Will Develop Jalgaon Before Vidhansabha Elections - Girish Mahajan | Sarkarnama

जळगावचा विकास विधानसभेपूर्वीच अन्यथा मते मागणार नाही :गिरीश महाजन 

सरकारनामा ब्युरो 
रविवार, 22 जुलै 2018

जळगाव महापालिका निवडणुकीत भारतीय जनता पक्षातर्फे सर्व 75 जागांवर प्रथमच उमेदवार उभे करण्यात आले आहेत. यावेळी भाजपला तब्बल 50 ते 55 जागांवर विजय मिळण्याची अपेक्षा असून, महापौर भाजपचाच होईल, असा विश्‍वास भाजपा नेते व्यक्त करीत आहेत. भाजपचा सामना महापालिकेतील सत्ताधारी सुरेशदादा जैन यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेशी आहे.

जळगाव : ''गेल्या पंधरा वर्षांत जळगाव शहराचा विकास झालेला नाही, यावर आपण ठाम आहोत. तरीही आपण कुणावर टीका करीत नाही अन्‌ दोषही देत नाही. त्यांच्याकडून होऊ शकले नाही ना! मग आता आम्हाला एक संधी द्या. आम्ही महापालिका कर्जमुक्त तर करणारच आहोत. शिवाय चांगला विकासही करून दाखवितो, तोही येत्या विधानसभा निवडणुकीपूर्वीच; अन्यथा मते मागायला जाणार नाही,'' अशी हमी जलसंपदा व वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांनी 'सरकारनामा'शी बोलताना दिली.

जळगाव महापालिका निवडणुकीत भारतीय जनता पक्षातर्फे सर्व 75 जागांवर प्रथमच उमेदवार उभे करण्यात आले आहेत. यावेळी भाजपला तब्बल 50 ते 55 जागांवर विजय मिळण्याची अपेक्षा असून, महापौर भाजपचाच होईल, असा विश्‍वास भाजपा नेते व्यक्त करीत आहेत. भाजपचा सामना महापालिकेतील सत्ताधारी सुरेशदादा जैन यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेशी आहे. जैन यांनी मतदारांसाठी निवेदन प्रसिद्ध केले असून, त्यात जळगावात गेल्या पंधरा वर्षांत झालेल्या अधोगतीला सन 2001 मध्ये पालिकेत सत्तेवर आलेला भारतीय जनता पक्ष जबाबदार आहे, असा आरोप नाव न घेता केला आहे.

याबाबत भाजप नेते व जलसंपदामंत्री महाजन यांच्याशी 'सरकारनामा'ने संपर्क साधला असता ते म्हणाले, "सुरेशदादा जैन आपल्याला आदर्श आहेत. त्यांच्यावर आपल्याला कोणतीही टीका करायची नाही अन्‌ राजकीय विरोधही करायचा नाही. सन 2001 मध्ये आमची सत्ता आज विकासाची गती मंदावण्यास कारणीभूत असल्याचा त्यांचा आरोप आपल्याला मान्य नाही. मात्र, गेल्या पंधरा वर्षांत महापालिकेतर्फे जनतेला साध्या मूलभूत सुविधाही मिळालेल्या नाहीत. त्यामुळे आज जनता त्रस्त आहे. यावर आपण ठाम आहोत. सत्ताधाऱ्यांनी विकास का केला नाही, याबाबत बोलणार नाही," 

होय, मी कर्जमुक्त करणारच! 
महापालिका कर्जमुक्तीबाबत प्रश्‍न उपस्थित केले जात असल्याचे सांगून ते म्हणाले, "जळगाव महापालिकेवर कर्ज का झाले? कसे झाले? कुणी केले याकडे आपण जाणार नाही. आपल्याला केवळ आणि केवळ जळगावकरांचे हित जोपासायचे आहे. त्यामुळे कुणी म्हणत असेल कर्जमुक्ती होणार नाही, तर मी सांगतो, की जळगावकरांनी आम्हाला सत्तेची संधी दिल्यास महापालिका कर्जमुक्ती करून दाखवू. त्यासाठी केंद्रीय मंत्र्यांशी चर्चा करू. त्यासाठी दिल्लीत आम्ही आपण स्वत: सर्व शक्तीपणाला लावणार आहोत.'' 

..तर विधानसभेसाठी मते मागणार नाही 
जळगावच्या विकासाबाबत मंत्री महाजन म्हणाले, "महापालिकेवर भाजपचा झेंडा फडकवायचा म्हणून सत्ता हवी आहे, असे आपले धोरण नाही. आपल्याला जळगावकरांना विकास करून दाखवायचा आहे. आपले हे आश्‍वासन नव्हे; तर हमी आहे. सत्ता मिळाल्यानंतर विकासकामे करण्याचा कालावधी असणार आहे. राज्यातील विधानसभा निवडणूक अवघ्या दीड वर्षावर आहे. आम्ही केवळ एका वर्षात जळगावकरांना मूलभूत सुविधा उपलब्ध करून विकास करून दाखवू. जर आम्ही हे करू शकलो नाही, तर विधानसभा निवडणुकीत आम्ही जनतेकडे मते मागायला जाणार नाही. अशी ग्वाही आपण जनतेला देत आहोत.''

सरकारनामा अॅप डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा
 

संबंधित लेख