Will Infrom Kej Measurement issue to Party - Chitra Wagh | Sarkarnama

केज येथील शेतकरी लुटीचा अहवाल पक्षाला देणार : चित्रा वाघ यांची माहिती

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 11 जुलै 2018

शासनाच्या नाफेड मार्फत सरत्या हंगामात हरभरा खरेदीसाठी केज खरेदी विक्री संघाची सब एजंट संस्था म्हणून नेमणूक होती. या ठिकाणी प्रत्येक क्विंटल मागे १० ते १३ किलो हरभरा कपातीच्या नावाखाली जास्त घेऊन शेतकऱ्यांची लुट केल्याचा आरोप आहे. 

बीड : शरद पवार यांनी शेतकऱ्यांसाठी केलेल्या कामांमुळे त्यांना शेतकऱ्यांचा जाणता राजा म्हणतात. राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका कायम शेतकऱ्यांच्या हितासाठी राहीलेली असल्याने शेतकऱ्यांची लुट करणाऱ्यांना पक्ष पाठीशी घालणार नाही. शेतकरी लुटीबाबतची आपल्याला मिळालेली माहिती आपण पक्षाला देणार असून कारवाई केली जाईल, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांनी दिली. 

जिल्ह्यातील एक हजारांवर शेतकऱ्यांच्या खात्यावर एक रुपया पिक विमा आला आहे. याबाबत त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले. तसेच त्यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या ‘महिला सेफ्टी ऑडीट’ या उपक्रमाची मराठवाड्याची सुरुवात बुधवारी (ता. ११) बीडमध्ये श्रीमती वाघ यांच्या उपस्थितीत झाली. यानंतर पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. शासनाच्या नाफेड मार्फत सरत्या हंगामात हरभरा खरेदीसाठी केज खरेदी विक्री संघाची सब एजंट संस्था म्हणून नेमणूक होती. या ठिकाणी प्रत्येक क्विंटल मागे १० ते १३ किलो हरभरा कपातीच्या नावाखाली जास्त घेऊन शेतकऱ्यांची लुट केल्याचा आरोप आहे. 

राष्ट्रवादी काँग्रेसच्या अधिपत्याखालील या संस्थेवर याच पक्षाचे जिल्हाध्यक्ष बजरंग सोनवणे यांचे वर्चस्व आहे. शेतकरी लुटीबाबतच्या शेतकऱ्यांच्या तक्रारीवर योगायोगाने बुधवारीच सुनावणी होती. त्यामुळे चित्रा वाघ यांना या पत्रकारांनी या मुद्द्यावरील प्रश्न विचारले. त्यावर त्यांनी पक्षाचे धोरण कायम शेतकरी हिताचे राहीले असून हा प्रकाराची आजच आपल्याला माहिती झाली आहे. आपण याचा अहवाल देण्याचे निर्देश दिले असून संपूर्ण माहिती प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, पक्षाचे नेते अजित पवार यांना देणार आहोत. पक्ष कोणालाही पाठीशी घालणार नसून यावर कारवाई होईल असे चित्रा वाघ म्हणाल्या. 

या आधीची बातमी - 

बीडमध्ये राष्ट्रवादीच्या संस्थेत 110 किलो म्हणजे एक क्विंटल; भाजपविरुद्ध आता कसे रान पेटविणार

संबंधित लेख