पालघर लोकसभा मतदारसंघ : युतीतली धुसफूस बहुजन विकास आघाडीच्या पथ्यावर पडणार?

पालघर लोकसभेचा गड जिंकण्यासाठी शिवसेना-भाजप युतीतच सध्या जुंपलेली असताना कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस आघाडीने हा मतदारसंघ भाजपच्या हातून हिसकावण्यासाठी वेगळी खेळी खेळण्याचा प्रयत्न केला आहे. जुना मित्रपक्ष असलेल्या बहुजन विकास आघाडीला (बविआ) सोबत घेऊन त्यांच्यासाठी ही जागा त्यांना सोडण्याचा विचार कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी करत आहे. शिवसेनेसोबतचा संघर्ष आणि बविआला कॉंग्रेस-राष्ट्रवादी साथ भाजपसाठी डोकेदुखी ठरेल.
Rajendra Gavit - Shriniwas Vanga-Baliram Jadhav - Sachin Shingda
Rajendra Gavit - Shriniwas Vanga-Baliram Jadhav - Sachin Shingda

पालघर : हा मतदारसंघ 2009 मध्ये अस्तित्वात आला. पहिल्याच निवडणुकीत "बविआ'चे बळीराम जाधव निवडून आले; मात्र 2014 मध्ये "मोदी लाट'मुळे भाजपचे चिंतामण वनगा यांनी जाधव यांचा पराभव केला. परंतु, त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत पालघरमधील सहांपैकी तीन जागा जिंकून आपले वर्चस्व बविआने दाखवून दिले होते. वसई-विरार महापालिकेतही बविआने भाजपला धूळ चारली होती. तेथे भाजपला केवळ एकच जागा जिंकता आली. चिंतामण वनगा यांच्या निधनानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत शिवसेना-भाजपमध्ये कलगीतुरा रंगला होता. शिवसेनेने वनगा यांचे पुत्र श्रीनिवास वनगा यांना उमेदवारी देत भाजपला शह देण्याचा प्रयत्न केला; मात्र भाजपने कॉंग्रेसचे राजेंद्र गावित यांना रिंगणात उतरवत पालघरवर वर्चस्व कायम राखण्यात यश मिळवले. अवघ्या आठ महिन्यांसाठी खासदारकी मिळालेल्या गावित यांनी केलेली कामे मतदारांवर कितपत प्रभाव टाकू शकतील, हे मतदानानंतरच स्पष्ट होईल.

बविआची साथ मिळवण्यासाठी सर्वच पक्ष इच्छुक आहेत; मात्र बविआचे सर्वेसर्वा हितेंद्र ठाकूर यांनी अद्याप भूमिका स्पष्ट केलेली नाही. या मतदारसंघात मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्षाचीही (सीपीएम) डहाणू, तलासरी आणि इतर भागांत बऱ्यापैकी ताकद आहे. ते कोणत्या मोठ्या पक्षाला साथ देतात हे पाहणेही औत्सुक्‍याचे ठरणार आहे. मतदारसंघातील राजकीय समीकरणे अधूनमधून बदलत आहेत. असे असले तरी 2014 प्रमाणेच वर्चस्व मिळवण्यासाठी शिवसेना-भाजपमध्ये पुन्हा संघर्ष दिसण्याची चिन्हे आहेत.

2014 चे मतविभाजन
भाजप : चिंतामण वनगा - 5,33,201
बविआ : बळीराम जाधव - 2,93,681
सीपीएम : रूपा खरपडे - 78,890
आप : पांडुरंग पारधी - 16,182

पक्षनिहाय इच्छुक उमेदवार
भाजप : राजेंद्र गावित
शिवसेना : श्रीनिवास वनगा
कॉंग्रेस : दामू शिंगडा, सचिन शिंगडा
बविआ : बळीराम जाधव

मतदारांतील नाराजीची कारणे
- लोकल सेवेचा प्रश्‍न, लांब पल्ल्याच्या गाड्यांना थांबा, डहाणू-नाशिक रेल्वेचा रखडलेला प्रश्‍न
- कारखान्यांची परिस्थिती बिकट. राज्याच्या सीमेवरील अनेक लोक रोजगारासाठी गुजरातच्या दिशेने
- 'ओएनजीसी'च्या सर्वेक्षणामुळे मच्छीमारांची उपासमार. डिझेलचा परतावा नाही. "सीआरझेड'च्या कात्रीत घरांचा प्रश्‍न रखडला
- आदिवासींच्या विकासाची घोषणा कागदावरच
- विविध प्रकल्पांसाठी जागा जात असल्याने भूमिपुत्रांमध्ये असंतोष

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com