UP : Will Mayawati - Akhilesh alliance gain 50 lok sabha seats ? | Sarkarnama

उत्तर प्रदेशात मायावती - अखिलेश युती लोकसभेच्या 50 जागा मिळविणार का?

वृत्तसंस्था
शनिवार, 12 जानेवारी 2019


बसपाच्या नेत्या मायावती यांनी अखिलेश यादव यांची वाढती लोकप्रियता रोखण्यासाठी त्यांच्याविरुद्ध सीबीआय चौकशीचा ससेमिरा लावण्यात आला आहे असे सांगून आपण अखिलेश यांच्या पाठीशी सर्वशक्तीनिशी उभे असल्याचे स्पष्ट केले.

तर अखिलेश यादव यांनी मायावती यांच्याविरोधात जर कोणी टीका केली तर ती माझ्यावर केली आहे, असे मानून समाजवादी पार्टीच्या कार्यकर्त्यांनी त्याला उत्तर द्यावे असे जाहीरपणे सांगितले.

लखनौ : बहुजन समाज पार्टीच्या अध्यक्षा मायावती आणि समाजवादी पार्टीचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी आगामी लोकसभा निवडणुकीसाठी दोन्ही पक्षांची युती झाल्याचे जाहीर केले. उत्तर प्रदेशच्या 80 पैकी 50 जागांवर सपा-बसपा आघाडीची नजर आहे.

प्रत्येकी ३८ जागा लढविणाऱ्या  सपा आणि बसपाने आपल्या युतीमध्ये कॉंग्रेस पक्षाला घेतले नसले तरी सोनिया गांधी यांच्यासाठी रायबरेली आणि राहुल गांधी यांच्यासाठी अमेठी मतदारसंघ सोडला आहे. या दोन्ही मतदारसंघात सपा-बसपाचा उमेदवार असणार नाही, असे मायावती आणि अखिलेश यांनी संयुक्त पत्रकार परिषदेमध्ये जाहीर केले आहे.

2014 च्या लोकसभा निवडणुकीत उत्तर प्रदेशमध्ये भाजपचे 80 पैकी 71 खासदार निवडून आले होते. समाजवादी पार्टीचे 5 आणि कॉंग्रेस चे 2 खासदार निवडून आले होते. मायावतींच्या बसपाला भोपळाही फोडता आला नव्हता. मात्र गेल्या लोकसभा निवडणुकीत सपा आणि बसपा या दोन पक्षाच्या उमेदवारांना उत्तर प्रदेशात मिळालेल्या मतांची मतदारसंघ निहाय बेरीज केली तर या दोन पक्षांचे 53 खासदार निवडून आले असते.

त्यामुळे सपा-बसपा युती 50 + चे टार्गेट समोर ठेवून लोकसभा निवडणुका लढविणार आहे. सपा-बसपाला 50 पेक्षा अधिक जागा मिळवता आल्या तर भाजपला पुन्हा केंद्रात सत्ता संपादन करण्यात खूप अडचणी येऊ शकतात.

गेल्या वर्षी झालेल्या लोकसभेच्या पोटनिवडणुकीमध्ये सपा आणि बसपा हे दोन पक्ष एकत्र आले होते. त्यावेळी लोकसभेच्या तीन पैकी दोन जागा सपाने जिंकल्या तर अजितसिंग यांच्या लोकदलाला एक जागा मिळाली होती.

त्या निवडणुकीनंतर आपण एकत्र आल्यास भाजपला पराभूत करणे शक्‍य आहे  असा साक्षात्कार मायावती आणि अखिलेश यांना झाला. त्यानंतर या दोन्ही पक्षांची वाटचाल युतीच्या दिशेने सुरू झाली होती. आज शनिवारी या दोन्ही नेत्यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन युती झाल्याचे जाहीर केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांची झोप उडविण्याची भाषा या नेत्यांनी पत्रकार परिषदेत केली. तसेच कॉंग्रेस पक्षाबरोबर आघाडी करण्यात सपा-बसपाचा कोणताही फायदा नाही असेही सांगून टाकले. अजितसिंग यांच्या लोकदल पक्षाशी युतीबाबत आपण नंतर बोलणार असल्याचे अखिलेश यांनी सांगितले.

कांशीराम आणि मुलायम सिंग यांनी 25 वर्षांपूर्वी सपा आणि बसपामध्ये पहिल्यांदा युती केली होती. ही युती होताच त्यांना 176 जागा मिळून उत्तर प्रदेशची सत्ता सपा-बसपाकडे आली होती.

मुलायमसिंह यादव हे मुख्यमंत्री झाले होते. पण जून 1995 मध्ये मायावतींनी मुलायमसिंह सरकारचा पाठिंबा काढून घेतला होता. त्यामुळे संतप्त झालेल्या समाजवादी पार्टीच्या कार्यकर्त्यांनी मायावती ज्या गेस्टहाऊसवर थांबल्या होत्या तेथे हल्ला चढवला होता. सपाच्या कार्यकर्त्यांनी तेथे मोडतोड करीत दिसेल त्याला मारहाण केली होती. त्यामुळे या दोन पक्षांत फाटाफूट झाली होती.

या दोन पक्षांमध्ये प्रदीर्घ काळ वैमनस्य राहिले आणि त्याचा लाभ भाजपला अनेक वेळा झाला. मात्र गेल्या लोकसभा निवडणुकीत मायवतींचा एकही खासदार निवडून आला नाही. मायावती यांना राज्यसभेवर जायचे होते तर त्यासाठी आवश्‍यक असणारे आमदारही बसपाकडे नव्हते.

तेव्हा अखिलेश यांनी मायावतींना राज्यसभेची सीट ऑफर करून मैत्रीचा हात पुढे केला होता. त्यानंतर या दोन्ही नेत्यांमध्ये एवढी जवळीक निर्माण झाली की राजकारणात त्यांचा उल्लेख बुआ - भतीजा असा करण्यात येऊ लागला आहे. मायावती - अखिलेश  युती उत्तर प्रदेशात लोकसभेच्या 50 जागा मिळविणार का?

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख