सावकार, लॅंड व सॅंड माफिया यांना `झोपडपट्टी दादा` ची दहशत बसविणार : SP संदीप पाटील

सावकार, लॅंड व सॅंड माफिया यांना `झोपडपट्टी दादा` ची दहशत बसविणार : SP संदीप पाटील

शिरूर : बेकायदा सावकारी, वाळूमाफिया आणि हातभट्टी दारूधंदे करणाऱ्यांवर जिल्हा पोलिस अधीक्षक संदीप पाटील यांनी बडगा उगारला असून, या तीनही घटकांची सरसकट "झोपडपट्टी दादा' म्हणून गणना करताना त्यांच्यावर मोक्का, एमपीडीए अंतर्गत कारवाईचा इशारा दिला आहे.

गुंडापुंडांच्या मदतीने सामान्य माणसाला धमकावल्यास त्या गुंडांसह सावकार, दारूधंदेवाले व वाळूमाफियांवर "स्ट्रॉंग' गुन्हे लावू असा सज्जड दम त्यांनी येथे दिला.

 
शिरूर पोलिस स्टेशनच्या वार्षिक तपासणीनंतर झालेल्या "पीएस 100 ग्रुप'च्या सहविचार सभेत पाटील बोलत होते. "महाराष्ट्र झोपडपट्टी दादा कायदा' (एमपीडीए) पूर्णपणे अभ्यासला असून, तो वाळूमाफिया, बेकायदा सावकारी व हातभट्टीवाल्यांना लावता येतो, असे स्पष्ट करून पाटील म्हणाले, ""गेल्या काही दिवसांत सावकारांकडून पिळवणूक झाल्याने आत्महत्या व खुनाचे प्रकार घडले आहेत. बेकायदा सावकार पैसे वसुलीसाठी दादा, भाई लोकांची मदत घेतात. गुंडांमार्फत कर्जदारांची घरे बळकावणे, वाहने उचलून नेणे असे प्रकार समोर आले आहेत. याची गंभीर दखल घेतली जाईल.

बेकायदा सावकारी करणाऱ्यांवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यांतर्गत (मोक्का) कारवाई करताना गुंडांमार्फत सामान्य माणसांना दमबाजी करणारांना आम्ही वठणीवर आणू. सामान्यांच्या जमिनी परत मिळवून देऊ. सामान्य नागरिकांनी असे प्रकार झाल्यास निर्भयपणे तक्रार द्यावी. त्याची पुढील सर्व जबाबदारी आम्ही घेऊ,'' असे त्यांनी सांगितले.

 
शिरूर तालुका मुद्रक संघाचे अध्यक्ष बाबूराव पाचंगे, मराठा सेवा संघाचे तालुकाध्यक्ष नामदेव घावटे, प्रा. सतीश धुमाळ, रणजित पाडळे, बाबासाहेब शेलार, पूजा पंदरकर, जिजाबाई दुर्गे, भरत काळे, ऍड. अमृता खेडकर, मानसिंग कदम, रवींद्र सानप यांनी विविध सूचना मांडल्या. तहसीलदार रणजित भोसले यांनी उपस्थितांचे स्वागत केले, वरिष्ठ पोलिस निरीक्षक कैलास घोडके यांनी प्रास्ताविक केले. पोलिस निरीक्षक भागवत मुंढे यांनी आभार मानले. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com