Will Give Damanganga's Water to Nashik and Nagar | Sarkarnama

दमणगंगेचे पाणी अडवून नाशिक, नगर, जायकवाडी धरण भरु : नितीन गडकरी

संपत देवगिरे  
बुधवार, 24 ऑक्टोबर 2018

सध्या पाण्यावरुन वाद सुरु आहेत. हे भांडण चांगले नाही. नियोजन व प्रकल्पांच्या उभारणीतुन ते मिटेल. यासंदर्भात विविध स्तरावर आम्ही बैठका घेतल्या आहेत. त्यानुसार ठाणे जिल्ह्यातील नद्यांचे पाणी समुद्राला जाऊन मिळते. या भागात पाटबंधारे प्रकल्प करुन ते पाणी अडवण्याचा विचार आहे - नितीन गडकरी

नाशिक : ''ठाणे जिल्ह्यातील नद्यांसह दमणगंगेचे पाणी समुद्राला मिळते. खाडीचे हे पाणी अडवुन तिथे मोठा पाटबंधारे प्रकल्प उभारण्याचे नियोजन आहे. येत्या दोन आठवड्यात त्यावर अंतिम निर्णय होईल. या धरणाचे पाणी गोदावरी खोऱ्यात वळवले की नाशिक, नगरसह जायकवाडी धरण पुर्ण भरेल. हा परिसर समृध्द होईल," असे केंद्रीय भुपृष्ठ वाहतुक मंत्री नितीन गडकरी यांनी आज येथे सांगीतले. 

येथील कर्मवीर काकासाहेब वाघ शिक्षण संस्थेतर्फे कर्मयोगिनी पुरस्काराचे वितरण गडकरी यांच्या हस्ते आज झाले. यावेळी ते म्हणाले, ''सध्या पाण्यावरुन वाद सुरु आहेत. हे भांडण चांगले नाही. नियोजन व प्रकल्पांच्या उभारणीतुन ते मिटेल. यासंदर्भात विविध स्तरावर आम्ही बैठका घेतल्या आहेत. त्यानुसार ठाणे जिल्ह्यातील नद्यांचे पाणी समुद्राला जाऊन मिळते. या भागात पाटबंधारे प्रकल्प करुन ते पाणी अडवण्याचा विचार आहे. तीस हजार कोटींचा हा प्रकल्प आहे. त्यासाठी माझा विभाग काही खर्च करेल. उर्वरीत निधीसाठी महाराष्ट्र व गुजरातच्या मुख्यमंत्र्यांच्या दरम्यान सामंजस्य करार करावा लागेल. तो अंतिम टप्प्यात आहे. राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीष महाजन त्यात पुढाकार घेतील. हा प्रकल्प झाल्यास दमणगंगेतील हे पाणी उचलुन गोदावरी खोऱ्यात आणता येईल. त्यातून नाशिक व नगरची सर्व धरणे भरतील. जायकवाडी धरणही भरेल."

यावेळी श्रीमती विद्याताई फडके, शेखर गायकवाड यांना कर्मयोगीनी पुरस्कार देण्यात आला. जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, संयोजक बाळासाहेब वाघ, मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या सरचिटणीस निलीमाताई पवार, आमदार बाळासाहेब सानप, सीमा हिरे, आमदार श्रीमती कोल्हे, अनिल कदम, देवयानी फरांदे, माणिकराव कोकाटे आदी उपस्थित होते. 

संबंधित लेख