Will not Tolerate Defamation of Yogesh Tilekar | Sarkarnama

आमदार योगेश टिळेकर यांची बदनामी खपवून घेतली जाणार नाही -- कल्याण आखाडे

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 17 ऑक्टोबर 2018

पुण्याच्या हडपसर मतदार संघाचे आमदार योगेश टिळेकर यांच्यावर बिनबुडाचे आरोप करून करण्यात आलेली बदनामी कदापी खपवून घेतली जाणार नाही, असा इशारा सावता परिषदेचे संस्थापक अध्यक्ष कल्याण आखाडे यांनी एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिला आहे.

जालना : पुण्याच्या हडपसर मतदार संघाचे आमदार योगेश टिळेकर यांच्यावर बिनबुडाचे आरोप करून करण्यात आलेली बदनामी कदापी खपवून घेतली जाणार नाही, असा इशारा सावता परिषदेचे संस्थापक अध्यक्ष कल्याण आखाडे यांनी एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिला आहे.

पत्रकात म्हटले आहे की, आमदार योगेश टिळेकर यांची आपला माणूस - हक्काचा माणूस, आपला आमदार - दमदार आमदार अशाप्रकारची कर्तृत्वातून ओळख निर्माण झाली असून जनसंपर्क व विकास कामे यामुळे ते लोकप्रिय ठरले आहेत. त्यांची वाढती लोकप्रियता सहन होत नसल्यामुळे त्यांच्याविरुद्ध खंडणी मागितल्याचे कुभांड रचून त्यांना राजकीयदृष्ट्या बदनाम करण्याचे कटकारस्थान करण्यात आले आहे. टिळेकर परिवार हा वारकरी परंपरेतील परिवार आहे. या परिवाराचे आध्यात्मिक, सामाजिक व राजकिय क्षेत्रातील योगदान मोलाचे व मोठे आहे. परिवाराने राजकारणातील अनेक छोट्या-मोठया पदावर राहून कार्य करत असताना त्यांच्याकडे बोट दाखवावे असे चुकूनही चुकीचे काम आजपर्यंत कधीच केलेले नाही. मात्र, त्यांचा चढता राजकीय आलेख न खुपल्यामुळे त्यांच्या कारकीर्दीवर शिंतोडे उडविणाऱ्यांची गय केली जाणार नाही.

'रविंद्र बराटे नामक व्यक्तीने केलेला खंडणी मगितल्याचा आरोप धादांत खोटा आहे. फिर्याद एक महिन्यानंतर दाखल होते, गुन्हा नोंद मात्र तातडीने होते. याप्रकरणी पोलीस प्रशासनाची भूमिका ही संशयास्पद आहे. यामागे कोणाचा हात आहे. रविंद्र बराटेंचा बोलविता, कराविता धनी कोण आहे याचा छडा लागला पाहिजे,' अशीही मागणी या पत्रकात करण्यात आली आहे. 

या प्रकरणाचा कसून तपास करून रविंद्र बराटेच्या प्रवृत्तीची व संपत्तीची चौकशी करण्यात यावी व योगेश टिळेकर यांच्यावर दाखल झालेला गुन्हा तात्काळ मागे घेण्यात यावा, अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व ओबीसी नेत्या तथा राज्याच्या ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्याकडे करणार असल्याचे सांगून याप्रकरणी राज्यभरातील माळी समाज बांधव टिळेकर यांच्या पाठीशी असून वेळ पडल्यास सावता परिषदेच्या वतीने राज्यात सर्वत्र चक्काजाम आंदोलन छेडण्याचा इशाराही कल्याण आखाडे यांनी दिला आहे.

संबंधित लेख