Will Murali Manohar Joshi - Udhhav Thakre meeting diffuse tension in alliance ? | Sarkarnama

मुरली मनोहर जोशी- उद्धव ठाकरे भेटीने  उभय पक्षांतील तणाव निवळणार ? 

सरकारनामा
बुधवार, 22 ऑगस्ट 2018

हिंदुत्वाच्या मुद्द्यावर शिवसेना आक्रमक असल्याने मुरलीमनोहर जोशी यांच्यासारख्या कट्टर हिंदुत्वाचा पुरस्कार करणाऱ्या नेत्याने उद्धव ठाकरे यांची भेट घेतल्याने राजकीय चर्चेला उधाण आले आहे.

मुंबई :  भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते मुरलीमनोहर जोशी यांनी आज मातोश्रीवर जाऊन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. या दोघांमध्ये सुमारे एक तास चर्चा झाली असून, भाजप व शिवसेनेतला तणाव निवळण्यासाठी जोशी यांनी शिष्टाई केल्याचे मानले जात आहे.

या दोन्ही नेत्यांमध्ये झालेल्या चर्चेचा तपशील गुलदस्तात असला तरी, आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्‍वभूमीवर भाजप- शिवसेना युती अभेद्य राहावी, यासाठी भाजपने जोरदार प्रयत्न सुरू केल्याचे संकेत आहेत.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी स्वबळाची घोषणा केल्यानंतर दोन्ही पक्षांत कमालीचा संघर्ष पेटलेला आहे. केंद्र सरकारची धोरणे व पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप अध्यक्ष अमित शहा यांच्यावर शिवसेना नेत्यांनी टीकेची झोड उठवलेली आहे.

यामुळे भाजपमध्ये अस्वस्थता असल्याचे बोलले जाते. या अगोदर भाजप अध्यक्ष अमित शहा यांनीही मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती. त्यानंतरही भाजपची शिवसेनाविरोधी भूमिका आक्रमक राहिली.

हिंदुत्वाच्या मुद्द्यावर शिवसेना आक्रमक असल्याने मुरलीमनोहर जोशी यांच्यासारख्या कट्टर हिंदुत्वाचा पुरस्कार करणाऱ्या नेत्याने उद्धव ठाकरे यांची भेट घेतल्याने राजकीय चर्चेला उधाण आले आहे.

 

संबंधित लेख