will murlidhar mohol bjp candidate for pune? | Sarkarnama

शिरोळेंसाठी राडा घातलेले मुरलीधर मोहोळच त्यांचे लोकसभेचे तिकिट कापणार?

सरकारनामा ब्यूरो
सोमवार, 11 फेब्रुवारी 2019

राजकारणात काहीह घडू शकते. पुण्याचे खासदार अनिल शिरोळे यांना 2007 मध्ये पुणे महापालिकेच्या निवडणुकीत उमेदवारी मिळविण्यासाठी भाजप कार्यालयात राडा घातलेले मुरलीधर मोहोळ यांचेच नाव आता पुणे लोकसभेसाठी भाजपचे संभाव्य उमेदवार म्हणून घेतले जाऊ लागले आहे. 

पुणे :  लोकसभेच्या निवडणुकीसाठी उमेदवार शोधण्यासाठी भाजप सध्या विविध पर्यायांवर विचार करत असून, आता नव्या चेहऱ्यांच्या नावाची चर्चा जोरात सुरू आहे. या नव्या नावांत वडगाव शेरीचे आमदार जगदिश मुळीक आणि स्थायी समितीचे माजी अध्यक्ष मुरलीधर मोहोळ यांचा विचार सुरू आहे. 

विद्यमान खासदार अनिल शिरोळे, पालकमंत्री गिरीश बापट आणि शहराध्यक्ष योगेश गोगावले हे जुन्या पिढीतील नेते ठरत असल्याने नव्या चेहऱ्यांना संधी देण्याचा विचार पक्ष पातळीवर सुरू आहे. या नव्या चेहऱ्यांत मराठा समाजाला प्राधान्य असल्याचे असल्याचे दिसून येत आहे. 

जुन्या चेहऱ्यांना पूर्णपणे नाकारतील, असे चित्र नसले तरी नव्या नावांमुळे पुणे शहर भाजपमध्ये अनेकांच्या भुवया उंचावल्या गेल्या आहेत. नरेंद्र मोदी आणि अमित शहा हे तरुणांना उमेदवारी देणार असल्याची चर्चा गेले काही दिवस होती. पण यात पुण्याचाही समावेश असेल, असे कोणाला वाटत नव्हते. बापट, शिरोळे आणि राज्यसभेचे खासदार संजय काकडे या तीन नावांपुरतीच सुरवातीला चर्चा होती. त्यानंतर गोगावले यांचेही नाव इच्छुकांमध्ये येऊ लागले. सध्या काकडेंची चर्चा भाजपच्या वर्तुळातून होत नाही. त्यांच्या नाव कॉंग्रेसचे संभाव्य उमेदवार म्हणून घेतले जाते. 

कॉंग्रेसकडून काकडे असल्यास त्यांच्या विरोधात मराठा समाजातीलच उमेदवार द्यावा, असा भाजपमध्ये प्रवाह आहे. जुन्यांपैकी कोणाला संधी द्यायची नसेल तर मोहोळ आणि मुळीक ही नावे सध्या पक्षश्रेष्ठींच्या फाइलवर आहेत. त्यातील कोणत्या नावावर काट बसणार आणि कोणाला संधी मिळणार, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. 

मुळीक हे भाजपसाठी कधी काळी कठीण असलेल्या वडगाव शेरी मतदारसंघातून आमदार झाले आहेत. ते आमदार झाल्यानंतर त्यांनी तेथे भाजपची ताकद वाढविली. महापालिकेतील नगरसेवकांची संख्या वाढविली. त्यांचे बंधू योगेश मुळीक हे स्थायी समितीचे अध्यक्ष झाले. त्यातून वडगाव शेरीतील प्रभाव त्यांनी आणखी वाढवता आला आहे. त्याचा फायदा लोकसभा निवडणुकीत होऊ शकेल, असा पक्षाचा होरा आहे. मुळीक यांना भाजपची खरोखरीच उमेदवारी मिळाली आणि ते निवडून आले तर ते पुण्यात सर्वात तरुण खासदार ठरतील. 

भारतीय जनता युवा मोर्चापासून आपल्या राजकीय कारर्किदीची सुरवात करणारे मोहोळ हे सध्या मुख्यमंत्र्याचे जवळचे समजले जातात. कोथरूडमधून आमदार होण्यासाठी त्यांनी सध्या तयारी चालविली असली तरी लोकसभेची लॉटरी मिळण्याच्या शक्‍यतेने त्यांच्याही कार्यकर्त्यांत उत्साह आहे. खडकवासल्यातून विधानसभेची पोटनिवडणूक लढविण्याचा त्यांचा अनुभव आहे. 2014 च्या निवडणुकीत ते शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघातून इच्छुक होते.

मोहोळ हे कधीकाळी अनिल शिरोळे यांचे समर्थक होते. शिरोळे यांना 2007 च्या पुणे महापालिकेच्या निवडणुकीत उमेदवारी मिळावी यासाठी त्यांनी भाजपच्या कार्यालयात राडाही घातला होता. आता शिरोळे यांचीच उमेदवारी कापण्यात मोहोळ यशस्वी होतात का, हे पाहणे औत्युक्‍याचे ठरेल. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख