औरंगाबाद लोकसभा मतदारसंघ : कोळसे पाटील यांची उमेदवारी आघाडीला त्रासदायक ठरणार?

कॉंग्रेसचा उमेदवार सलग चार वेळा पराभूत झाल्याने यंदा राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून मतदारसंघावर दावा केला जातोय. याचा अंतिम निर्णय अद्याप झालेला नाही. आघाडीत हा मतदारसंघ राष्ट्रवादी कॉंग्रेसला सुटणार का, याची चर्चा होत असताना परभणी येथील सभेत प्रकाश आंबेडकर यांनी औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातून निवृत्त न्यायमर्ती बी. जी. कोळसे पाटील यांची उमेदवार जाहीर केली आहे. याचा सर्वाधिक फटका कॉंग्रेस-राष्ट्रवादीच्या उमेदवाराला बसण्याची शक्‍यता आहे.
Chandrakant Khaire - Satich Chavan - Ravindra Bansod - BG Kolse Patil
Chandrakant Khaire - Satich Chavan - Ravindra Bansod - BG Kolse Patil

औरंगाबाद : हा मतदारसंघ हा शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. या बालेकिल्ल्यात शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी १९९९, २००४, २००९ आणि २०१४ अशा सलग चार लोकसभा निवडणुकीत विजय मिळवलेला आहे. शिवसेनेकडून तेच मैदानात असतील हे जवळपास निश्‍चित आहे. त्यातच जय बाबाजी भक्त परिवाराच्या माध्यमातून शांतिगिरी महाराज स्वतः मैदानात उतरणार की पाठिंबा देण्याची भूमिका घेतात, याकडे सुद्धा सर्वच पक्षांचे लक्ष लागलेले आहे.

कॉंग्रेसचा उमेदवार सलग चार वेळा पराभूत झाल्याने यंदा राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून मतदारसंघावर दावा केला जातोय. याचा अंतिम निर्णय अद्याप झालेला नाही. आघाडीत हा मतदारसंघ राष्ट्रवादी कॉंग्रेसला सुटणार का, याची चर्चा होत असताना परभणी येथील सभेत प्रकाश आंबेडकर यांनी औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातून निवृत्त न्यायमर्ती बी. जी. कोळसे पाटील यांची उमेदवार जाहीर केली आहे. याचा सर्वाधिक फटका कॉंग्रेस-राष्ट्रवादीच्या उमेदवाराला बसण्याची शक्‍यता आहे.

सलग चार वेळा खासदार राहिलेले शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांचा मतदारसंघातील लोकांशी असलेला थेट संपर्क हेच त्यांचे प्रमुख बलस्थान आहे. धार्मिक उत्सवांमध्ये सहभाग, धार्मिकतेमुळे त्यांची वेगळी धार्मिक प्रतिमासुद्धा तयार झालेली आहे. याचा फायदा त्यांना निवडणुकीत मिळत आलेला आहे. शिवसेनेचे गावोगावी पोचलेले संघटन ही देखील खैरे यांच्यासाठी जमेची बाजू आहे. मात्र, मतदारसंघात अनेक विकासाचे प्रश्‍न कायम असून औरंगाबाद शहरातील रस्ते, पाणी आणि गंभीर झालेली कचऱ्याची समस्या ही खैरेंसाठी डोकेदुखी ठरू शकते. शहरात झालेली दंगल आणि नेहमीप्रमाणे मतांचे धार्मिक धुव्रीकरण यावेळी सुद्धा महत्त्वाची भूमिका बजावण्याची शक्‍यता आहे.

आतापर्यंतच्या निवडणुकांमध्ये शिवसेना विरुद्ध कॉंग्रेस अशी थेट लढत झालेली आहे. यावेळी वंचित आघाडीतर्फे बी. जी. कोळसे पाटील यांची उमेदवार जाहिर करण्यात आलेली आहे. वंचित आघाडीची राज्यातील पहिली सभा औरंगाबादच्या जबिंदा मैदानावर झाली होती. औरंगाबाद शहरात एमआयएमचे नेटवर्क अतिशय मजबूत आहे. त्यामुळे दलित-मुस्लिम मतांच्या जोरावर वंचित बहुजन आघाडीचे उपद्रव मूल्य जाणवणार असून, याचा थेट परिणाम कॉंग्रेस-राष्ट्रवादी आघाडीवर होईल.

आघाडीत कॉंग्रेसकडे असलेल्या मतदारसंघावर राष्ट्रवादीकडून दावा केला जात असला तरी कॉंग्रेसकडून १२ जणांच्या नावांचा प्रस्ताव आला होता. विद्यमान विधान परिषदेचे आमदार सुभाष झांबड किंवा फुलंब्रीचे माजी आमदार डॉ. कल्याण काळे हे उमेदवार असू शकतील अशी चर्चा असतानाच आता कॉंग्रेसकडून रवींद्र बनसोड या शिक्षणक्षेत्रातील दिग्गजाचे नाव पुढे येत आहे. ही जागा जर राष्ट्रवादीला सुटली तर पदवीधरचे विद्यमान आमदार सतीश चव्हाण हे उमेदवार असण्याची शक्‍यता आहे. तर कॉंग्रेसचे सुभाष झांबड हे लोकसभा लढवण्यास इच्छुक असल्यामुळे त्यांनी तयारी देखील सुरू केली आहे.

शिवसेना-भाजप युतीमध्ये हा मतदारसंघ शिवसेनेकडे आहे. सलग चारवेळा खासदार राहिलेले विद्यमान खासदार चंद्रकांत खैरे हेच पाचव्यांदा उमेदवार असतील. युती झाली नसती तर भाजपकडून येथे जयसिंगराव गायकवाड, मराठवाडा विकास मंडळाचे अध्यक्ष डॉ. भागवत कराड, महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर, विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांची नावे होती. यापैकी जयसिंगराव गायकवाड यांनी मतदारसंघात मागील वर्षभरापासून तयारी सुरू ठेवली होती. मात्र, आता युती झाल्याने तो प्रश्न मिटल्यात जमा आहे.

2014 चे मतविभाजन
चंद्रकांत खैरे (शिवसेना)- 5,20,902 (विजयी)
नितीन पाटील (कॉंग्रेस)- 3,58,902
इंद्रकुमार जेवरीकर (बसपा)- 37,419
सुभाष लोमटे (आप)- 11,974

निवडणुकीत प्रभावी ठरणारे मुद्दे
0 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पंतप्रधान पीकविमा, संपूर्ण शेतकरी कर्जमाफी आणि बोंडअळी अनुदान मिळाले नाही.
0 औरंगाबादकरांना रोज पाणी मिळवून देण्याची घोषणा हवेतच विरली. तीन दिवसांत मिळणारे पाणी आज पाचव्या दिवशी मिळते.
0 औरंगाबाद शहराला पाणीपुरवठा करणारी अधांतरी अटकलेली समांतर जलवाहिनी, शहरातील गंभीर झालेला कचरा प्रश्‍न
0 रोजगार निर्मितीअभावी वाढती बेरोजगारी
0 कायदा व सुव्यवस्था, सांप्रदायिकता, जातीय धुव्रीकरण

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com