डाॅ. सुजय विखेंना अभय, मग राष्ट्रवादीतील दोन्ही काकांचं काय

काँगेसच्या जनसंघर्ष यात्रेचा समारोप काल (मंगळवारी) पाथर्डी येथे झाला. या वेळी डाॅ. सुजय विखे यांनी हा प्रश्न उपस्थित करून वरिष्ठांना बोलते केले. आघाडीच्या जागावाटपात ही जागा राष्ट्रवादीकडे असली, तरी काँग्रेसने ती मागून घ्यावी, अशी मागणी डाॅ. विखे यांनी प्रास्तविकातून केली. त्यामुळे सर्वच नेते या विषयी बोलू लागले.
Arunkaka Jagtap-Sujay Vikhe-Pratap Dhakane
Arunkaka Jagtap-Sujay Vikhe-Pratap Dhakane

नगर : लोकसभेच्या नगर दक्षिणच्या जागेचे त्रांगडे अजून काही संपत नाही. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुंबईतील बैठकीत ही जागा राष्ट्रवादीच लढविणार हे ठासून सांगितले असताना इकडे काँग्रेसचे नेते मात्र आघाडीकडून उमेदवारी मिळणारच आहे, अशा अविर्भावात तयारीला लागले आहे. त्यामुळे राष्ट्रवादीचे नेते द्विधेत अडकले आहेत. विशेषतः विधानपरिषदेचे आमदार अरुण जगताप (अरुणकाका) यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता, तसेच राष्ट्रवादीचे सरचिटणीस अॅड. प्रताप ढाकणे (प्रतापकाका) यांचीही उमेदवारीसाठी इच्छा अधुरी राहण्याची शक्यता आहे.

काँगेसच्या जनसंघर्ष यात्रेचा समारोप काल (मंगळवारी) पाथर्डी येथे झाला. या वेळी डाॅ. सुजय विखे यांनी हा प्रश्न उपस्थित करून वरिष्ठांना बोलते केले. आघाडीच्या जागावाटपात ही जागा राष्ट्रवादीकडे असली, तरी काँग्रेसने ती मागून घ्यावी, अशी मागणी डाॅ. विखे यांनी प्रास्तविकातून केली. त्यामुळे सर्वच नेते या विषयी बोलू लागले. प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी तर "डाॅ. विखे यांना निवडून आणण्याची जबाबदारी आमची, पक्ष विखेंच्या पाठीमागे भक्कमपणे उभा राहिल," असे सांगून लवकरच एक वरिष्ठांचे शिष्टमंडळ पवार यांना भेटून या विषयी चर्चा करणार असल्याचे सांगितले. 

त्यामुळे वरिष्ठ पातळीवर खास तडजोडी होऊन ही जागा काँग्रेसकडे जाईल, अशी शक्यता वर्तविली जात आहे. जागा नुसती काँग्रेसकडे जाईल या पेक्षा डाॅ. विखे यांना उमेदवारीही मिळेल, हे निश्चित मानले जाते.

डाॅ. विखे यांची तयारी पूर्ण
दरम्यान, मागील वर्षी डाॅ. विखे यांनी कोणत्याही पक्षाकडून का होईना, प्रसंगी अपक्ष लढण्याची वेळ आली तरी चालेल, पण नगर दक्षिणेची लोकसभेची निवडणूक लढवायची, असे जाहीर केले होते. त्यानुसार त्यांनी आरोग्य शिबिरांच्या माध्यमातून संपूर्ण मतदारसंघ पिंजून काढला आहे. प्रत्येक गावात विखे यंत्रणा सक्रीय केली आहे. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत ते उमेदवारी करतील, या शक्यतेला पुष्टी मिळते. या उलट काँग्रेसची मोठी जबाबदारी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर आहे. त्यामुळे ते भाजपसारख्या पक्षाचा विचार डाॅ. सुजय विखे यांच्यासाठी करण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे आघाडीतील जागा बदल हा एकमेव पर्याय विखे यांच्यापुढे राहिलेला आहे. त्यामुळे काहीही तडजोड करून विखे ही जागा पटकावतील, अशीच शक्यता वर्तविली जात आहे.

दोन्ही काकांची समजूत निघेल का..
ही जागा जर काँग्रेसला गेली, तर राष्ट्रवादीच्या दोन्ही 'काकां'ची स्थिती अडचणीची होणार आहे. अरुण जगताप यांचे पूत्र संग्राम जगताप यांना विधानसभेची शहरातील उमेदवारी मिळणारच आहे. त्यामुळे अखेरच्या टप्प्यात अरुण जगताप यांची समजूत निघू शकते. अशीच स्थिती अॅड. ढाकणे यांचीही आहे. त्यांच्या पत्नी प्रतिभा ढाकणे यांना जर पाथर्डी-शेवगाव मतदारसंघातून विधानसभेची उमेदवारी दिली, तर अॅड. ढाकणे यांचीही समजूत निघेल. त्यामुळे आता पक्षाध्यक्ष शरद पवार कोणती भूमिका घेतात, याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com