Will Samruddhi Eway fit for 120 kmph Speed | Sarkarnama

'समृद्धी'ला तशी 120 किमी वेग मर्यादा झेपणार का?

सिद्धेश्‍वर डुकरे
गुरुवार, 16 ऑगस्ट 2018

समृध्दी महामार्गावरील कमाल वेग मर्यादा ताशी 120 किमी ठरवण्यात आली असून यादृष्टीनेच प्रकल्पाच्या कामाचे नियोजन करण्यात आले आहे. पण भारतात बनवण्यात येणाऱ्या गाड्यांचे डिझाइन पाहून वेग मर्यादा निश्‍चित करण्याची सूचनाही यावेळी रावते यांनी केली आहे. समृद्धी महामार्ग 700 किमीचा असून मुंबई ते नागपूर हे अंतर आठ तासात पूर्ण करावयाचे उद्दिष्ट ठेवून प्रकल्पाची आखाणीं करण्यात येत आहे.

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा अत्यंत महत्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या नागपूर- मुंबई या समृद्धी महामार्गावर वाहनांच्या वेगाची कमाल मर्यादा ताशी 120 किमी इतकी राखण्याचे निश्‍चित होत आहे. हा वेग भारतीय वाहनांना सुरक्षिततेच्या दृष्टीने झेपणार का? असा सवाल परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी अलिकडेच झालेल्या रस्ते सुरक्षा आढावा बैठकीत केला असल्याचे समजते.

समृध्दी महामार्गावरील कमाल वेग मर्यादा ताशी 120 किमी ठरवण्यात आली असून यादृष्टीनेच प्रकल्पाच्या कामाचे नियोजन करण्यात आले आहे. पण भारतात बनवण्यात येणाऱ्या गाड्यांचे डिझाइन पाहून वेग मर्यादा निश्‍चित करण्याची सूचनाही यावेळी रावते यांनी केली आहे. समृद्धी महामार्ग 700 किमीचा असून मुंबई ते नागपूर हे अंतर आठ तासात पूर्ण करावयाचे उद्दिष्ट ठेवून प्रकल्पाची आखाणीं करण्यात येत आहे.

सहयाद्री अतिथी गृहात रस्ते सुरक्षा परिषदेची अलिकडे बैठक झाली . या बैठकीत नियोजित समृद्धी महामार्गावरील वेग मर्यादे बाबतीतही चर्चा झाली. नागपूर ते मुंबई दरम्यान प्रस्तावित समृद्धी महामार्गावर करावयाच्या रस्ते सुरक्षाविषयक उपाययोजनांचे यावेळी सादरीकरण करण्यात आले. समृद्धी महामार्गासाठी अधिक वेगमर्यादा निश्‍चित करण्यात आली आहे. पण त्या वेगमर्यादे इतकी अत्याधुनिक वाहने आपल्याकडे आहेत का? याचा विचार करण्यात यावा असे रावते यांनी यावेळी सांगितले. मात्र या प्रकल्पाचे काम पूर्ण झाल्यानंतर पुन्हा या मार्गाचा आढावा घेऊन वेग मर्यादेत आवश्‍यक असल्यास बदल केला जाईल असेही वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

ख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 31जुलै 2015 रोजी समृद्धी महामार्गाची घोषणा केली होती. हा प्रकल्प जानेवारी 2018 मध्ये सुरु होणे अपेक्षित होते. मात्र जमीन संपादन आणि स्थानिक गावांचा विरोध असल्याने या प्रकल्पाला उशीर झाला आहे. प्रकल्पासाठी मुख्यमंत्र्यांनी वादग्रस्त सनदी अधिकारी राधेश्‍याम मोपालवर यांची नियुक्ती केली आहे. येत्या दोन महिन्यात या प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याची टेंडर प्रक्रिया पूर्ण होणार आहे.

या प्रकल्पासाठी 46000 कोटी रुपयांचा एकूण खर्च प्रस्तावित आहे. समृद्धी महामार्ग 10जिल्हे, 26 तालुके आणि 392गावांना जोडणार आहे .या महामार्गामुळे मुंबई ते नागपूर हे 16 तासांचे अंतर केवळ आठ तासात पूर्ण होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

राज्यातल्या रस्ते अपघाताचा ही आढावा या बैठकीत घेण्यात आला असून 2013 च्या तुलनेत मागील वर्षी महाराष्ट्रातील अपघातांची संख्या ही 10.5 टक्‍क्‍यांनी कमी झाली असल्याचे यावेळी अधिकाऱ्यांनी सांगितले. महाराष्ट्रातील 66 टक्के अपघाती मृत्यू हे मोटारसायकल, सायकल आणि पादचाऱ्यांच्या अपघातातील आहेत. अपघाती मृत्युंच्या संख्येत देशात महाराष्ट्र तिसऱ्या क्रमांकावर आहे. महाराष्ट्रात महामार्गांची संख्या 15 टक्के असली तरी महामार्गांवर होणाऱ्या अपघातांची संख्या मात्र 57 टक्के इतकी आहे. इतर मार्गांवरील अपघातांची संख्या ही 33 टक्के इतकी आहे, अशी माहिती यावेळी झालेल्या सादरीकरणात देण्यात आली.

घाटामधील अपघात रोखण्यासाठी समिती
नुकत्याच झालेल्या आंबेनळी घाटातल्या अपघाताबाबत ही चर्चा झाली. राज्यातील घाटांमधील वाढते अपघात रोखण्यासंदर्भात उपाययोजना सुचविण्यासाठी एका तज्ञ समितीची स्थापना करण्याचा निर्णय राज्य रस्ते सुरक्षा परिषदेच्या आज झालेल्या बैठकीत घेण्यात आला. समितीमध्ये संबंधीत विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी, रस्ता संरक्षासंदर्भातील तज्ञ आदींचा समावेश करण्यात यावा आणि समितीने सहा महिन्यात शासनास अहवाल सादर करावा, असे ठरले आहे.

संबंधित लेख