंधळ घातला. तेव्हा देखील मतीन आघाडीवर होता. तत्तकालीन महापौर भगवान घडमोडे यांच्यावर खुर्ची फेकत, सुरक्षा रक्षकाला धक्काबुक्की केल्याप्रकरणी त्याच्यावर गुन्हा दाखल झाला होता. 

महापालिकेत्या प्रवेशद्वारावर उर्दू फलक लावण्याची मागणी करत त्याने जेसीबीच्या सहाय्याने स्वतः फलक लावला होता. वन्दे मातरमला विरोध दर्शवत सभागृहात घातलेला गोंधळ त्याला एवढा महागात पडला की त्यांची न्यायालयाने हर्सुल कारागृहात रवानगी केली होती. शिवाय महापालिकेनेही मतीनच्या कृत्याचा अहवाल शासनाकडे पाठवत त्याच्यावर कारवाईची मागणी केली होती. 

या शिवाय सिल्लेखान्यात गायी पकडून देणाऱ्या गोरक्षकांचा मुद्दा, उर्दू भाषेतून विषय पत्रिका मिळाव्या यासाठीची मागणी आणि मे महिन्यात शहरात उसळेल्या दंगल प्रकरणात देखील सय्यद मतीन याच्यावर गुन्हा दाखल होऊन त्याला अटक झाली होती. एकंदरित वादग्रस्त विषय सभागृहात काढून प्रकाशझोतात राहण्याचा मतीन याने वारंवार प्रयत्न केला. 

 

संबंधित लेख