will-maharashtras-bjp-incharge-saroj-pande-replaced? | Sarkarnama

भाजपच्या महाराष्ट्राच्या प्रभारी सरोज पांडे यांना बदलणार ?

सरकारनामा
बुधवार, 26 डिसेंबर 2018

केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांच्याकडे राजस्थानची जबाबदारी कायम ठेवण्यात आली. 

नवी दिल्ली :  सत्तारूढ भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष अमित शहा यांनी आगामी लोकसभा निवडणुकीसाठी 17 राज्यांतील निवडणूक प्रभारी नेत्यांची नावे आज जाहीर केली.  महाराष्ट्र व गोव्यातील प्रभारींची नावे आज जाहीर झाली नाहीत. 

भाजप सूत्रांच्या म्हणण्यानुसार महाराष्ट्रात प्रदेशाध्यक्षपदातही बदल होऊ शकतो, त्यामुळे तेथील घोषणा संसदीय अधिवेशनाला जानेवारीत अल्पविराम मिळाल्यानंतर होईल, अशी शक्‍यता वर्तविली जात आहे. महाराष्ट्राच्या सध्याच्या प्रभारी सरोज पांडे यांना दुर्गमधून (छत्तीसगड) लोकसभेचे तिकीट देण्याचे ठरले, तर त्या पदावरही नवीन नियुक्ती करावी लागणार आहे.

केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांच्याकडे राजस्थानची जबाबदारी कायम ठेवण्यात आली असून त्रिपुरामध्ये भाजपला शून्यातून विजय मिळून देण्यात महत्त्वाची कामगिरी बजावणारे सुनील देवधर यांच्याकडे आंध्र प्रदेशाचे सहप्रभारीपद देण्यात आले आहे.

लोकसभेतील सत्तेची चावी मानली जाणाऱ्या उत्तर प्रदेशाकडे स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी व शहा यांना जातीने लक्ष घालावे लागणार आहे. मात्र त्या राज्यात गुजरातचे गोवर्धन झाडापिया यांच्याकडे प्रभारीपद देण्यात आले असून त्यांच्या जोडीला दुष्यंत गौतम व नरोत्तम मिश्रा यांना सहप्रभारी बनविण्यात आले आहे. मिश्रा हे मध्य प्रदेशातील विरोधी पक्षनेतेपदासाठी अडून बसल्याचे सांगण्यात येत होते. मात्र त्यांना उत्तर प्रदेशातील उच्चवर्गीयांचे मन वळविण्यासाठी पाठविण्याचे शहा यांनी ठरविल्याचे स्पष्ट आहे.

मध्य प्रदेशाचे प्रभारी म्हणून ज्येष्ठ नेते स्वतंत्रदेव सिंह यांना नेमण्यात आले असून दिल्लीचे माजी प्रदेशाध्यक्ष सतीश उपाध्याय यांना त्यांचे सहप्रभारी बनवून दिल्लीत मनोज तिवारी-शाम जाजू यांचा मार्ग मोकळा केल्याचे दिसते. ज्येष्ठ नेते ओमप्रकाश माथूर यांना राजस्थानातून गुजरातेत हलविण्यात आले आहे. 

शहा यांचे विश्‍वासू भूपेंद्र यादव यांच्यावर बिहारची महत्त्वाची जबाबदारी देण्यात आली आहे. चंडीगडमधून आगामी निवडणुकीत अभिनेत्री किरण खेर यांच्याऐवजी एखाद्या नामांकित चेहऱ्याच्या शोधात असणाऱ्या भाजप नेतृत्त्वाने तेथील जबाबदारी कॅप्टन अभिमन्यू यांच्याकडे दिली आहे.

संबंधित लेख