मुंबई: आगामी लोकसभा निवडणुकीसाठी येत्या 19 आणि 20 डिसेंबरला कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस यांच्यात जागावाटपाची चर्चा होणार आहे. या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेसने सिंधुदुर्गची जागा नारायण राणेंसाठी मागितली काँग्रेस विरोध करणार अशी चिन्हे दिसत आहेत .
सिंधुदुर्गची जागा राष्ट्रवादीला हवी असून, माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांना तेथून राष्ट्रवादीतर्फे निवडणूक लढवायची असल्याची चर्चा आहे. परंतु जागावाटपात हा मतदारसंघ कॉंग्रेसकडे आहे.
कॉंग्रेसचा राणे यांना महाआघाडीत घेण्यास विरोध आहे. प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण आणि नारायण राणे यांचे वैर सर्वांनाच माहीत आहे. खुद्द चव्हाण यांचा राणेंना विरोधच आहे. त्यामुळे राणेंसाठी ही जागा राष्ट्रवादीला सोडण्यास कॉंग्रेस तीव्र विरोध करण्याची शक्यता आहे.
लोकसभेच्या महाराष्ट्रात 48 जागा आहेत. त्यापैकी 40 जागांबाबत कोणताच वाद नाही, असे सांगण्यात येते. आठ जागांवर दोन्ही पक्ष दावा करत असून, वरिष्ठ नेत्यांच्या बैठकीत यावर चर्चा करून तोडगा काढला जाईल, असे स्पष्ट करण्यात आले.
जागावाटपाची महत्त्वपूर्ण बैठक विधानसभेतील विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या निवासस्थानी होणार आहे.
ज्या जागांबद्दल वाद आहेत त्यात यवतमाळ, पुणे , औरंगाबाद अशा काही मतदारसंघांचा समावेश आहे. या सर्वच मुद्यांवर दोन दिवसीय बैठकीच्या चर्चेतून मार्ग काढण्यात येण्याची शक्यता आहे. दोन्ही पक्षांचे ज्येष्ठ नेते या बैठकीस उपस्थित राहणार आहेत. भाजप शिवसेना युतीची स्पष्टता नसताना कॉंग्रेस राष्ट्रवादीने जागावाटपात आघाडी घेतली आहे.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.