WILL bjp ENTER IN mlC ELECTION? | Sarkarnama


ब्रेकिंग न्यूज

सांगलीची जागा मतभेद असतील तर आम्हाला नको : राजू शेट्टी. जागा काँग्रेसकडेच ठेवण्याचे संकेत

शिवसेनेला शह देण्यासाठी भाजप मुंबई पदवीधरच्या रिंगणात उतरणार?

मृणालिनी नानिवडेकर
सोमवार, 14 मे 2018

मुंबई पदवीधर मतदारसंघात 8 जूनला निवडणूक होणार असून, या मतदारसंघात 59 हजार 23 पदवीधरांची नोंदणी झाली आहे. ज्येष्ठ संसदपटू प्रमोद नवलकर यांच्यापासून शिवसेना लढत असलेल्या या जागेवर त्यांच्या निधनानंतर डॉ. दीपक सावंत उमेदवार झाले. हा मतदारसंघ शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जात असतानाच या वेळी अश्विन मेहता नावाच्या एका समाजसेवकानेही पत्रके छापली आहेत. येत्या २२ मे पर्यंत अर्ज भऱण्याची मुदत आहे.

मुंबई : गेली कित्येक वर्षे शिवसेनेची हक्‍काची जागा ठरलेल्या मुंबई पदवीधर मतदारसंघात प्रवेश करण्याची भाजपची इच्छा आहे. पक्ष नेतृत्वाने परवानगी दिल्यास शिवसेनेला आव्हान देण्याची तयारी मुंबई भाजपचे अध्यक्ष आशीष शेलार आणि त्यांच्या चमूने केली आहे. युतीमधील तणाव पालघर पोटनिवडणुकीनिमित्त टोकाला गेला असतानाच शिवसेनेच्या या गडात शिरण्याची भाषा भाजपने सुरू केली आहे. दुसरीकडे शिवसेनेने या निर्णयाचे स्वागत करीत "या तुमचे स्वागत'च असल्याची प्रतिक्रिया दिली आहे.

मुंबई पदवीधर मतदारसंघात 8 जूनला निवडणूक होणार असून, या मतदारसंघात 59 हजार 23 पदवीधरांची नोंदणी झाली आहे. ज्येष्ठ संसदपटू प्रमोद नवलकर यांच्यापासून शिवसेना लढत असलेल्या या जागेवर त्यांच्या निधनानंतर डॉ. दीपक सावंत उमेदवार झाले. हा मतदारसंघ शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जात असतानाच या वेळी अश्विन मेहता नावाच्या एका समाजसेवकानेही पत्रके छापली आहेत. 

या अमराठी उमेदवाराला भाजपची साथ आहे, अशी शंका शिवसेनेने प्रारंभापासूनच घेणे सुरू ठेवले होते. पालघरनंतर उद्‌भवलेल्या परिस्थितीत भाजपच्या मुंबई शाखेने पक्षाचा निर्णय झाल्यास मैदानात उतरण्याची तयारी असल्याचे निवडणूक कार्यक्रम घोषित होताच काल श्रेष्ठींची भेट घेऊन नमूद केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे निर्णय घेतील, आम्ही त्याची अंमलबजावणी करू, असे मुंबई भाजपतर्फे सांगितले जाते आहे.

59 हजार मतदारांपैकी सुमारे 45 हजार मतदार आमच्या संपर्कातील आहेत, असे शिवसेनेच्या एका नेत्याने "सकाळ'ला सांगितले. शिवसेनेला या जागेवरील विजयाची कमालीची खात्री आहे. डॉ. सावंत यांनाच पुन्हा उमेदवारी मिळेल, असे मानले जात असताना उमेदवार कोण, याचा निर्णय "मातोश्री'वर होईल, असे सांगण्यात आले.

भाजपने मात्र शिवसेनेने केलेल्या नोंदणीचा आकडा मोठा असला तरी आमचेही पदवीधर मतदारांमध्ये काम झाले आहे, असे असल्याचे नमूद करणे सुरू ठेवले आहे. मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत मराठी मतदार शिवसेना समर्थक आणि अमराठी मतदार भाजपधार्जिणा असे चित्र तयार झाले होते. त्याचीच पुनरावृत्ती या निवडणुकीनिमित्त होईल काय, असा प्रश्‍न आहे. शिवसेनेशी यासंदर्भात संपर्क साधला असता पक्षप्रवक्‍ते ऍड. अनिल परब यांनी भाजप या निवडणुकीत उतरणार असेल तर त्यांचे स्वागतच आहे, अशी प्रतिक्रिया दिली.

मराठी भाषेच्या संवर्धनासाठी मराठी अभ्यास केंद्रामार्फत प्रयत्न करणारे प्रा. दीपक पवार या निवडणुकीत उतरणार आहेत. त्यांच्या संस्थेनेही नोंदणीचे आवाहन वेळोवेळी केले होते. प्रा. पवार यांनी "सकाळ'ला सांगितले की, मला पाठिंबा द्या, असे आवाहन आपण राजकीय पक्षांना करणार असल्याचे सांगितले. गेल्या निवडणुकीत एक हजाराच्या आत मते मिळवणारे कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेस नेमकी कोणती भूमिका घेणार याकडेही लक्ष आहे.

संबंधित लेख