Will Nashik Get Municipal Commissioner soon | Sarkarnama

नाशिकला कोणी आयुक्त देत का आयुक्त! 

सरकारनामा ब्युरो 
मंगळवार, 4 डिसेंबर 2018

महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांच्याविषयी सत्ताधारी भारतीय जनता पक्षाच्या नगरसेवक व पदाधिकाऱ्यांच्या तक्रारी होत्या. त्यामुळे राजकीय वादातून त्यांची बदली झाली. त्यांच्या बदलीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दत्तक घेतलेल्या नाशिकला गेल्या तेरा दिवसांनंतरही आयुक्त मिळालेला नाही.

नाशिक : महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांच्याविषयी सत्ताधारी भारतीय जनता पक्षाच्या नगरसेवक व पदाधिकाऱ्यांच्या तक्रारी होत्या. त्यामुळे राजकीय वादातून त्यांची बदली झाली. त्यांच्या बदलीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दत्तक घेतलेल्या नाशिकला गेल्या तेरा दिवसांनंतरही आयुक्त मिळालेला नाही. त्यामुळे नाशिककरांवर आता अक्षरशः "कोणी आमच्या महापालिकेला आयुक्त देतं का आयुक्त!'' असे म्हणण्याची वेळ आली आहे. 

महापालिका आयुक्त मुंढे यांची मंत्रालयात नियोजन विभागाचे सहसचिव या पदावर नियुक्ती झाली. बदलीचा आदेश येताच मुंढे यांनी तातडीने आपला कार्यभार जिल्हाधिकाऱ्यांकडे सोपवून बदलीच्या पदावर ते रुजू झाले. त्यानंतर प्रारंभी उस्मानाबादचे जिल्हाधिकारी राधाकृष्ण गमे यांचे नाव पुढे आले. मात्र, त्यांनी बराच काळ नाशिकला काम केले असल्याने प्रशासकीय अडचण पुढे आली. त्यानंतर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या सचिव अश्‍विनी जोशी यांच्या नावाची चर्चा होती. मात्र मुंढे एव्हढ्याच कडक शिस्तीच्या असल्याने त्या भाजपला परवडतील काय? या भितीने त्यांचे नावही मागे पडले. त्यानंतर मराठा आरक्षणाचा मुद्दा चर्चेत राहिल्याने यावर निर्णय घेण्यास मुख्यमंत्री कार्यालयाला वेळ मिळाला नाही. आता तेरा दिवसांनतरही महापालिकेला आयुक्त मिळालेला नाही. 

आयुक्त पदी मुंढेच असावेत असे मानणारा नागरीकांचा व सामाजिक संस्थांचा एक वर्ग सक्रीय आहे. त्यांनी सह्यांची मोहिम सुरु केली आहे. यासंदर्भात अंजली दमानीया यांच्या नेतृत्वाखाली मोर्चाही काढण्यात आला. श्रीमती दमानिया यांनी याविषयी जनहित याचिका दाखल केली जाईल अशी घोषणा केली होती. मात्र जनहित याचिका किंवा नव्या आयुक्तांची नियुक्ती यापैकी काहीही झालेले नाही. सध्यातरी मुख्यमंत्र्यांचे दत्तक शहर आयुक्तांविनाच आहे. 

संबंधित लेख