Will Give permission for DJ if Gets NOC from Your mother | Sarkarnama

डीजे लावायचाय आईची एनओसी आणा

सुशांत सांगवे
गुरुवार, 30 ऑगस्ट 2018

गणेशोत्सवाच्या पाश्‍वभूमीवर पोलिस विभागाच्या वतीने पूर्वतयारी बैठक अायोजित करण्यात अाली होती. कधी मिस्किल शैलीत तर कधी गंभीरपणे बोलत जी. श्रीकांत यांनी गणेशोत्सवातील बदलत्या वातावरणावर भाष्य केले.

लातूर : तुम्हाला गणेशोत्सवात डीजे लावायचा आहे, बिनधास्त लावा... जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांचे हे बोल ऐकून सभागृहात उपस्थित असलेल्या गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांनी टाळ्यांचा प्रचंड कडकडाट केला. टाळ्यांचा हा आवाज थांबताच जिल्हाधिकारी पुढे बोलू लागले... ‘तुम्हाला डिजेची परवानगी देतो. त्यासाठी पालकमंत्री, खासदार, आमदार यांच्या पत्राचीसुद्धा गरज नाही. केवळ तुम्ही तुमच्या आईचे किंवा बहिणीचे एनओसी सोबत आणा.’ या विधानातून ध्वनिप्रदुषणाच्या गांभिर्याकडे त्यांनी लक्ष वेधून घेतले. पण या विधानामुळे सभागृहात टाळ्यांऐवजी निरव शांतता पसरली.

गणेशोत्सवाच्या पाश्‍वभूमीवर पोलिस विभागाच्या वतीने पूर्वतयारी बैठक अायोजित करण्यात अाली होती. कधी मिस्किल शैलीत तर कधी गंभीरपणे बोलत जी. श्रीकांत यांनी गणेशोत्सवातील बदलत्या वातावरणावर भाष्य केले. आई-बहिण आपली जास्त काळजी घेतात. घरात टीव्हीचा थोडा आवाज जरी वाढवला तरी ते आतून आपल्याला आवाज कमी करायला सांगतात. त्यामुळे त्यांची एनओसी डीजेसाठी तुम्हाला मिळणार नाही, याची मला पूर्ण खात्री आहे. जर ती मिळालीच तर थेट माझ्याकडे या. या विषयासाठी मी ‘एक खिडकी योजना’ सुरू केली आहे. तिथे मीच बसतो. परवानगी दिल्यानंतर आपण आधी तुमच्या घरी डीजे लावू, असे जी. श्रीकांत यांनी सांगितले.

गणेशोत्सवात तुम्ही डीजे लावता. त्यावर देवाची गाणी किती असतात सांगा? मुन्नी-शिला हीच गाणी सतत लोकांना ऐकायला मिळतात. त्यावर विचित्र पद्धतीने डान्स केला जातो. अशा प्रकारच्या गाण्यांवर डान्स करायचा इतका शौकच असेल, तर आम्हाला प्रत्येक तालूक्याला एक डीजे सेंटर सुरू करावे लागेल, असे मिस्किल शैलीत बोलत जी. श्रीकांत म्हणाले, ‘‘नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘ऐ दिल है मुश्‍किल’ या चित्रपटांत सायलेंट डीजे दाखवला आहे. गर्दीतल्या प्रत्येकाने आपापल्या कानाला हेडफोन लावायचा अाणि हवे ते गाणे ऐकायचे. त्यामुळे दुसऱ्याला त्रास होत नाही. मग ही पद्धत तर स्वीकारा. मात्र, डीजे लावून दुसऱ्याला त्रास देणे टाळा. यामुळे प्रदुषणही होणार नाही.’’

या बैठकीला पालकमंत्री संभाजी पाटील-निलंगेकर, खासदार सुनील गायकवाड, महापाैर सुरेश पवार, पोलिस अधिक्षक राजेंद्र माने, पालिका आयुक्त काैस्तूभ दिवेगावकर यांच्यासह अनेक अधिकारी उपस्थित होते.

संबंधित लेख